प्रसारमाध्यमे आणि इतिहास
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-५- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :
|
प्रसारमाध्यमांची ओळख :
(१) पूर्वीची साधने :
- पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहचवायची असेल तर गावोगाव दवंडी पिटवली जात असे. त्यासाठी कित्येक दिवस लागायचे.
- एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा बातमीचा तोंडी प्रवास होत असे.
प्रसारमाध्यमांचा इतिहास :
ब्रिटिशकाळात भारतात वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू होऊन छापील स्वरूपात बातम्या लोकांपर्यंत जाऊ लागल्या. वर्तमानपत्र हे माहितीचे आणि ज्ञानाचेही साधन बनले.
वर्तमानपत्रे :
- देनंदिन बातम्या, माहितीपर अग्रलेख व लेख नियमितपणे रोजच्या रोज छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे 'वर्तमानपत्र' होय.
- प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात.
- वृत्तपत्रे ही चालू घडामोडींचा ऐतिहासिक दस्तऐवज असतो.
- वृत्तपत्रांत बातम्या, लेख, स्तंभलेख, अग्रलेख इत्यादींना महत्त्व असते. वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात. त्यांना 'दैनिक' असेही म्हटले जाते.
- आधुनिक काळात प्रत्येक वृत्तपत्राने इ-वृत्तपत्र सुरू केले आहे.
उद्देश :
- स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या बातम्या ताबडतोब पुरवणे, हा वृत्तपत्रांचा मुख्य हेतू असतो.
- वृत्तपत्रे विशिष्ट विषयाला बांधलेली नसतात. समाजात घडणाऱ्या सर्व घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात.
- वृत्तपत्रांचे महत्त्व तात्कालिक असते. लोकमत घडवणे, जागृत करणे आणि शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे हे वृत्तपत्रांचे हेतू असतात.
वर्तमानपत्रांचे पूर्वसूरी :
वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर पुढील मार्ग अवलंबले जात असत -
- इजिप्तमध्ये सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात असत.
- प्राचीन रोमन साम्राज्यात देशातील महत्त्वाच्या घटना, सरकारी हुकूम कागदावर लिहून ते कागद प्रांतोप्रांती वाटत असत. ज्युलियस सीझरच्याकाळी 'अॅक्टा डायर्ना' (रोजच्या घटना) नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत असत.
- चीनमध्ये सातव्या शतकात सरकारी निवेदने सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत.
- इंग्लंडमधील लढायांची किंवा महत्त्वाच्या घटनांची पत्रके प्रवासी, फिरस्ते व अन्य लोकांना वाटत असत.
- पूर्वी भारतात राजाला एखादी बातमी किंवा आदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल; तर राजाचे लोक गावोगावी दवंडी पिटवत असत
- राजाचा कायमस्वरूपी आदेश असेल; तर तो सर्वांना कळावा म्हणून दगडावर कोरला जात असे व तो शिलालेख गावाच्या मध्यभागी ठेवला जात असे.
अशा रितीने अनेक राज्यांत राजांचे राज्यभरातील प्रतिनिधी राजांचे आदेश जनतेपर्यंत व राज्यातील महत्त्वाच्या बातम्या राजांपर्यंत पोहोचवत असत.
बेंगॉल गॅझेट :
- २९ जानेवारी १७८० रोजी कोलकाता येथे सुरू झालेले हे पहिले भारतीय वृत्तपत्र.
- जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने इंग्रजी भाषेतील हे वृत्तपत्र सुरू केले.
- 'कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर' म्हणूनही ते ओळखले जात असे.
- हे वृत्तपत्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध होते.
- बेंगॉल गॅझेटने भारतातील वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.
प्रारंभीची मराठी वृत्तपत्रे :
दर्पण : ‘
- पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण’ हे ६ जानेवारी १८३२ साली मुंबईत सुरू झाले. म्हणून ६ जानेवारी हा दिवस 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.
- बाळशास्त्री जांभेकर हे ‘दर्पण’चे संपादक होते.
- दर्पणमधून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक इतिहास सापडतो.
- कंपनी सरकारचा जमाखर्च, रशियाच्या हल्ल्याचे भय, हिंदू विधवा पुनर्विवाह, राजा राममोहन रॉय यांची कामगिरी, स्वच्छता इत्यादी विषय दर्पणने हाताळलेले दिसतात. यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पडतो.
प्रभाकर :
- हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी २४ ऑक्टोबर १८४८ साली सुरू केले.
- त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास वाचायला मिळतो.
