उपयोजित इतिहास
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-३ महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :
|
उपयोजित इतिहास म्हणजे काय ?
उपयोजित इतिहास : (जनांसाठी इतिहास)
- ‘उपयोजित इतिहास’ या संज्ञेसाठी ‘जनांसाठी इतिहास’ (पब्लिक हिस्टरी) असा पर्यायी शब्दप्रयोग आहे.
- उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी सहसंबंध असतो
- भूतकाळातील घटनांसंबंधीच्या ज्ञानाचा वर्तमानात आणि भविष्यकाळात समाजाला कसा उपयोग होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.
- इतिहासाचा संबंध वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास' होय.
- उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्व सामान्य लोकांचा विविध अंगांनी सहभाग असू शकतो.
- आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते.
- उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.
उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाचे (ज्ञानाचे) महत्त्व :
- उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते.
- सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते.
- उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.
उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात सामान्यांचा सहभाग :
- संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना पर्यटक भेटी देतात.
- पर्यटनामुळे लोकांत इतिहासाची आवड वाढीस लागते.
- प्राचीन स्थानिक स्थळांच्या जतनाच्या आणि संवर्धनाच्या प्रकल्पात लोक सहभागी होतात.
उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन
उपयोजित इतिहास आणि संशोधन पद्धती :
- इतिहास हा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो.
- वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही भूतकाळातील त्या घटनांवरच आधारलेली असते.
- या घटना विज्ञान-तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, सामाजिक-धार्मिक-राजकीय संघटन, कला इत्यादी क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात.
- या प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसाठ्याचा स्वतंत्र इतिहास असतो. आणि या ज्ञानसाठ्याच्या आधारेच त्या प्रत्येक क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा चालू असते.
- म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील इतिहासाचे हे महत्त्व लक्षात घेता इतिहासाची संशोधन पद्धती अनेक विषयांच्या संशोधनात उपयुक्त ठरते.
इतिहासाच्या संशोधन पद्धतीची अन्य विषयांतील उपयुक्तता :
(i) तत्त्वज्ञान :
- विविध विचारसरणींचा उगम, वैचारिक परंपरा व त्यांची वाटचाल समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
- तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते.
- विश्वाचा शोध घेताना सर्वच समाजाने जगाच्या उत्पत्तीसंबंधी कथा, मिथके, देव-देवतांविषयीच्या कल्पना, त्यांचे पूजाविधी यांचे विचार मांडले. या विचारातच तत्त्वज्ञानाचे बीज आढळते.
- मानव्य शाखेतील विविध सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
(ii) विज्ञान :
- मानवी गरजांची पूर्तता आणि जिजासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात.
- त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो.
- या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धान्त यांचा अभ्यास केला जातो.
- विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.
(iii) तंत्रज्ञान :
- लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.
- दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले.
- कृषी, औद्योगिक उत्पादन, स्थापत्य इत्यादी क्षेत्रांत होत गेलेल्या बदलांचा, त्यामागील तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.
- दगडी हत्यारे तयार करण्याच्या अवस्थेपासून विज्ञानयुगापर्यंत प्रगत झालेले तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या इतिहासाचाच अभ्यास करावा लागतो.
(iv) उदयोगधंदे आणि व्यापार :
- उद्योगधंदे आणि व्यापार यांत अधिकाधिक लोकांचा संबंध येत गेला.
- परस्परांतील व्यवहारांचे क्षेत्र विकसित होत गेले.
- कालौघात बाजार व व्यापार यांचे स्वरूप, त्यामागील मानवी नाती आणि समाजरचना बदलत गेली.
- या बदलांतील सामाजिक रचना, सांस्कृतिक जडणघडण, आर्थिक व्यवस्था इत्यादींचा इतिहास समजून घ्यावा लागतो.
(v) व्यवस्थापनशास्त्र :
- उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीत त्यासंबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या, हे समजावून घेणे आवश्यक असते.
- तसेच या यंत्रणा सांभाळणाऱ्या संघटना या सर्वांचा अभ्यास करताना, त्यांच्या भूतकालीन व्यवस्थापनांचा अभ्यास करावा लागतो.
- त्यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवरील व्यवस्थापन करणे सोपे होते.
(vi) कला :
- कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो.
- या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो.
- संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
(vii) मानव्य ज्ञानशाखा :
- इतिहास, पुरातत्त्व, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या मानव्य ज्ञानशाखांचा उगम व विकास अभ्यासण्यासाठी त्यांच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागतो.
उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ
सांस्कृतिक वारसा :
- भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अवशेष वर्तमानकाळात अस्तित्वात असतात.
- हे अवशेष आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वारसा असल्याने, त्यांविषयी आपल्याला ममत्व वाटते.
- हा वारसा आपल्या पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याची आवश्यकता असते.
उपयोजित इतिहासाचे उपयोग :
- मूर्त व अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन होते.
