मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-६- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :
|
मनोरंजनाची साधने :
- मनोरंजनाची साधने म्हणजे मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी.
- निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन-वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो.
- उत्सव, मेळे, सण-समारंभ, खेळ, नाच-गाणे ही प्राचीन व मध्ययुगातील मनोरंजनाची साधने होती.
- बदलत्या काळाप्रमाणे मनोरंजनाच्या साधनांतही बदल होत गेले. टी. व्ही, मोबाइल, व्हिडिओ गेम्स, चित्रपट अशी आधुनिक काळातील मनोरंजनाची साधने आहेत.
- व्यक्तीचे वय, आवड आणि आर्थिक स्थिती यांप्रमाणे मनोरंजनाच्या साधनांत बदल होतात.
मनोरंजनाची आवश्यकता :
- मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते.
- चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते.
- मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
- मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.
म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते.
मनोरंजनाचे प्रकार :
मनोरंजनाचे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते :
(i) कृतिशील मनोरंजन : एखाद्या क्रियेत, खेळात, कलेत जेव्हा व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग असतो, तेव्हा त्याला 'कृतिशील मनोरंजन' असे म्हणतात.
(ii) अकृतिशील मनोरंजन : कोणत्याही क्रियेत किंवा रंजनात प्रत्यक्ष भाग न घेता प्रेक्षकाची भूमिका घेऊन रंजन करणे म्हणजे 'अकृतिशील मनोरंजन' होय.
- प्रत्यक्ष क्रिकेट खेळणे हे कृतिशील मनोरंजन होय; तर क्रिकेटचा सामना किंवा चित्रपट पाहणे हे अकृतिशील मनोरंजन होय.
- उत्सव, मेळे, नाच-गाणे यांत प्रत्यक्ष भाग घेणे हे कृतिशील मनोरंजन; तर या सर्वांचा प्रेक्षक म्हणून आनंद लुटणे हे अकृतिशील मनोरंजन होय.
लोकनाट्य :
लोकनाट्याचा प्रकार :
(i) कठपुतळ्यांचा प्रयोग (खेळ) :
- उत्खननात सापडलेल्या मातीच्या बाहुल्यांच्या अवशेषांवरून प्राचीन ग्रीक, इजिप्शियन व भारतीय संस्कृतींत कठपुतळ्यांचे खेळ होत असावेत असे दिसते.
- पंचतंत्र, महाभारत अशा प्राचीन ग्रंथांतही या खेळाचा उल्लेख आहे. महाभारतात चौसष्ट कलांपैकी एक कला म्हणून कळसूत्री बाहुल्यांचा उल्लेख आलेला आहे. यावरून बाहुल्यांचा खेळ हा सार्वत्रिक आणि प्राचीन खेळ आहे, हे सिद्ध होते.
- भारतात राजस्थानी व दाक्षिणात्य अशा बाहुल्या बनवण्याच्या दोन पद्धती आहेत.
- राजस्थानी पद्धतीच्या बाहुलीला 'कठपुतळी' असे म्हणतात. या बाहुल्या प्रामुख्याने लाकडी असून त्यावर कापड व कातडे यांचा वापर केला जातो. दाक्षिणात्य बाहुल्या आकाराने मोठ्या असतात.
- राजस्थानी पद्धतीत ऐतिहासिक व्यक्ती व प्रसंगांवर भर असतो; तर दाक्षिणात्य पद्धतीत पौराणिक प्रसंगांना प्राधान्य असते.
- कठपुतळ्यांच्या प्रयोगात सूत्रधाराचे कौशल्य महत्त्वाचे असते. बाहुल्यांना काळ्या धाग्याने जोडून प्रेक्षकांना न दिसेल अशा पद्धतीने कलाकार बोटांच्या हालचालींनी बाहुल्यांना नाचवत असतो. सूत्रधार बोलेल त्याप्रमाणे बाहुल्यांची हालचाल व नृत्य होते.
- लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक वापर केला जातो.
- छाया-बाहुली, हात-बाहुली, काठी-बाहुली व सूत्र-बाहुली असे कठपुतळ्यांचे चार उपप्रकार पडतात.
