इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-१ महाराष्ट्र बोर्ड
Notes
अभ्यासघटक :
|
इतिहास संशोधन पद्धती :
इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो-
- उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.
- त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे. त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
- उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे.
- ऐतिहासिक माहितीच्या संदर्भात संभाव्य निष्कर्षांची मांडणी करणे.
- या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.
इतिहास लेखनाची उद्दिष्टे :
- भूतकालीन घटनांची क्रमशः संगती लावणे.
- संगती लावलेल्या घटनांचे आकलन करणे.
- ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे.
- भ्रांत कल्पना काढून तथ्य शोधणे.
इतिहास संशोधनाच्या मर्यादा :
- वैज्ञानिक ज्ञानशाखांप्रमाणे इतिहास संशोधनात प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा वापर करता येत नाही.
- त्यामुळे इतिहासात सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे शक्य होत नाही.
- इतिहासात घटना घडून गेलेल्या असल्याने त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. त्यामुळे इतिहास संशोधनात मांडलेले निष्कर्ष व नियम पुनः पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते.
तज्ज्ञ व्यक्तींची गरज :
इतिहासाची साधने विश्वासार्ह ठरवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पुढील तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते:
- दस्तऐवजांतील भाषा व लिपी जाणणारे.
- अक्षरांचे वळण व भाषाशैली कोणत्या काळातील आहे याचे जाणकार.
- दस्तऐवजांसाठी वापरलेल्या कागदाचा निर्मिती काळ जाणणारे तज्ज्ञ.
- अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे अभ्यासक.
- दस्तऐवजांतील संदर्भांचा, माहितीचा अभ्यास करणारे इतिहासतज्ज्ञ.
इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था :
- पुरातत्त्व : पुरातन वस्तू व वास्तू यांचा अभ्यास करणारी शाखा.
- अभिलेखागार
- हस्तलिखितांचा अभ्यास
- पुराभिलेख,
- अक्षरवटिकाशास्त्र : शिलालेख व ताम्रलेख यांवरील, त्यातील अक्षरे, प्राचीन लिप्या यांचा अभ्यास करणारी शाखा.
- भाषारचनाशास्त्र
- नाणकशास्त्र
- वंशावळींचा अभ्यास
इतिहासलेखनाची परंपरा :
- इतिहासलेखन : वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.
- इतिहासकार : इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला 'इतिहासकार' असे म्हणतात.
इतिहासलेखन :
- इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे; त्या भूतकालीन घटनांची तो निवड करीत असतो.
- इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन यांवर त्याची लेखनशैली निश्चित होत असते.
- जगभरातील प्राचीन संस्कृतींमध्ये इतिहासलेखन करण्याची परंपरा नव्हती.
- वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांद्वारे भूतकालीन स्मृतींचे जतन केले जात असे.
- आधुनिक इतिहासलेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली आहेत.
आधुनिक इतिहासलेखन :
आधुनिक इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये :
- या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
- हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध देवी घटनांशी वा कथा-कहाण्यांशी जोडलेला नसतो.
- या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते.
- मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासलेखनात घेतला जातो.
युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन :
अठराव्या शतकात इतिहासलेखनात झालेले बदल.
- अठराव्या शतकापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रांत प्रगती झाली.
- वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याचे विचारवंतांना वाटू लागले.
- अमेरिका-युरोप येथे इतिहास व इतिहासलेखन यासंबंधी विचारमंथन झाले.
- इतिहासलेखनात वैज्ञानिक पद्धतीने ऐतिहासिक घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे इतिहासलेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले.
- ईश्वरविषयक चर्चा व तत्संबंधीचे तत्त्वज्ञान यांना महत्त्व देणे कमी झाले.
- विद्यापीठांत इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान मिळाले. जर्मनीतील विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. विद्यापीठांत इतिहासाचा सखोल अभ्यास सुरू झाला. याचा इतिहासलेखनावरही परिणाम झाला.
