प्राकृतिक रचना व जलप्रणाली
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-३- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
|
अभ्यासघटक :
|
भारत व ब्राझील - प्राकृतिक विभागांचा तौलनिक अभ्यास :
- भारतातील प्रमुख प्राकृतिक विभाग : (१) हिमालय (२) उत्तर भारतीय मैदान (३) द्वीपकल्प (४) किनारपट्टीचा प्रदेश (५) द्वीपसमूह.
- ब्राझीलमधील प्रमुख प्राकृतिक विभाग : (१) उच्चभूमी (२) अजस्र कडा (३) किनारी प्रदेश (४) मैदानी प्रदेश (५) द्वीपसमूह.
भारतातील प्रमुख प्राकृतिक विभाग :
(१) हिमालय :
भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे.
वैशिष्ट्ये : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वतप्रणाली आहे.
हिमालय पर्वतश्रेणीतील रांगा : हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो.
- शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.
- दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.
- हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असेही भाग केले जातात.
- भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० मीटर ते ८००० मीटर आहे.
(२) उत्तर भारतीय मैदान :
- भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
- हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग : (i) गंगेचे मैदान. (ii) थरचे वाळवंट (iii) पंजाबचा मैदानी प्रदेश
गंगेचे मैदान :
- अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
- भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास 'सुंदरबन' म्हणतात. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
थरचे वाळवंट :
- उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश 'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळी' या नावाने ओळखला जातो. रा
- जस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे.
पंजाबचा मैदानी प्रदेश :
- थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
- अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.
- पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.
(३) द्वीपकल्प :
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो. भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत.
पर्वत :
- भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.
- भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट व पूर्व सीमेलगत पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.
- विभागाच्या मध्य भागात विंध्य-सातपुडा पर्वत आहेत.
पठारे :
- भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे.
- पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक-तेलंगणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत.
पश्चिम घाट व पूर्व घाट वैशिष्ट्ये :
- पश्चिम घाट हा दक्षिणोत्तर दिशेत पसरला आहे. तर पूर्व घाट हा नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरला आहे.
- पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबीबरोबर अरबी समुद्राला समांतर पसरत गेला आहे. हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे.
- पश्चिम घाट हा तुलनेने अरुंद आहे, तर पूर्व घाट हा तुलनेने रुंद आहे.
- पश्चिम घाटाची उंची तुलनेने अधिक आहे. याउलट, पूर्व घाटाची उंची तुलनेने कमी आहे.
- पश्चिम घाटातून तुलनेने अधिक नद्या उगम पावतात. तर पूर्व घाटातून तुलनेने कमी नद्या उगम पावतात. पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक पठारी नद्यांचे उगमस्थान आहे.
- पश्चिम घाट हा अनेक ठिकाणी खिंडींमुळे छेदला गेला आहे. तर पूर्व घाट हा अनेक ठिकाणी दख्खनच्या पठारावरून वाहणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांनी छेदला गेला आहे.
- पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे.
- पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला, तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही. पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग (खिंडी) आहेत.
(४) किनारपट्टीचा प्रदेश :
भारताच्या किनारपट्टीची लांबी सुमारे ७५०० किमी आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे किनारपट्टीचा प्रदेश आहे.
पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाची वैशिष्ट्ये
- भारताचा पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश अरबी समुद्राला लागून आहे.
- भारतातील पश्चिम किनारपट्टी खडकाळ आहे व तिची रुंदीही कमी आहे.
- पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत.
- पश्चिम घाटातून उगम पावणाऱ्या व वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रास येऊन मिळतात.
- या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून तेथे त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत..
पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशाची वैशिष्ट्ये :
- भारताचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश बंगालच्या उपसागराला लागून आहे.
- भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनाने बनला आहे.
- पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून उगम पावणाऱ्या अनेक पूर्ववाहिनी नद्या भारताच्या पूर्व किनाऱ्याला येऊन बंगालच्या उपसागराला मिळतात.
- या नद्या पूर्व किनाऱ्यावरील जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते.
- परिणामी भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात. उदा., सुंदरबन.