- उत्तर प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ अशा अनेक राज्यांत कठपुतळीचा खेळ कलावंत सादर करीत असतात.
(ii) दशावतारी नाटके :
- विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित ही नाटके असतात. पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा यांच्या साहाय्याने ही नाटके सादर केली जातात.
- मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या दहा अवतारांची सोंगे घेऊन पात्रे रंगभूमीवर येतात.
- देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाची सुरुवात विघ्नहर्त्या गणपतीच्या आवाहनाने होते. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतींनी होतो.
- नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असून, काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात.
- दशावतारी खेळ हा लोकनाट्याचाच एक प्रकार असतो. शेतीत पीकपाणी आल्यावर सुगीच्या दिवसांत कोकण व गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग गावोगावी केले जातात.
- श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी नाटकाचे खेळ महाराष्ट्रभर केले. विष्णुदास भावे यांच्या नाटकांना याच नाट्यप्रकाराची पार्श्वभमी आहे.
(iii) भजन :
- टाळ, मृदंग किंवा पखवाज आणि पेटी या वाद्यांच्या साथीत परमेश्वराच्या गुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना सामूहिकरीत्या गाणे, यास 'भजन' असे म्हणतात.
- भजन हा भक्तिसंगीतातील व भक्तिमार्गातील एक महत्त्वपूर्ण प्रकार आहे.
- भजन हा गायनपद्धतीनुसार सुगम शास्त्रीय किंवा सुगम संगीताचा प्रकार असतो.
- भजनाचे दोन प्रकार - न थांबता चक्राकार फिरत भजन म्हणणे म्हणजे चक्री भजन; तर देवभक्ताची भूमिका घेऊन संवादस्वरूपात भजन म्हणणे म्हणजे सोंगी भजन.
- संत तुकडोजींनी खंजिरी भजन (हलगी वा टिमकीसारखे वाद्य) लोकप्रिय केले.
- उत्तर भारतात संत तुलसीदास, कबीर, सूरदास, मीराबाई यांची भजने; तर कर्नाटकात पुरंदरदास, बोधेंद्रगुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनात गायल्या जातात.
- संत नरसी मेहता यांनी गुजरातमध्ये भक्ती संप्रदायास चालना दिली.
- वारकरी संप्रदायाने भजनास वैभव प्राप्त करून दिले. संत नामदेवांनी भजन-कीर्तनास प्रोत्साहन दिले.
(iv) कीर्तन :
- गायन, वादन, नृत्य व विनोद यांच्या साहाय्याने ईश्वराचे गुणवर्णन व त्याच्या लीलांचे कथन केला जाणारा लोककलेचा एक प्रकार म्हणजे 'कीर्तन' होय.
- नारद्मुनी हे कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक मानले जातात. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून संत नामदेवांना मानले जाते.
- श्रोत्यांच्या चित्तांत सर्व रसांच्याद्वारे भक्तिरसाचा परिपोष करणे हे कीर्तनाचे प्रयोजन असते.
- कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी कीर्तन व वारकरी कीर्तन अशा दोन परंपरा आहेत. हरिदासी कीर्तनात हरिदास किंवा कथेकरी बुवाच आख्यान, पदगायन यांची जबाबदारी सांभाळतात; तर वारकरी कीर्तनात टाळकऱ्यांचा सहभाग असतो.
- कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तररंग असे दोन भाग असतात. पूर्वरंगात नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण असते; तर उत्तररंगात पौराणिक आख्यान असते.
- कीर्तनाने धर्मप्रसाराबरोबरच सामाजिक ऐक्याचे, दोष-दिग्दर्शनाचे व लोकशिक्षणाचेही कार्य केले.
- वाईच्या दत्तोपंत पटवर्धनांनी नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या चरित्रांच्या आधारे कीर्तनांतून समाजप्रबोधन सुरू केले.
- स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन हा प्रकार सुरू झाला. तुकडोजी महाराज, गोविंदबुवा आफळे अशी राष्ट्रीय कीर्तने करीत असत.
