Notes-Marathi Medium-इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-४-भारतीय कलांचा इतिहास-Maharashtra Board

भारतीय कलांचा इतिहास

इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-४- महाराष्ट्र बोर्ड

नोट्स

अभ्यासघटक :

  • कला म्हणजे काय ?
  • भारतातील दृक्कला परंपरा
  • भारतातील ललित /आंगिक कला परंपरा
  • कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी

कला म्हणजे काय ? :

  • सहजप्रवृत्ती च्या प्रेरणेतून स्वतःचे अनुभव, भावभावना इतरांना सांगताना जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते, तेव्हा तिला 'कला' असे म्हटले जाते.
  • ही सौंदर्यपूर्ण कलानिर्मिती गायनातून, शिल्पांतून, कुंचल्यातून तर कधी वास्तुरचनेतून साकार होत असते.
  • कलानिर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात.

कलाप्रकार : दृक्कला आणि ललित कला :

  • दृक्कला : प्रागैतिहासिक काळातच दृक्कलांची निर्मिती झाली. अश्मयुगीन गुहांमधून दृक्कलांची अनुभूती येते. दृक्कलांमध्ये स्थापत्य, चित्रकला व शिल्पकला यांचा समावेश होतो.
  • ललित कला : ललित कलांना 'आंगिक कला' असेही म्हणतात. ललित कलांमध्ये नृत्य, गायन, नाट्य इत्यादी कलांचा समावेश होतो.

कलेच्या परंपरा : लोककला आणि अभिजात कला  

  • लोककला : अश्मयुगीन काळापासून लोककलांची परंपरा चालू आहे. लोककलांचा आविष्कार लोकांच्या रोजच्या जगण्याशी असून त्यांची अभिव्यक्ती उत्स्फूर्त असते.
  • अभिजात कला : ही कला नियमांच्या चौकटीत बांधलेली असून, ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण घ्यावे लागते.

कलाशैली :

  • जेव्हा एखादी पद्धत किंवा रीत, परंपरेचे स्वरूप धारण करते; तेव्हा त्या पद्धतीला किंवा रितीला 'कलाशैली' म्हणून ओळखले जाऊ लागते.
  • प्रत्येक कलाकाराची कलाशैली स्वतंत्र असते.
  • प्रत्येक संस्कृतीत त्या त्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडित अशा वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली निर्माण होतात.

भारतातील दृक्कला परंपरा :

दृक्कलांमध्ये स्थापत्य, चित्रकला व शिल्पकला यांचा समावेश होतो.

चित्रकला :

  • चित्रकला ही द्विमितीय (लांबी x रुंदी) असते.
  • चित्रकलेत निसर्गचित्रे, वस्तुचित्रे, व्यक्तिचित्रे, रेखाचित्रे इत्यादी अनेक प्रकारांचा समावेश होतो.
  • चित्रे भिंतींवर, कागदांवर, शिलाखंडांवर, कापडांवर, चामड्यांवर किंवा धातूंवर काढली जातात.

लोकचित्रकला शैली :

  • लोकचित्रकलेला अश्मयुगीन गुहाचित्रांपासून परंपरा लाभली आहे.
  • गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात.
  • मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रांना जागतिक सांस्कृतिक वारसास्थळांमध्ये स्थान मिळाले आहे.
  • गुहाचित्रांचे विषय व शैली काळाप्रमाणे बदलत गेली. तसेच रेखाटन पद्धतींत व रंगांत बदल झाले.
  • लग्नकार्य, सण-समारंभ या निमित्ताने चित्रे काढणे, रांगोळी काढणे, चित्रांतून आख्यायिका सांगणे अशा विविध परंपरांतून लोकचित्रकला शैली विकसित होत गेली. त्यावरून तत्कालीन समाजजीवनाचा अभ्यास करणे शक्य झाले.
लोकचित्रकला शैलीचे विविध प्रकार :

लोकचित्रकला शैलीचे विविध प्रकार :

(i) मराठा चित्रशैली.

इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.

  • सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.
  • या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.
  • वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
  • वाई, मेणवली, सातारा येथील प्राचीन वाड्यांच्या भिंतींवर या शैलीतील चित्रे पाहावयास मिळतात. भित्तिचित्रांचे विषय मुख्यतः पौराणिक आहेत. चुन्याचा पातळ गिलावा देऊन त्यावर चित्रकाम केले जाई. वनस्पतिजन्य अथवा खनिज रंगांनी चित्रे रंगवली जात असत.
  • या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.