(५) द्वीपसमूह :
भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यांजवळ अनेक लहान-मोठी बेटे आहेत. किनाऱ्याजवळील बेटांशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांत पुढीलप्रमाणे प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे :
भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह :
- भारताचा लक्षद्वीप द्वीपसमूह अरबी समुद्रात स्थित आहे.
- या द्वीपसमूहातील बेटे तुलनेने लहान विस्ताराची व कमी उंचीची आहेत.
- ही बेटे भारताच्या नैर्ऋत्य (पश्चिम) किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात आहेत.
- बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत.
भारताचा अंदमान-निकोबार द्वीपसमूह
- अंदमान आणि निकोबार बेटे हा बंगालच्या उपसागरातील बेटांचा समूह आहे. ही बेटे भारताच्या आग्नेय (पूर्व) किनाऱ्यापासून खूप दूर, बंगालच्या उपसागरात आहेत.
- अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत.
- अंदमान बेटांच्या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटे कंकणद्वीपाच्या स्वरूपात आहेत.
- अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६०४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे.
ब्राझीलमधील प्राकृतिक विभाग :
(१) उच्चभूमी :
ब्राझीलचा बहुतांश भाग विस्तीर्ण पठारांनी/उच्चभूमीने व्यापलेला आहे. ब्राझीलमधील गियाना उच्चभूमी (ढालक्षेत्र) व ब्राझील उच्चभूमी (ढालक्षेत्र) एकत्रितरीत्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभाक्षेत्रे मानली जातात.
या उच्चभूमींची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
उच्चभूमींची नावे : (i) गियाना उच्चभूमी/ढालक्षेत्र (ii) ब्राझीलची उच्चभूमी/पठार/ढालक्षेत्र.
(i) गियाना उच्चभूमी (ढालक्षेत्र) :
- गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात आहे. या उच्चभूमीचा पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तार आढळतो. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा तुलनेने कमी उंचीचा भाग आढळतो.
- गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोमाईमा, पारा आणि आमापा या राज्यांत विस्तारलेली आहे.
- ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ब्राझील व व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची ३०१४ मीटर आहे.
(ii) ब्राझील उच्चभूमी (ढालक्षेत्र) :
- ब्राझील देशातील दक्षिणेकडील भाग विस्तीर्ण पठाराने व्यापलेला आहे. हा भाग ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.
- ब्राझील उच्चभूमीची दक्षिणेकडील व पूर्वेकडील भागांतील उंची तुलनेने अधिक आहे व ती १००० मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागातील उंची ५०० मीटर ते १००० मीटर दरम्यान आहे.
- ब्राझील उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. ब्राझील उच्चभूमीचे उत्तरेकडील उतार फारसे तीव्र नाहीत.
- ब्राझील उच्चभूमीच्या उत्तरेकडील उतारावरून अॅमेझॉन नदीच्या उपनद्यांचा उगम होतो.
- यांतील काही उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. या नद्या पुढे अटलांटिक महासागरास मिळतात.
- ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहतात.
- ब्राझील उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो अजस्र कडा म्हणून ओळखला जातो.
(२) अजस्र कडा.
- क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वांत लहान प्राकृतिक विभाग आहे.
- सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो.
- ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते.
- अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.
- अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
- अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.
(३) किनारी प्रदेश :
- ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात.
- उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्ते- पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.
- ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट अॅमेझॉन व टोकँटिस या नद्यांच्यादरम्यान तयार झाले आहे.
- ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळे रक्षण होते.
(४) मैदानी प्रदेश
ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात.
ब्राझीलमधील मैदानी प्रदेशांची व दलदलीच्या प्रदेशांची माहिती पुढीलप्रमाणे आहे :
(i) अॅमेझॉन खोऱ्याच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये :
- अॅमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा मैदानी प्रदेश आहे. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
- अॅमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद, म्हणजेच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात, तेथे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४० किमी होते.
- जसजशी अॅमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते, तसतशी अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची (गैदानाची) रुंदी वाढत जाते.
- अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.