(v) लळीत :
- कोकण-गोवा या परिसरात आढळणारा लळीत हा एक पारंपरिक नाट्यप्रकार आहे. नवरात्रासारख्या उत्सवाची सांगता या लळिताने होते.
- उत्सवदेवता सिंहासनावर बसली आहे, असे मानून तिच्या दरबारात अठरापगड जातींची सोंगे येऊन गावासाठी मागणी मागतात, यालाच 'लळीत' असे म्हणतात.
- गावाच्या भल्यासाठी तसेच समाज सदाचरणी व्हावा, म्हणून उत्सवदेवतेला मागणे मागितले जाते.
- हा नारदीय कीर्तनपरंपरेतील मनोरंजनाचा एक प्राचीन प्रकार आहे.
- नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्ण यांच्या कथा लळितात सादर केल्या जातात.
- हिंदी भाषेतही लळिते आहेत. लळितांची पार्श्वभूमी आधुनिक मराठी रंगभूमीलाही लाभली आहे.
(vi) भारूड :
- 'भारूड' म्हणजे आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत.
- भारुडे ही पथनाट्याप्रमाणे प्रयोगशील असतात. लौकिक व्यवहारांवर आध्यात्मिक व नैतिक रूपके रचणे म्हणजे 'भारूड' होय.
- विविधता, गेयता, नाट्यात्मता व विनोद यांमुळे संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
- भारुडातून समाजाचे प्रबोधन करण्याचा त्यांचा उद्देश होता.
- भारुडांची रचना गेयतापूर्ण असल्याने ती लोकसंगीतावर गायला सोपी असतात.
- संतांनी भारूड रचनेतून लोकशिक्षण केले.
(vii) तमाशा (लोकनाट्य) :
- पर्शियन भाषेतून मराठीत आलेल्या 'तमाशा या शब्दाचा अर्थ 'चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य' असा होतो.
- लोककला आणि अभिजात कला यांच्या मिश्रणांतून तमाशा हा प्रकार अठराव्या शतकापर्यंत विकसित झाला.
- मनोरंजनाचा हा कलाप्रकार महाराष्ट्रात चांगलाच लोकप्रिय झाला.
- तमाशाचे 'संगीत बारी' व 'ढोलकीचा फड' असे दोन प्रकार आहेत.
- संगीत बारीत गायन, नृत्य आणि संगीत यांच्यावर भर असतो; तर ढोलकीचा फड प्रकारात गण, गवळण, बतावणी अशा प्रकारानंतर वगनाट्य सुरू होते.
- 'विच्छा माझी पुरी करा' किंवा 'गाढवाचं लग्न' अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली वगनाट्ये खूप गाजली.
(viii) पोवाडा :
- घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.
- तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.
- पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
- अज्ञानदासाचा 'अफझलखान वधा'चा पोवाडा, तुळशीदासाने रचलेला 'सिंहगडच्या लढाईचा पोवाडा' हे पोवाडे प्रसिद्ध आहेत. उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावरील पोवाडे प्रसिद्ध आहेत.
- अमरशेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर आदी शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात पोवाड्यांच्या माध्यमातून लोकजागृती केली.
- पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रितीरिवाजांचे वर्णन केलेले असते.
- पोवाड्यांत दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
मराठी रंगभूमी :
व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे 'रंगभूमी' होय.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला.
संबंधित घटक :
- ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग असतो.
- नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य , प्रकाशयोजना,
- नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात.
- नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो.
- नाटक हे बहुतेक वेळा संवादांद्वारे सादर केले जाते.
- काही नाटकांमध्ये मूकाभिनय सुद्धा असतो. या प्रकाराला मूकनाट्य असे म्हणतात.
नाट्यपरंपरा :
- विष्णुदास भावे हे 'मराठी रंगभूमीचे जनक' होत.
- सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.
- 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली.
- एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.
- मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले.
- वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.
रंगभूमीसाठी योगदान :
तंजावरचे भोसले राजवंश :
- या राजवंशाने मराठी आणि दाक्षिणात्य भाषांमधील नाटकांना उत्तेजन दिले.
- या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली आणि अनेक संस्कृत नाटकांची भाषांतरे केली.