- व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होतात.
- त्याआधारे इतिहासाचे यथायोग्य आकलन होते.
- भविष्यकाळासाठी योग्य दिशादर्शन होते.
सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन
(अ) सांस्कृतिक वारसा : हा मानवनिर्मित असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा
असतो.
(१) मूर्त सांस्कृतिक वारसा : या प्रकारात प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे,
चित्रे इत्यादींचा समावेश होतो.
(२) अमूर्त सांस्कृतिक वारसा : या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
- मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा.
- पारंपरिक ज्ञान.
- सणसमारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी.
- कला सादरीकरणाच्या पद्धती.
- विशिष्ट पारंपरिक कौशल्ये.
- अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट.
(ब) नैसर्गिक वारसा :
सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो; तर नैसर्गिक वारसा निसर्गाकडून मिळालेला असतो.
निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो :
- प्राणी
- वनस्पतीसृष्टी
- त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था
- भूरचनात्मक वैशिष्ट्ये.
भारतात सर्वत्र आढळणारी अभयारण्ये, उद्याने, पर्वतरांगा, नद्यांची खोरी, तलाव व धरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे.
जागतिक वारशाची यादी :
- कालौघात नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण होण्यासाठी 'युनेस्को' या आंतरराष्ट्रीय संघटनेने स्थळे, परंपरा वा नैसर्गिक ठिकाणे यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
- या यादीत भारतातील अनेक मंदिरे, लेणी, प्राचीन वास्तू, कला आणि अभयारण्यांचा समावेश आहे.
- महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी येथील लेणी, मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस व पश्चिम घाट रांगांमधील सातारा जिल्ह्यातील नैसर्गिक कास पठार यांचा समावेश आहे.
भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा :
- २००१: 'कुटियट्टम' ही केरळमधील संस्कृत नाट्यपरपरा.
- २००३ : वैदिक पठणपरंपरा.
- २००५ : उत्तर भारतातील 'रामलीला' सादरीकरण
- २००९: गढवाल (उत्तराखंड) येथील 'रम्मन' धार्मिक उत्सव आणि विधीनाट्य.
- २०१०:राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य.
- २०१०: पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य.
- २०१० : केरळातील 'मुडियेट्टू' विधीनाट्य आणि नृत्यनाट्य.
- २०१२: लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा.
- २०१३ : मणिपूर येथील 'संकीर्तन' परंपरा.
- २०१४ : पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कलापरपरा.
- २०१६: नवरोज
- २०१६ : योग
भारतातील जागतिक वारसा स्थळे-सांस्कृतिक :
- १९८३ : आग्र्याचा किल्ला
- १९८३ : अजिंठा लेणी
- १९८३ : वेरूळ लेणी
- १९८३ : ताजमहाल
- १९८४ : महाबलीपुरम येथील मंदिरे
- १९८४ : कोणार्क सूर्यमंदिर
- १९८६ : गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेन्ट्स
- १९८६ : फत्तेपूर सिक्री
- १९८६ : हंपी येथील वास्तूसंकुल
- १९८६ : खजुराहो येथील मंदिरे
- १९८७ : घारापुरी (एलिफन्टा) लेणी
- १९८७, : चोळ मंदिरे-तंजावरचे बृहदीश्वर मंदिर,
- २००४ : गंगैकोंडचोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर
- १९८७ : पट्टदकल येथील मंदिरे
- १९८९ : सांचीचा स्तूप
- १९९३ : हुमायूनची कबर
- १९९३ : कुतुबमिनार आणि परिसरातील वास्तू
- १९९९ : (१) दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, (२) नीलगिरी माउन्टन रेल्वे, (३) द काल्का शिमला रेल्वे
- २००२ : बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर
- २००३ : भीमबेटका येथील शैलाश्रय
- २००४ : चंपानेर-पावागढ पुरातत्त्वीय स्थळ
- २००४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई.
- २००७ : लाल किल्ला, दिल्ली
- २०१० : जंतर मंतर, जयपूर
- २०१३ : राजस्थानमधील पर्वतीय किल्ले
- २०१४ : गुजरातमधील पाटण येथील 'रानी-की-बाव'
- २०१६ : नालंदा महाविहार पुरातत्त्वीय स्थळ
- २०१६ : चंडिगढ येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स
- २०१७ : अहमदाबाद-ऐतिहासिक शहर
भारतातील जागतिक वारसा स्थळे-नैसर्गिक :
- १९८५ : काझीरंगा राष्ट्रीय उदयान
- १९८५ : केवलदेव राष्ट्रीय उद्यान
- १९८५ : मानस वन्यजीव अभयारण्य
- १९८७ : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
- १९८८ : नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
- २००५ : राष्ट्रीय उदयाने
- २०१२ : पश्चिम घाट
- २०१४ : ग्रेट हिमालयन पार्क
भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ :
- २०१६ : कांचनगंगा राष्ट्रीय उदयान
वर दिलेली यादी विद्यार्थ्यांनी वाचून लक्षात ठेवावी. वस्तुनिष्ठ प्रश्नांत तसेच संकल्पनाचित्रे पूर्ण करा या प्रश्नप्रकारांत यांवर प्रश्न विचारले जातील. |
वारशाचे जतन व संवर्धन :
- आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन भारत सरकारचे पुरातत्त्व खाते तसेच प्रत्येक राज्य शासनाचे पुरातत्त्व खाते करीत असतात.