- 'प्रभाकर' मधून लोकहितवादींची (गोपाळ हरी देशमुख) समाजप्रबोधनपर 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
ज्ञानोदय :
हे वर्तमानपत्र जून १८४२ साली अहमदनगर येथील ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केले. रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते. यात,
- आशिया-युरोप या खंडांचे नकाशे प्रसिद्ध झाले.
- 'ज्ञानोदय' या मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र प्रसिद्ध झाले.
- टेलिग्राफ या बातम्या पोहोचवणाऱ्या यंत्राची बातमी दिली.
- भारतात पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी दिली.
- १८५७ च्या संघर्षाची बातमी प्रसिद्ध झाली.
इंदुप्रकाश (जानेवारी १८६२) :
- हे वर्तमानपत्र जानेवारी १८६२ साली लोकहितवादींच्या पुढाकाराने सुरू झाले.
- इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे, तर मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते.
- ‘इंदूप्रकाश’ पत्राने समाजप्रबोधनाचे कार्य केले.
- विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला.
दीनबंधू :
महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र १ जानेवारी १८७७ साली सुरू केले.
- बहुजन समाजाचे मुखपत्र.
- या पत्रातून आपणांस बहुजन समाजाची तत्कालीन परिस्थिती समजते.
केसरी व मराठा :
गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे १८८१ साली सुरू केली.
- या वृत्तपत्रांचे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान आहे.
- या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांत जागृती घडवून आणली. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.
- तत्कालीन देशस्थितीवर प्रकाश टाकून सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर विचारमंथन केले.
- बालविवाह, पुनर्विवाह अशा विषयांवर मते मांडली.
- देशभाषेतील ग्रंथ, पाश्चात्त्य ग्रंथ, विद्या यांवर चर्चा केली व त्यांतील विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
- एतद्देशीय आणि विलायतेतील राजकारण यांसंबंधी लेखन केले.
- ज्ञानप्रसाराबरोबरच नीतिमूल्यांची जोपासना केली. वाईट रूढीपरंपरा यांच्यावर प्रखर टीका करून समाजप्रबोधन केले.
नियतकालिके :
अर्थ व प्रकार :
- ठरावीक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे 'नियतकालिक' होय.
- प्रसिद्धीच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक असे प्रकार पडतात. अनियतकालिक हा प्रकार देखील असतो.
उद्देश :
- नियतकालिकांमध्ये ताज्या बातम्यांना महत्त्व नसते.
- नियतकालिके विषयांना प्राधान्य देऊन त्यांवर लेख प्रसिद्ध करतात.
- प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांना साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक इत्यादी म्हटले जाते.
- बातम्या न पुरवता मनोरंजक व ज्ञानवर्धक मजकूर पुरवणे, हा नियतकालिकांचा हेतू असतो.
- नियतकालिके विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात. वाङ्मयीन भाषा, लिखाणपद्धती आणि बाह्यस्वरूप या दृष्टीने नियतकालिके वृत्तपत्रांपेक्षा वेगळी असतात.
विविध विषयांची विपुल माहिती दिली जात असल्याने नियतकालिके अभ्यासाची, संशोधनाची आणि इतिहासाची महत्त्वपूर्ण साधने मानली जातात.
प्रारंभीची नियतकालिके :
- १८४० साली बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील 'दिग्दर्शन' हे पहिले मासिक सुरू केले.
- त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी १९२९ मध्ये 'प्रगती' हे साप्ताहिक सुरू केले.
- 'भारतीय इतिहास आणि संस्कृती' व 'मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका' ही आधुनिक काळातील नियतकालिके होत.
- नियतकालिकांमधून अर्थ, सामाजिक रूढी-परंपरा, समस्या, पर्यावरण आदी सर्व विषय हाताळले जातात.
वेब पत्रकारिता :
- संगणक व इंटरनेटच्या माध्यमांतून केल्या जाणाऱ्या पत्रकारितेस 'वेब पत्रकारिता' असे म्हणतात.
- वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यू-ट्यूब या वेब पत्रकारितेतून वाचकांसाठी भरपूर मजकूर उपलब्ध होतो.
माहीतीसाठी :
नियतकालिके :
इ-वृत्तपत्रे :
|
आकाशवाणी :
- १९२१ साली अमेरिकेतील पिट्सबर्ग येथे जगातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले.
- १९२२ साली ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी स्थापन झाली. त्यानंतर आकाशवाणीचा जगात विस्तार झाला.
- आकाशवाणीचा प्रारंभ भारतात मद्रास (चेन्नई) येथे झाला. आकाशवाणीला प्रथम 'नभोवाणी' म्हटले जायचे.