- अनेक नाटकांच्या संहिता त्यांनी त्यांच्या ग्रंथालयात जतन करून ठेवल्या आहेत.
- अनेक रंगकर्मीना उदारहस्ते मदत केली. यामुळे दक्षिण भारतात रंगभूमी बहरली.
विष्णुदास भावे :
- नाट्यप्रयोगाची निश्चित एक संकल्पना विष्णुदास भावे यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांना 'मराठी रंगभूमीचे जनक' म्हणून ओळखले जाते.
- १८४३ साली विष्णुदास भावे यांनी 'सीतास्वयंवर'या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर केला. हे पहिले नाटक त्यांनी स्वतःच रचले होते. त्यानंतर महाभारतातील कथानकावरही त्यांनी नाटक रचले.
- गावोगावी दौरे करून आपल्या नाटकांचे प्रयोग केले. नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला, रंगवाला इत्यादी सर्व कामेही तेच करीत असत.
प्रहसने :
- विष्णुदास भावे यांच्या नाटकानंतर अनेक ऐतिहासिक, पौराणिक प्रहसने रंगभूमीवर आली.
- प्रहसनांमध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जातात.
- विनोदनिर्मितीचा एकमेव हेतू डोळ्यांसमोर ठेवून प्रहसनांची निर्मिती झाली.
- प्रहसनातील पात्रे अतिशयोक्त, विसंगतीपूर्ण आणि असंबद्ध बोलून विनोदनिर्मिती करतात. प्रहसन हे एक प्रकारे मुक्तनाट्य असते.
- प्रहसने आणि फार्स यांचे स्वरूप व सादरीकरण सारखेच असते.
- प्रहसन हे घटनाकेंद्री असते. प्रहसनातील घटना अतिरंजित व असंभाव्य असतात. त्या वेगाने घडतात व त्यातून मौज निर्माण होते.
विनायक जनार्दन कीर्तने :
- सुरुवातीची नाटके लिखित स्वरूपात नसत.
- पद्ये लिहिलेली असली तरी संवाद उत्स्फूर्त असत.
- १८६१ साली वि. ज. कीर्तने यांचे पहिले संपूर्ण लिखित स्वरूपात असलेले 'थोरले माधवराव पेशवे' हे नाटक रंगभूमीवर आले.
- या नाटकाने संपूर्ण लिखित अशा नाटकांची नवी परंपरा सुरू केली.
ख्याल गायकी :
- शास्त्रीय गायन सादर करण्याचा व दीर्घ कालावधीसाठी गायला जाणारा गीतगायन प्रकार म्हणजे 'ख्याल' होय
- ख्यालामध्ये शब्दांचे, पदांचे महत्त्व दुय्यम असते; तर स्वरविलास महत्त्वाचा असतो.
- ताना व आलापयुक्त रागदर्शन प्रेक्षकांना घडवण्याची ख्याल ही एक गीतगायन पद्धती असते. ख्यालामध्ये स्वरांचा विविध पद्धतींनी आविष्कार करणे याला महत्त्व असते.
- ख्याल गायनासाठी ज्या शब्दरचना असतात, त्यांना 'बंदिशी' असे म्हणतात.
- या बंदिशींचा आविष्कार स्वरांनी सादर केला जातो. यालाच 'ख्याल गायकी' असे म्हणतात.
- एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायकी महाराष्ट्रात रुजवण्याचे कार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी केले.
- उस्ताद अल्लादियाँ खाँ, उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि उस्ताद रहिमत खाँ यांनी महाराष्ट्रातील रसिकांना शास्त्रोक्त संगीताची गोडी लावली.
संगीत नाटके :
- ज्या नाटकांमध्ये संवादांबरोबरच पदेही गायली जातात; त्या नाटकांना 'संगीत नाटके' असे म्हणतात.
- संवादांबरोबरच कथावस्तूला पुढे नेण्याचे व नाटकाची रंजकता वाढवण्याचे काम नाट्यपदे करतात.