- 'इनटॅक' (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) ही स्वयंसेवी संस्था १९८४ पासून हे काम करते आहे
- या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचा यात सहभाग असतो.
- समाजसेवी कार्यकर्ते आणि जनतेचाही हातभार असतो.
'वारसा जतन' प्रकल्पातून साध्य होणाऱ्या गोष्टी :
- वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता त्याचे संवर्धन करणे शक्य होते.
- समाजाची घडण, आव्हाने, लोकांच्या अपेक्षा यांची माहिती घेता येते.
- लोकांच्या भावना न दुखावता जतनासाठीच्या उपाययोजनांचे नियोजन करता येते.
- स्थानिक लोकांना प्रकल्पात सहभागी करून घेता येते.
- परंपरागत कौशल्यांना वाव मिळेल अशा व्यवसायांना चालना मिळण्यासाठी, असे नियोजन करता येते.
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे :
उपयोजित इतिहासाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे :
- संग्रहालये व अभिलेखागारे.
- ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन.
- पर्यटन आणि आतिथ्य.
- मनोरंजन आणि संपर्क माध्यमे.
उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे उपलब्ध झालेल्या व्यवसायांच्या संधी :
- संचालक, सचिव, व्यवस्थापक इत्यादी अधिकारपदे.
- इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ इत्यादी तज्ज्ञ.
- अभियंता, स्थापत्यविशारद, छायाचित्रणतज्ज्ञ इत्यादी तंत्रज्ञ
- वास्तूंचे जतन करणारे कर्मचारी.
- या सर्वांशी संबंधित उदयोग-व्यवसाय.
माहीतीसाठी :
(i) पुरातत्त्वशास्त्र :
- नष्ट झालेल्या संस्कृतीच्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करणारे आणि ऐतिहासिक मूल्यमापनाचे शास्त्र म्हणजे 'पुरातत्त्व शास्त्र' होय.
- मानवी विकासाच्या अवस्था व संस्कृती यांचा अभ्यास करणे हे पुरातत्त्वविद्येचे उद्दिष्ट असते.
- या शास्त्रात सर्वेक्षण, उत्खनन आणि माहितीचे विश्लेषण या घटकांचा समावेश होतो.
- प्राचीन शिलालेख, ताम्रपट, नाणी, स्तंभ, भूर्जपत्रांवरील लेख, स्मृतिशिळा व उत्खननात सापडलेल्या सर्व वस्तू, हाडे, वास्तू या सर्वांचा अभ्यास व संशोधन पुरातत्त्वशास्त्रात केले जाते. यासाठी भारत सरकारचे पुरातत्त्व खातेही काम करते.
(ii) 'उर 'चे संग्रहालय :
- मेसोपोटेमियातील उर येथे उत्खनन करताना जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय सापडले.
- याचा शोध ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांना १९२२ ते १९३४ या काळात उत्खनन करताना लागला.
- मेसोपोटेमियाची राजकन्या एनिगॉल्डी हिने ते बांधले होते.
- प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे वर्णन केलेल्या मातीच्या वटिकाही मिळाल्या, हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य.
(iii) इंडियन म्युझियम :
- डॅनिश (डेन्मार्क) वनस्पतीशास्त्रज्ञ नॅथानिएल वॉलिक याने कोलकाता येथे या संग्रहालयाची स्थापना केली.
- १८१४ मध्ये एशियाटिक सोसायटीतर्फे हे म्युझियम सुरू झाले.
- कला, पुरातत्त्व व मानवशास्त्र असे या संग्रहालयाचे तीन प्रमुख विभाग आहेत.
(iv) अभिलेखागार :
- ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात.
- अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते.
- अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो.
- भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
- प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही असते.
(v) नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय) :
- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा 'माध्यम विभाग' म्हणून १९६४ साली या संस्थेची स्थापना झाली.
- पुणे येथे या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे.
- दुर्मीळ चित्रपटांचा शोध घेऊन त्यांचे जतन करणे, चित्रपटांशी संबंधित बाबींच्या नोंदी व संशोधन करणे आणि चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र स्थापन करणे या उद्देशाने ही
- संस्था स्थापन झाली.
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- 2 : इतिहासलेखन : भारतीय परंपरा - Online Notes Next Chapter : पाठ- 4 : भारतीय कलांचा इतिहास - Online Notes |