- १९३५ मध्ये म्हैसूर संस्थानाने आपल्या रेडिओ केंद्रास 'आकाशवाणी' असे नाव दिले. हेच नाव पुढे भारत सरकारने सर्व रेडिओ केंद्रांना दिले. 'बहुजन हिताय, बहजन सुखाय' हे भारताच्या आकाशवाणीचे ब्रीदवाक्य आहे.
विकासाची वाटचाल :
- जुलै १९२४ मध्ये मद्रास (चेन्नई) येथे प्रथम एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
- ब्रिटिश सरकारने 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC)' स्थापन केली. याच कंपनीचे पुढे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस (ISBS) असे नामकरण केले.
- पुढे ८ जून १९३६ रोजी याच कंपनीचे 'ऑल इंडिया रेडिओ (AIR)' असे नामकरण झाले.
- स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले.
- पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले.
उद्देश :
- विविध क्षेत्रांतील बातम्या देणे
- संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे
- कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे
- व्याख्यानांद्वारे, चर्चांद्वारे पर्यावरण-संस्कृती संवर्धनाविषयीचे कार्यक्रम सादर करणे.
आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे स्वरूप :
- आकाशवाणीवर सुरुवातीस शासकीय कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती दिली जात असे.
- नंतर मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जाऊ लागले.
- शेतकरी, कामगार, युवा, महिला, मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर होतात.
- 'विविधभारती' या सेवेद्वारे २४ भाषा व १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात.
- 'रेडिओ मिर्ची' सारख्या अनेक खासगी रेडिओ सेवाही (एफ. एम.) चालू झाल्या आहेत,
दूरदर्शन :
प्रक्षेपकामार्फत किंवा उपग्रहामार्फत चित्र आणि आवाज दूर अंतरावर पोहोचवणाऱ्या दृक्-श्राव्य माध्यमाला 'दूरदर्शन' असे म्हणतात.
विकासाची वाटचाल :
- १९५९ साली भारतात दूरदर्शनची सुरुवात झाली. १५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले.
- सुरुवातीचे 'दूरचित्रवाणी' हे नाव बदलून 'दूरदर्शन' असे केले गेले. प्रत्येक घटकराज्यात दूरदर्शनची केंद्रे सुरू झाली. महाराष्ट्रात २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले.
- १५ ऑगस्ट १९८२ रोजी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. १९८३ मध्ये राष्ट्रीय प्रक्षेपणाला सुरुवात होऊन दूरदर्शनच्या डी. डी. मेट्रो, स्पोर्टस्, न्यूज इत्यादी वाहिन्या व दहा प्रादेशिक वाहिन्या सुरू झाल्या.
- आतापर्यंत केंद्र सरकारचीच मालकी असलेल्या या क्षेत्रात खासगी वाहिन्यांना परवानगी मिळाली. १९९१ मध्ये परदेशी व भारतीय खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रक्षेपित करता येऊ लागले.
- सध्या भारतात राष्ट्रीय आणि प्रादेशिक अशा १००० हून अधिक वाहिन्या कार्यक्रम प्रक्षेपित करीत असतात.
- खेळ, बातम्या, गाणी व चित्रपट, धार्मिक व मनोरंजनपर कार्यक्रम अशा विषयांना वाहिलेल्या स्वतंत्र व विविध भाषांतून चालणाऱ्या वाहिन्या चोवीस तास कार्यक्रम प्रक्षेपित करीत असतात.
उद्देश :
- मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे
- लोकशिक्षण करणे
- समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे
- सामाजिक समस्यांबाबत व वाईट रूढी-परंपरांविरुद्ध समाजप्रबोधन करणे.
कार्यक्रमांचे स्वरूप व लोकप्रियता :
- दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलच्चित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय.
- सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात.
- खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात.
- रंगीत संच, रिमोटचा वापर, घटनांचे सजीव दृश्यरूप व प्रत्यक्ष प्रसारण, बातम्या यांमुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. म्हणून सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.
प्रसारमाध्यमांची आवश्यकता :
- प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो.
- प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते.
- माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते..
- लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी. समाजात काय घडते आहे, हे लोकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी. लोकशिक्षण आणि समाजप्रबोधन करण्यासाठी प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत.
प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन :
- प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीची खातरजमा करावी लागते.
- वर्तमानपत्रांतून येणारी माहिती वा दूरदर्शनवरून दाखवली जाणारी दृश्ये वास्तवाला धरून असतीलच असे नाही.
- जर्मनीतील हॅम्बुर्ग शहरातील 'स्टर्न' साप्ताहिकात अडॉल्फ हिटलरची स्वहस्ते लिहिलेली रोजनिशी मिळाल्याची बातमी छापून आली. परंतु पुढे ती रोजनिशी बनावट निघाली.