- संगीत नाटकांनी 'नाट्यगीत' हा नवीन गीतप्रकार रूढ केला. या नाट्यगीतांनी शास्त्रीय संगीत सुगम करून लोकांना संगीताची गोडी लावली.
लेखक | लोकप्रिय संगीत नाटके |
अण्णासाहेब किर्लोस्कर | संगीत शाकुंतल |
गोविंद बल्लाळ देवल | संगीत शारदा - या नाटकात जरठकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ठ प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली आहे. |
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर | संगीत मूकनायक |
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | संगीत मानापमान, कीचकवध |
राम गणेश गडकरी | संगीत एकच प्याला - या नाटकातून दारूच्या दुष्परिणामांची जाणीव समाजाला करून दिली. |
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर :
- यांनी 'कीचकवध' हे संगीत नाटक स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिले. हे रूपकात्मक नाटक होते.
- महाभारतातील कीचकवधाच्या घटनेवर हे नाटक आधारलेले असले तरी नाटककाराचा हेतू त्यातून ब्रिटिश राजवटीवर सूचक टीका करणे, हाही होता.
- नाटकातील प्रत्येक पात्र तत्कालीन वृत्तीच्या रूपकात सादर केले होते. द्रौपदी म्हणजे असाहाय्य भारत, युधिष्ठिर म्हणजे मवाळपक्ष तर भीम म्हणजे जहालपक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन अशा रूपकांत प्रेक्षक हे नाटक पाहत असत.
- जहाल आणि मवाळ हे तत्कालीन काँग्रेसमधील दोन अंतर्गत गट होते. या नाटकाने जनतेत ब्रिटिश साम्राज्याबद्दल चीड निर्माण करण्याचे कार्य केले.
नाटककाराचे नाव | नाटकांची नावे | वैशिष्ट्य / माहिती |
आचार्य अत्रे | साष्टांग नमस्कार, घराबाहेर, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच!, उद्याचा संसार. | रंगभूमीच्या पडत्या काळात तिला सावरण्यास या नाटकांनी मदत केली |
वसंत कानेटकर | रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू. | ऐतिहासिक नाटकांबरोबरच त्यांनी सामाजिक विषयांवरही नाटके लिहिली. |
विजय तेंडुलकर | घाशीराम कोतवाल, कमला, बेबी, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे. | इतिहासकाळातील सामाजिक दोषांवर व राजकीय यंत्रणेतील दोषांवर प्रकाश टाकला आहे. |
विश्राम बेडेकर | टिळक आणि आगरकर, ब्रह्मकुमारी. | राजकीय नेत्यांतील मतभेदांवर आधारित नव्या धर्तीचे नाटक. |
वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) | नटसप्राट | शेक्सपियर या इंग्रज नाटककाराच्या 'किंग लिअर' या नाटकावर आधारित.
एका वृद्ध नटश्रेष्ठाचे, स्वकियांकडूनच अपमानित झालेल्या एका पित्याचे दुःख या नाटकातून व्यक्त होते. |
नाटक हा दृक्-श्राव्य कलाप्रकार असल्यामुळे त्याचा प्रेक्षकांवर फार मोठा प्रभाव पडतो.
समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांडे इत्यादी अनिष्ट बाबी नाटकांद्वारे सादर करून सामाजिक प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नाटकांनी केले.
भारतीय चित्रपटसृष्टी :
चित्रपट :
- कलात्मकता आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेले दृक्-श्राव्य माध्यम.
- चलच्चित्रणाच्या शोधानंतर चित्रपटकलेचा जन्म झाला.
- सुरुवातीस मूकपट असणारा चित्रपट ध्वनिमुद्रणाच्या शोधानंतर बोलपट झाला.
चित्रपट प्रकार : व्यंगचित्रपट, वार्तापट, अनुबोधपट, प्रसिद्धीपट, बालचित्रपट, सैनिकी चित्रपट, शैक्षणिक चित्रपट, कथाचित्ती इत्यादी.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासाची वाटचाल :
- चलच्चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपटकलेचा जन्म झाला. १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतात पहिला लघुपट तयार करून त्याचे प्रदर्शन केले.