(ii) वारली चित्रशैली :

  • महाराष्ट्रातील वारली जमातीतील ही आदिवासी चित्रशैली.
  • ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • वारली चित्रांमध्ये एक वर्तुळ, एक त्रिकोण आणि एक चौरस असतो. त्यांच्या साहाय्याने माणूस, पशू वा अन्य वस्तू दर्शवल्या जातात.
  • वारली चित्रकलेत सर्व रेखाचित्रे असतात.
  • चित्रकाराच्या निसर्ग निरीक्षणातून सूर्य, चंद्र, पर्वत, झाडे, झोपड्या दाखवलेल्या असतात.
  • वारली कलाकार सहसा आपल्या परिसराबाहेरील प्रतिमांची चित्रे काढत नाहीत.
  • ही चित्रे बहुधा झोपड्यांमध्ये आढळतात.
  • लाल गेरूने रंगवलेल्या भिंतींवर पांढऱ्या रंगाने ते चित्रे काढतात. त्यासाठी पांढरे रंगद्रव्य व त्याला घट्टपणा येण्यासाठी तांदळाच्या पिठाची पेस्ट व डिंक वापरला जातो. बांबूच्या काडीने चित्रे काढली जातात.
  • विवाहसोहळा, धार्मिक विधी या प्रसंगी हे लोक चित्रे काढतात.
  • १९७० नंतर या चित्रकलेची जगभर ओळख झाली.

(iii) चित्रकथी परंपरा (पिंगुळ चित्रपरंपरा) :

  • कठपुतळ्या किंवा याच्या चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा'.
  • या परंपरेची माहिती चालुक्य राजा सोमेश्वर याने बाराव्या शतकात लिहिलेल्या 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थचिंतामणी' या ग्रंथात आढळते.
  • कोकणातील पिंगुळी गावातील ठाकर आदिवासींनी ही परंपरा जपली आहे. म्हणून तिला 'पिंगुळ चित्रपरंपरा' असेही म्हणतात.
  • चित्रकथी परंपरेत कागदावर चित्रे काढून ती नैसर्गिक रंगांत रंगवली जातात. साधारणतः ३० ते ५० चित्रांत एक कथा पूर्ण केली जाते. ही परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

[collapse]

अभिजात चित्रकला :

  • ज्या कला प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेल्या असतात, त्या कलांना 'अभिजात कला' असे म्हणतात.
  • प्राचीन भारतीय वाङ्मयात ६४ कलांचा उल्लेख आहे.
  • त्यांपैकी चित्रकलेचा उल्लेख 'आलेख्यम्' किंवा 'आलेख्य विद्या' या नावाने केलेला आहे.
  • आलेख्य विद्येची षडांगे म्हणजेच सहा पैलू दिलेले आहेत-(i) रूपभेद (ii) प्रमाणबद्ध रचना (iii) भावप्रदर्शन (iv) लावण्ययोजन (v) सादृश्यता (vi) रंगांचे आयोजन यांचा या षडांगांत समावेश होतो.
  • जैन धर्मीयांच्या आगमग्रंथांत आणि पुराणांमध्ये मंदिरांच्या बांधणीच्या संदर्भात अभिजात चित्रकलेचा विचारही मांडला गेला आहे.

हस्तलिखितांमधील लघुचित्र :

  • लहान आकाराच्या चौकटीतील चित्राला 'लघुचित्र' असे म्हणतात.
  • हस्तलिखित पोथ्यांच्या माध्यमांतून ही लघुचित्रे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली.
  • हस्तलिखितांमधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता.
  • अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्र-शैलीचा उदय झाला.
  • दक्षिणेकडील मुस्लीम राजवर्टींच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली.
  • धार्मिक आशय सहजसुलभ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात ही लघुचित्रे यशस्वी ठरली.
  • भित्तिचित्रशैलीपेक्षा हस्तलिख्वित पोथ्यांमधील लघुचित्रशैली वेगळी व वैशिष्टयपूर्ण ठरली.