(ii) पॅराग्वे-पॅराना नद्यांच्या खोऱ्यांचा मैदानी प्रदेश :
- ब्राझीलच्या नैर्ऋत्य भागात.
- पॅराग्वे-पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग.
- पॅराग्वे - पॅराना जलप्रणालीमुळे या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मैदानी प्रदेश तयार झाला आहे.
(iii) पँटनाल प्रदेशाची वैशिष्ट्ये :
- पँटनाल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ (दलदलीच्या) प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे.
- पँटनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते.
- मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.
- या प्रदेशाचे स्थान ब्राझील उच्चभूमीच्या नैर्ऋत्य भागात आहे.
- हा प्रदेश ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे.
- ब्राझीलमधील अर्जेंटिना देशातही पँटनाल प्रदेशाचा विस्तार आढळतो.
- पँटनाल प्रदेशात महाकाय अनाकोंडा आढळतात.
(५) द्वीपसमूह.
मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे असे केले जाते.
किनारी बेटांची वैशिष्ट्ये :
- ब्राझीलमधील उत्तर किनारी बेटे ही अॅमेझॉन व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून निर्माण झालेली आहेत.
- ब्राझीलमधील दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागांत अनेक प्रवाळबेटे आढळतात. त्यांना 'कंकणद्वीप' म्हणतात.
सागरी बेटांची वैशिष्ट्ये :
- ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत.
- ब्राझीलमधील सागरी बेटे ही ब्राझीलच्या मुख्य भूमीपासून ३०० किमीपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत.
- सागरी बेटे खडकाळ स्वरूपाची असून, ती जलमग्न डोंगरांच्या माथ्यांचे भाग आहेत.
भारत व ब्राझील - जलप्रणालींचा तौलनिक अभ्यास :
- भारतातील प्रमुख नदीप्रणाली : (अ) हिमालयातील नद्या (ब) द्वीपकल्पावरील नद्या.
- ब्राझीलमधील प्रमुख नदीप्रणाली : (अ) अॅमेझॉनची जलप्रणाली (ब) पॅराग्वे-पॅराना जलप्रणाली (क) सावो फ्रान्सिस्को नदीप्रणाली (ड) किनारपट्टीवरील इतर नद्या.
भारतातील जलप्रणाली :
उगमक्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :
(अ) हिमालयातील नद्या :
- हिमालयातील बहुतांश नद्या अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून हिमनद्यांतून उगम पावतात.
- उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
- पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत.
या नद्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे :
वर्गीकरण : (१) सिंधू व तिच्या उपनद्या आणि (२) गंगा व तिच्या उपनद्या.
सिंधू व तिच्या उपनद्यांची वैशिष्ट्ये :
मुख्य नदी : सिंधू.
उपनद्या :
- झेलम, चिनाब, रावी व बियास या पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू-काश्मीर राज्यातून वाहणाऱ्या नद्या.
- सतलज या उपनदीचा मानसरोवरा-जवळ उगम.
- सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबच्या मैदानाची निर्मिती.
गंगा व तिच्या उपनद्यांची वैशिष्ट्ये :
मुख्य नदी : गंगा. हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम.
- गंगा नदीची एकूण लांबी २५२५ किमी आहे.
- गंगा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १६६४८ क्युसेक एवढा आहे.
उपनद्या :
- यमुना. यमुनोत्री येथे उगम पावणारी नदी.
- दिहांग, ब्रह्मपुत्रा इत्यादी ईशान्य भागातून वाहणाऱ्या नद्या.
- चंबळ, केन, बेटवा व शोण या द्वीपकल्पीय नद्या या गंगा नदीच्या उपनद्या.
गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे व उद्योगांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते.
(ब) द्वीपकल्पावरील नद्या :
द्वीपकल्पीय नद्यांतील बहुतांश नद्यांचा विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो.
या नद्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे :
वर्गीकरण : (१) पश्चिमवाहिनी (२) पूर्ववाहिनी.
पश्चिमवाहिनी नद्यांची वैशिष्ट्ये :
- केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमध्ये किनारी प्रदेशात सर्वसाधारणपणे सारखे गुणधर्म असणाऱ्या पश्चिमवाहिनी (अरबी समुद्रास मिळणाऱ्या) नद्या.