- भारतीय चित्रपटांच्या विकासात दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर, दिवेकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे; कारण त्यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन 'पुंडलिक' हा कथापट तयार केला.
- पुढे दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा व सर्व प्रक्रिया भारतात केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला चित्रपट तयार केला. त्यांनी पुढे अनेक अनुबोधपटही तयार केले.
- आनंदराव पेंटर यांनी भारतात पहिला सिने-कॅमेरा तयार केला. त्यांचे मावस बंधू बाबुराव पेंटर यांनी ऐतिहासिक, सामाजिक असे अनेक चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांनी चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार केला.
- कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री-चित्रपट निर्मात्या; तर कमलाबाई गोखले या चित्रपटात काम करणाऱ्या पहिल्या महिला होत. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतूनही चित्रपटनिर्मिती झाली.
- प्रभात फिल्म कंपनीने अनेक धार्मिक, चरित्रपर, ऐतिहासिक व सामाजिक चित्रपट तयार केले. बॉम्बे टॉकीज, फिल्मिस्तान, राजकमल प्रॉडक्शन, नवकेतन, आर. के. स्टुडिओज अशा फिल्म कंपन्यांनी उत्तमोत्तम चित्रपट तयार केले.
- भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती.
- १९६१ ते १९८१ हा काळ भारतीय चित्रपटांचे 'सुवर्णयुग' मानला जातो.
भारतीय चित्रपटसृष्टीत महाराष्ट्राचे योगदान :
- भारतात चलच्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला.
- १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला.
- दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला.
- दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला.
- अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून 'भारतीय चित्रपटसृष्टीची जननी' अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.
चित्रपटांचे नाव | निर्माता | वैशिष्ट्य / माहिती |
बाजीराव-मस्तानी (१९३५) | भालजी पेंढारकर | ऐतिहासिक चित्रपट. राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत असल्याने या चित्रपटावर बंदी घातली गेली होती. |
सावळ्या तांडेल व पन्नादाई (हिंदी) | कमलाबाई मंगरूळकर | मराठीतील पहिल्या स्त्री-चित्रपट निर्मात्या. त्यांनी हे बोलपट तयार केले. |
रामशास्त्री | प्रभात फिल्म कंपनी | व्ही. शांताराम दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपट. |
महात्मा फुले | आचार्य अत्रे | चरित्रात्मक चित्रपट. |
वासुदेव बळवंत फडके | विश्राम बेडेकर | चरित्रात्मक चित्रपट. |
धन्य ते संताजी-धनाजी | दिनकर द. पाटील | ऐतिहासिक चित्रपट. |
बाल शिवाजी | प्रभाकर पेंढारकर | ऐतिहासिक बालचित्रपट. |
संत तुकाराम | प्रभात फिल्म कंपनी | चरित्रात्मक चित्रपट, पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळालेला पहिला मराठी चित्रपट. |
सावकारी पाश,
सिंहगड, |
बाबुराव पेंटर (मिस्त्री) | (पहिला वास्तववादी चित्रपट)
(पहिला ऐतिहासिक मूकपट) |
सैरंध्री | बाबुराव पेंटर (मिस्त्री) | महाभारत आधारित मूक चित्रपट |
कल्याणचा खजिना,
बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर |
बाबुराव पेंटर (मिस्त्री) | ऐतिहासिक चित्रपट. |
हिंदी भाषेतील चित्रपट :
- स्वातंत्र्यपूर्व काळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वी वल्लभ, मुघल-ए-आझम, इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते.
- ‘डॉ.कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता.
- स्वातंत्र्य चळवळीवर आधारित ‘आंदोलन’, ‘झाँसी की रानी’ हे चित्रपट.
मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी :
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.
नाटक :
- नेपथ्य , वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कलादिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते.
- संवादलेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.
चित्रपट :
- चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कलादिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कलादिग्दर्शक किंवा कलादिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते.
- चित्रपटाच्या संवादलेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते.
- एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-६-मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-६-मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- ५ : प्रसारमाध्यमे आणि इतिहास - Online Notes Next Chapter : पाठ- ७ : खेळ आणि इतिहास - Online Notes |