युरोपीय चित्रशैली :

  • ब्रिटिश राजवटीत भारतीय चित्रशैलीवर युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
  • सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स याच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यात एक कलाशाळा स्थापन केली होती. वेल्सच्या सोबत गंगाराम तांबट हा मराठी चित्रकार काम करीत होता.
  • चित्रकार गंगाराम तांबट यांनी वेरूळ, कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या ‘येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट’ येथे जतन केलेली आहेत.
  • मुंबईत १८५७ साली पाश्चात्त्य कलाशैलीचे शिक्षण देण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अॅन्ड इंडस्ट्रीची स्थापना झाली.
  • पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले.
  • चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण करणे हे पाश्चात्त्य चित्रशैलीचे वैशिष्ट्य समजले जाते.

शिल्पकला :

  • शिल्पकला ही त्रिमितीय (लांबी x रुंदी x खोली) असते. उदा., मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी किंवा वस्तू.
  • दगड, धातू आणि माती यांचा उपयोग करून शिल्पे बनवली जातात किंवा कोरली जातात.
  • वेरूळचे कैलास लेणे हे दगडी शिल्प एका अखंड शिलाखंडातून कोरलेले आहे.
  • सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चार सिंहांचे शीर्षशिल्प हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे.

लोकशिल्पकला शैली :

  • लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे, देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत.
  • हीच परंपरा पुढे भारतभर चालू राहिली. गणेशमूर्ती, गौरींचे मुखवटे, मातीचे बैल, लाकडी मुखवटे, धान्य साठवण्याच्या कोठ्या इत्यादी लोकशिल्पकलेचेच नमुने होत.
  • पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पाहावयास मिळतात.
  • आजही बंगाल, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या मूर्ती तयार केल्या जातात.
  • अशा रितीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरीतून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला.

अभिजात शिल्पकला शैली :

  • भारतीय शिल्पकलेचा प्रारंभ हडप्पा संस्कृतीतील मुद्रा, दगडी व कांस्य पुतळे यांच्या निर्मितीपासूनच झाला.
  • मौर्य सम्राट अशोकाने निर्मिलेल्या स्तंभांपासून भारतात कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला सुरुवात झाली.
  • मध्य प्रदेशातील सांची व भारहूतचे स्तूप अशोकाच्या काळात उभारले गेले.
  • इंडोनेशियातील बोरोबुदुर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप असून, त्याला १९९१ साली युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले.

भारतीय मूर्तिविज्ञान :

  • इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन यांच्या प्रभावातून गांधार शिल्पकलाशैलीचा उदय झाला.
  • कुशाण काळात स्थानिक कलाशैली व गांधार शैली यांच्या मिलाफातून मथुरा शिल्पशैलीचा उदय झाला.
  • मथुरा शिल्पशैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला गेला.
  • कुशाणांच्या नाण्यांवर प्रथम देवीदेवतांच्या प्रतिमांचा उपयोग करण्याची प्रथा सुरू झाली.
  • गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले.
  • इसवी सनाच्या नवव्या ते तेराव्या शतकांत चोळ राजांच्या काळात देवतांच्या कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली.

स्थापत्य व शिल्पकला :

(i) कोरीव लेणी :

  • इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकापासूनच भारतात कोरीव लेण्यांची परंपरा सुरू झाली.
  • लेण्यांमध्ये स्थापत्य आणि कोरीव शिल्पकलेचा संगम आढळतो.
  • लेण्यांची प्रवेशद्वारे, आतील खांब आणि मूर्ती शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत.
  • लेण्यांच्या भिंती आणि छते उत्तम चित्रकारीने नटलेली असतात.
  • भारतात अनेक ठिकाणी व विशेषत्वाने महाराष्ट्रात बौद्ध, जैन व हिंदू लेणी आहेत.
  • १९८३ मध्ये अजिंठा आणि वेरूळ या लेण्यांना जागतिक वारशाचा दर्जा मिळाला.

 (ii) मंदिर स्थापत्य :

  • इसवी सनाच्या चौथ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात झाली.
  • गाभारा व बाहेर चार स्तंभ असलेली ओसरी एवढेच त्याचे स्वरूप होते.
  • वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून आठव्या शतकात ही शैली पूर्ण विकसित झाल्याचे दिसते.
  • मध्ययुगीन काळापर्यंत शिखरांच्या रचनावैशिष्ट्यांनुसार मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या.
  • उत्तर भारतात 'नागर', तर दक्षिणेत 'द्राविड' शैली प्रमुख मानल्या जातात.
  • 'नागर' व 'द्राविड' या शैलींच्या मिश्रणातून 'वेसर' शैलीचा उदय झाला.
  • मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रात 'भूमिज' आणि 'नागर' अशा दोन मंदिर स्थापत्यशैली विकसित झाल्या.