- तापी, नर्मदा, मही व साबरमती या गुजरातमधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या.
- ईशान्येकडून नैर्ऋत्यकडे वाहणारी मही नदी.
- अरवली पर्वताच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी व उत्तर-दक्षिण दिशेत वाहणारी साबरमती नदी.
- अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी व अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळणारी लुनी नदी.
पूर्ववाहिनी नद्यांची वैशिष्ट्ये :
- गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख पूर्ववाहिनी (बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या) नद्या.
- गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर उगम.
- गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी.
- गोदावरी नदीच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे व भीमा आणि तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या.
- कावेरी ही कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांतून वाहणारी नदी व या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी वापर.
ब्राझील जलप्रणाली :
ब्राझीलच्या या देशात तीन प्रमुख नद्यांची खोरी आहेत.
- ॲमेझॉनचे खोरे.
- नैॠत्ये कडील पॅराग्वे-पॅराना जलप्रणाली.
- ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील सावो फ्रान्सिस्को व क नारपट्टीवरील इतर नद्या .
ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.
ब्राझीलमधील महत्त्वाच्या नद्यांची/जलप्रणालींची माहिती :
(१) अॅमेझॉन जलप्रणाली :
- अॅमेझॉन नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. या नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.
- निग्रो, जापुरा, पुरुस, सिंगू इत्यादी अॅमेझॉनच्या प्रमुख उपनद्या आहेत.
- अॅमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. अॅमेझॉन नदीतून सुमारे २ लाख घनमीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत असतो.
- अॅमेझॉन नदीतून वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो.
- अॅमेझॉन नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या मुखाशी गाळाचे प्रदेश तयार न होता बेटे तयार होतात.
- अॅमेझॉन नदीच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान-मोठी बेटे तयार झालेली आढळतात. उदा., माराजॉ बेट.
- अॅमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रंदी सुमारे १५० किमी आहे. अॅमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे.
- अॅमेझॉन जलप्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिम व उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे.
(२) पॅराग्वे- पॅराना जलप्रणाली :
- पॅराग्वे व पॅराना या दोन नद्या ब्राझीलच्या नैर्ऋत्य भागातून वाहतात.
- या दोन्ही नद्या ब्राझीलमधून वाहत जाऊन पुढे ब्राझीलच्या दक्षिण दिशेस असणाऱ्या अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात.
- पॅराग्वे - पॅराना जलप्रणालीमुळे या नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात मैदानी प्रदेश तयार झाला आहे.
- पॅराग्वे-पॅराना या दोन्ही नद्यांना व ब्राझीलमधील अतिदक्षिण भागात असलेल्या उरुग्वे नदीला ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो.
(३) सावो फ्रान्सिस्को नदी :
- सावो फ्रान्सिस्को ही ब्राझीलमधील पूर्व भागातील महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते.
- ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील उतारावर या नदीचा उगम होतो. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात या नदीचे पाणलोट क्षेत्र आढळते.
- ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील भागात सुमारे १००० किमी अंतरापर्यंत ही नदी सुरुवातीला उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते,
- सावो फ्रान्सिस्को नदीच्या मुखाजवळील सुमारे २५० किमी लांबीच्या भागाचा जलवाहतुकीसाठी वापर केला जातो.
(४) किनारी प्रदेशातील नद्या :
- ब्राझीलच्या किनारी प्रदेशात तुलनेने कमी लांबीच्या नद्या आढळतात. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत.
- ब्राझीलमधील परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात.
- दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांचा ब्राझील उच्चभूमीतून उगम होतो.
- ब्राझीलमधील पुरागुआकु नदी साल्वाडोर शहराजवळ अटलांटिक महासागराला मिळते.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-३-प्राकृतिक रचना व जलप्रणाली-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-३-प्राकृतिक रचना व जलप्रणाली-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Useful links :
| Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल- - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ- २ : स्थान-विस्तार- Online Notes Next Chapter : पाठ- ४ : हवामान - Online Notes |