महत्त्वाचे विचारवंत :
(१) रेने देकार्त (१५९६ - १६५०) : फ्रेंच तत्त्वज्ञ, ग्रंथाचे नाव : डिस्कोर्स ऑन द मेथड
- रेने देकार्तच्या मते ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे.
- एखादी गोष्ट सत्य आहे, असे खात्रीने प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये; हा त्याच्या ग्रंथातील नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.
(२) व्हॉल्टेअर (१६९४-१७७८) : फ्रेंच तत्त्वज्ञ, ग्रंथाचे नाव : कॅन्डिड
- व्हॉल्टेअरच्या मते इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यांवरच लक्ष केंद्रित करू नये.
- तत्कालीन समाजपरंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचाही विचार केला पाहिजे.
- या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला.
- म्हणून व्हॉल्टेअर याला 'आधुनिक इतिहासलेखनाचा जनक' असे म्हटले जाते.
(३) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (१७७०-१८३१) : जर्मन तत्त्वज्ञ,
ग्रंथाचे नाव : (१) एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस (२) रिझन इन हिस्टरी
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्ववेत्त्याने इतिहासाच्या संदर्भात पुढील विचार मांडले-
- ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे.
- इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो.
- वेळोवेळी मिळत गेलेल्या पुराव्यांआधारे इतिहासकाराचे त्या घटनेबाबतचे प्रतिपादन बदलत जाणे स्वाभाविक असते.
- इतिहासातील कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी 'द्वंद्ववाद पद्धती'ने समन्वयात्मक मांडणी करावी.
‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्) :
- एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.
- दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच 'द्वंदुववाद' असे म्हणतात.
(४) लिओपॉल्ड व्हॉन रांके (१७९५-१८८६) : जर्मन तत्त्वज्ञ,
ग्रंथाचे नाव : ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी’ आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांनी इतिहासलेखन कसे करावे, याविषयी मांडलेल्या मतांतून त्यांचा
इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या मते-
- इतिहासलेखनात काल्पनिकता नसावी. इतिहासाचे चिकित्सक पद्धतीने संशोधन व्हावे.
- इतिहासलेखन करताना ऐतिहासिक घटनांशी संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे आवश्यक आहे. या सखोल संशोधनामुळे आपल्याला ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते.
- जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर द्यायला हवा.
- एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता.
(५) कार्ल मार्क्स (१८१८-१८८३) : जर्मन तत्त्वज्ञ, ग्रंथाचे नाव : 'दास कॅपिटल'
जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने आपल्या 'दास कॅपिटल' या ग्रंथात 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला. त्याच्या मते -
- इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
- मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.
- समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते.
- उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो; त्यातूनच वर्गसंघर्षाला सुरुवात होते.
- मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.
(६) मायकेल फुको (१९२६-१९८४) : फ्रेंच इतिहासकार, ग्रंथाचे नाव : ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’
- मायकेल फुको हा विसाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता.
- त्याने पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.
- मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.
- त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.
- फुको यानी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हटले आहे.
अॅनल्स प्रणाली :
- विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये 'अॅनल्स' ही इतिहासलेखनाची नवी प्रणाली उदयाला आली.
- इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो, असा विचार पुढे आला.
- तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच 'अॅनल्स प्रणाली' असे म्हणतात.
- 'अॅनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी विसाव्या शतकात प्रथम विकसित केली.
- अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली.
स्त्रीवादी इतिहासलेखन :
- स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना ही स्त्रीवादी इतिहासलेखनाची भूमिका आहे.
- इतिहासलेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहासलेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली.
- त्यामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला.
- इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला.
- सीमाँ-द-बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांशी संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.
- १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला.
आधुनिक इतिहासलेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपटनिर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले
Useful links :
| Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- २ : इतिहासलेखन : भारतीय परंपरा - Online Notes |

This is very useful for class 10th students
Yes,this is a good class from 10th student
I like this