(iii) हेमाडपंती स्थापत्यशैली :

प्रामुख्याने बाराव्या-तेराव्या शतकात यादवकाळात महाराष्ट्रात हेमाडपंती मंदिरांची बांधणी झाली.

  • हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चुन्याने वा मातीने भरले जात नाहीत. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंती उभारल्या जातात.
  • हेमाडपंती मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते.
  • तारकाकृती मंदिरांच्या बाह्य भिंती अनेक कोनांमध्ये विभागलेल्या असतात.
  • अनेक कोनांमध्ये विभागलेल्या भिंतींच्या रचनेमुळे मंदिराच्या बांधणीवर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहायला मिळतो.
  • या दगडी भिंतींवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात. महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंती शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात.
  • अंबरनाथ येथील अंब्रेश्वर (शिवमंदिर), सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ अशी महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे उभी आहेत.

(iv) मुस्लीम स्थापत्य :

  • मध्ययुगीन भारतात पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि भारतीय अशा सर्व शैलींच्या मिश्रणांतून मुस्लीम स्थापत्यशैली विकसित झाली.
  • कुतुबमिनार, ताजमहाल आणि गोलघुमट ही या शैलीची उत्तम उदाहरणे.
  • कुतुबमिनार व ताजमहाल या वास्तू युनेस्कोने जागतिक वारसास्थळे म्हणून जाहीर केल्या आहेत.
  • कुतुबमिनार सर्वाधिक उंच मिनार (उंची ७३ मीटर) म्हणून; ताजमहाल देखणी वास्तू म्हणून; तर गोलघुमट प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे.

(v) इंडो-गॉथिक स्थापत्यशैली :

  • गॉथिक स्थापत्यशैलीचा उगम फ्रान्समध्ये बाराव्या शतकात झाला.
  • भारतात इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यानंतर भारतीय स्थापत्यशैली आणि गॉथिक स्थापत्यशैली यांच्या मिश्रणातून इंडो-गॉथिक स्थापत्यशैली उदयाला आली.
  • भारतात ब्रिटिश काळात अनेक चर्च, सरकारी कचेऱ्या, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन्स यांच्या इमारती इंडो-गॉथिक स्थापत्यशैलीत बांधल्या गेल्या.
  • मुंबईतील 'छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस' ही प्रसिद्ध इमारत याच स्थापत्यशैलीत बांधलेली आहे. ही इमारत जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट केलेली आहे.
  • ब्रिटिश काळात भारतात या शैलीत अनेक सरकारी इमारती, चर्चेस, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन्स अशा वास्तू उभारल्या गेल्या.

भारतातील ललित /आंगिक कला परंपरा

  • शेकडो वर्षांच्या कालखंडात ग्रीक, अरब, मुघल, ब्रिटिश असे अनेक शासक भारतात आले.
  • त्यांच्या राजवटीत भारतीय लोकांचा त्यांच्या ललितकलांशीही संबंध आला.
  • या संबंधांमुळे कलांच्या सादरीकरणामध्येही अनेक प्रवाह मिसळत गेले.
  • त्यातून गायन, वादन, नृत्य यांच्या नवनव्या शैली निर्माण झाल्या. त्यामूळे भारतीय ललितकला अधिकाधिक समृद्ध होत गेल्या.

लोककलेच्या परंपरा :

  • लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्य अशा लोककलेच्या विविध परंपरा भारतभर अस्तित्वात आहेत.
  • धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून लोककला विकसित झाल्या.
  • महाराष्ट्रात कोळीनृत्य, तारपानृत्य, कोकणातील दशावतार तसेच पोवाडा, कीर्तन, जागर-गोंधळ, लोकनाट्य (तमाशा) अशा विविध लोककला अस्तित्वात आहेत.