संबंधित व्यावसायिक क्षेत्रे :
- वर्तमानपत्रे : संपादक, वार्ताहर, मुद्रक, लेखक, छायाचित्रकार, तंत्रज्ञ, संगणक तज्ज्ञ, कार्यालयीन कर्मचारी इत्यादी.
- आकाशवाणी : केंद्र प्रमुख, कर्मचारीवर्ग, वार्ताहर, निवेदक, मुलाखतकार, वृत्त संकलक, स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ, व्यवस्थापक इत्यादी.
- दूरदर्शन : पत्रकार, वृत्तसंकलक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, कॅमेरामन, कलानिर्देशक, प्रकाश व्यवस्था पाहणारे तंत्रनिर्देशक, संगीत निर्देशक, कलाकार, मुलाखतकार, रंगभूषातज्ज्ञ इत्यादी.
प्रसारमाध्यमांतील इतिहासाची उपयोजिता :
वर्तमानपत्रे :
- एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना.
- बातमीमागची बातमी (मागील पार्श्वभूमी) देताना वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.
- ऐतिहासिक घटनांची 'पन्नास-शंभर वर्षांपूर्वी' अशा सदरांत माहिती देण्यासाठी वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात.
- आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांचा आढावा घेताना भूतकालीन संदर्भ देतात.
अशा वेळी संबंधित घटनांचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. कोडी, मनोरंजन यांसाठीसुद्धा इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.
आकाशवाणी :
आकाशवाणीसाठी इतिहास या विषयाची गरज :
- स्वातंत्र्यदिन-प्रजासत्ताकदिन अशा प्रसंगी पूर्वीच्या पंतप्रधानांच्या वा राष्ट्रपतींच्या भाषणांचे संदर्भ देताना.
- नेत्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, सुवर्णमहोत्सवी, शतकमहोत्सवी वर्ष अशा प्रसंगी त्यांची माहिती प्रसारित करताना.
- दिनविशेष सांगताना, सामाजिक, सांस्कृतिक विशेष सांगताना.
- ऐतिहासिक प्रसंग, व्यक्ती यांच्यावर कार्यक्रम सादर करताना किंवा चर्चा करताना द्यायचे दाखले या प्रसंगी इतिहासाचा अभ्यास उपयुक्त ठरतो.
दूरदर्शन :
दूरदर्शनसाठी इतिहास या विषयाची गरज :
- पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका तयार करताना तत्कालीन परिस्थिती, पोशाख, शस्त्रास्त्रे, राहणीमान, भाषा, वागण्याच्या पद्धती इत्यादी समजून घेण्यासाठी.
- सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बाबींवर चर्चा करताना.
- खेळाडू, सेनानी, कर्तृत्ववान स्त्री-पुरुष, समाजसेवक, किल्ले, वास्तु इत्यादींवर कार्यक्रम तयार करताना इतिहासाचे ज्ञान असावे लागते.
भारत : एक खोज :
भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली ‘भारत एक
खोज’ ही मालिका पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारित होती.
या मालिकेत प्राचीन भारत ते अर्वाचीन भारत या दीर्घ कालखंडातील समाजजीवनातील सर्व घटनांची मांडणी केलेली आहे.
- हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, रामायण-महाभारताचा अन्वयार्थ, जैन-बौद्ध धर्मांचा विकास इत्यादी धार्मिक बाबी मांडल्या गेल्या.
- मौर्य-सातवाहन इत्यादी राजवटी, त्याआधी असलेली महाजनपदे व गणराज्ये यांची माहिती दिली गेली.
- भारतावरील तुर्क-अफगाण आणि मुघल यांची आक्रमणे, मुघल कालखंड व त्याचे भारतावर झालेले परिणाम हे विषय आहेत.
- भारतातील भक्तिचळवळी, संप्रदाय यांवर प्रकाश टाकला आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि भारताचा स्वातंत्र्यसंग्राम यांचे वर्णन केले आहे.
- यांखेरीज सर्व राजवटींदरम्यानची भारतातील समाजस्थिती, कला, सांस्कृतिक जीवन, सामाजिक-राजकीय चळवळी इत्यादी सर्व माहिती या मालिकेमधून प्रभावीपणे मांडली गेली आहे.
नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे प्रभावी सादरीकरण यामुळेही मालिका संपूर्ण भारतभर वाखाणली गेली.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-५-प्रसारमाध्यमे आणि इतिहास-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-५-प्रसारमाध्यमे आणि इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- ४ : भारतीय कलांचा इतिहास - Online Notes Next Chapter : पाठ- ६ : मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास - Online Notes |