अभिजात कलेच्या परंपरा :

नाटक :

  • भरतमुनींचा 'नाट्यशास्त्र' हा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ मानला जातो.
  • या ग्रंथात वादन, नर्तन, नाट्य व गायन यांची चर्चा आहे.
  • अभिजात नाटयप्रकारात व ललित कलांमध्ये मुख्य नऊ रस मानले जातात.

संगीत व गायन :

  • हिंदुस्थानी संगीत व कर्नाटक संगीत अशा भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन मुख्य परंपरा आहेत.
  • शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन असे गायनाचे दोन भेद आहेत.
  • उपशास्त्रीय गायनात लोकगीत शैलींचा समावेश होतो.
  • पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे संगीत व गायनाचे अनेक महोत्सव साजरे होत असतात.

नृत्य :

  • भारतात विविध ठिकाणी विविध नृत्यशैली अस्तित्वात आहेत.
  • नृत्य सादरीकरणात शास्त्रीय गायन-वादन यांचा मेळ घातलेला असतो.
  • भारतातील प्रसिद्ध नृत्यशैली : (i) उत्तर भारत-कथ्थक (ii) महाराष्ट्र-लावणी (iii) ओडिशा-ओडिसी भरतनाट्यम् (v) आंध्र-कुचिपुडी (vi) केरळ-कथकली व मोहिनीअट्टम.
  • उदय शंकर यांनी पाश्चात्त्य नृत्य व संगीत यांचा भारतीय संगीताशी मेळ घालण्याचा प्रयत्न केला.

कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी :

कला :

कलेच्या इतिहासाच्या तज्ज्ञांची आवश्यकता :

  • पत्रकारितेच्या क्षेत्रात.
  • कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवहारात, कलेचे मूल्य
  • ठरवण्यासाठी व वस्तूंची पारख करण्यासाठी.
  • सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी.
  • सांस्कृतिक पर्यटन व्यवसायात मार्गदर्शक म्हणून.
  • संग्रहालये, अभिलेखागारे व ग्रंथालये यांमध्ये.
  • पुरातत्त्व विभागात तंत्रज्ञ व संशोधक म्हणून.

उपयोजित कला :

  • रसिकांनी रसास्वाद घ्यावा म्हणून दृक् आणि ललित कलांची निर्मिती केली जाते.
  • कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांचा मेळ घालून अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते.
  • उपयुक्तता हा हेतू समोर ठेवून कलानिर्मिती करणे म्हणजेच 'उपयोजित कला' होय.

उपयोजित कलेची क्षेत्रे :

उपयोजित कलाक्षेत्रात पुढील व्यवसायांचा समावेश होतो :

  • औद्योगिक क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट व दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी लागणारे तंत्रज्ञ इत्यादी.
  • मुद्रणक्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्या निर्मितीसाठी लागणारे तज्ज्ञ तसेच संगणकावर काम करणारे तंत्रज्ञ.
  • भेटकार्डे, आमंत्रणपत्रिका, भेटवस्तू तसेच घरसजावटीच्या वस्तू तयार करणे.
  • दागदागिने, मौल्यवान कलावस्तू, मातीची भांडी, वेताच्या, काचेच्या कलापूर्ण वस्तू, कापड व कापडी वस्तू यांची निर्मिती.

उपयोजित कलाक्षेत्रात जाणकारांची आवश्यकता :

  • उपयोजित कलाक्षेत्रात कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालून वस्तुनिर्मिती करावी लागते.
  • वस्तुनिर्मितीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे पार पाडावे लागतात.
  • कलावस्तूंचे उत्पादन करताना सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा माहीत असाव्या लागतात.
  • सजावटीच्या वस्तू, दागदागिने, काच-लाकूड यांच्या वस्तू, भेटवस्तू इत्यादी उपयोजित कलाक्षेत्रातील वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती असणारे जाणकार हवे असतात.

म्हणून वस्तुनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित व कुशल व्यक्तींची, जाणकारांची आवश्यकता असते.

प्रशिक्षण संस्था :

  • उपयोजित कलाक्षेत्रांमध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतभर आहेत.
  • गुजरातमध्ये 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन' ही अहमदाबाद येथील प्रशिक्षण संस्था, तसेच मुंबई येथील 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट' या संस्था प्रसिद्ध आहेत.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on below link to Download PDF from store

PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-४-भारतीय कलांचा इतिहास-नोट्स

PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-४-भारतीय कलांचा इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *