ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-९- महाराष्ट्र बोर्ड
नोट्स
अभ्यासघटक :
|
- इतिहासकारांच्या अथक परिश्रमांमुळे आपल्याला आज विविध ऐतिहासिक साधने आणि त्यावर आधारित ग्रंथ उपलब्ध झाले आहेत.
- या मौल्यवान ठेव्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे कार्य संग्रहालये, अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात.
- हे संस्थान ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथ आणि पुरावस्तूंचे जतन करून त्यातील निवडक वस्तू प्रदर्शित करतात. तसेच, संशोधन नियतकालिके आणि प्रकाशनांद्वारे शास्त्रशुद्ध माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवतात.
- प्रदर्शित न केलेले परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे दस्तऐवज आणि पुरावस्तू संशोधकांसाठी संग्रहालये व अभिलेखागारे उपलब्ध करून देतात, तर ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात.
इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन :
इतिहासाच्या साधनांबाबत करावयाची कामे :
- इतिहासाची साधने मिळवणे.
- मिळालेल्या साधनांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे.
- हस्तलिखिते, जुने ग्रंथ यांचे जतन करणे.
- पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करून त्या प्रदर्शित करणे.
- या सर्व कृती करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेणे.
प्रशिक्षणाची आवश्यकता :
- इतिहासाच्या या साधनांचे जतन आणि हाताळणी करणे हे कौशल्याचे काम असते. प्रत्येक कामाचे कौशल्य व पूर्वतयारी वेगवेगळी असते.
- या सर्व कृती करताना कोणती कौशल्ये आत्मसात करायची, कोणती सावधानता बाळगायची हे माहीत असले पाहिजे.
विविध ऐतिहासिक साधनांबाबत करावयाच्या कृती व उपयुक्त प्रशिक्षण :
(i) मौखिक साधने :
- लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे.
- संकलित साहित्याचे वर्गीकरण व विश्लेषण करणे.
- संकलित साहित्याचा अन्वयार्थ लावणे.
- संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे.
उपयुक्त प्रशिक्षण :
- समाजशास्त्र व सामाजिक मानवशास्त्र
- मिथके आणि भाषाशास्त्र
- ग्रंथालय व्यवस्थापन व संशोधनपर लेख
- इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती
(ii) लिखित साधने :
- ताम्रपट, दरबारी दप्तरे, पत्रे, हस्तलिखिते, ग्रंथ या दस्तऐवजांचे संकलन व संपादन करणे.
- या साधनांचे संवर्धन करण्यासाठी सफाई व रासायनिक प्रक्रिया करणे.
- या दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे.
- निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे.
- संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे.
उपयुक्त प्रशिक्षण :
- विविध प्राचीन लिप्यांचे ज्ञान मिळवणे.
- विविध चित्रे आणि शिल्पशैलींचे ज्ञान मिळवणे.
- कागदांचे प्रकार, शाई, रंग यांची माहिती मिळवणे.
- कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांची माहिती मिळवणे.
- दस्तऐवजांची साफसफाई व रासायनिक प्रक्रियांची माहिती करून घेणे.
- संग्रहालयातील दालनांमधील प्रदर्शन, व्यवस्थापन व माहिती तंत्रज्ञान मिळवणे.
- इतिहासकालीन समाजरचना, परंपरा, संस्कृती, शासनव्यवस्था यांची माहिती मिळवणे.
- संशोधनपर लेखांची माहिती ज्ञात करून घेणे.
(iii) भौतिक साधने :
- पुरावस्तूंचे संकलन, वर्गीकरण व सूची बनवणे.
- संवर्धनासाठी सफाई व रासायनिक प्रक्रिया करणे.
- निवडक पुरावस्तू प्रदर्शित करणे.
- पुरावस्तूंसंबंधीचे संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे.
- वनस्पती-प्राणी यांच्या अश्मीभूत अवशेषांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे.
- निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे.
उपयुक्त प्रशिक्षण :
- पुरातत्त्वीय अभ्यासपद्धती, सिद्धांत व प्राचीन संस्कृतींचा परिचय करून घेणे.
- पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड, धातू, चिकणमाती यांचे स्रोत व वैशिष्ट्यांचे ज्ञान आत्मसात करणे. त्यांची सफाई व रासायनिक प्रक्रियांची माहिती घेणे.
- विविध कलाशैलींचे ज्ञान मिळवणे.
- पुरावस्तू व जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे ज्ञान आत्मसात करणे.
- पुरावस्तूंचे प्रदर्शन, व्यवस्थापन यांची माहिती घेणे.
काही नावाजलेली संग्रहालये :
मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयाला आली.
पाश्चात्य प्रसिद्ध संग्रहालये :
लुव्र संग्रहालय, फ्रान्स :
- अठराव्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेल्या लुव्र संग्रहालयाला फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी त्यांच्या कलावस्तू भेट दिल्या.
- जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो-द-विंची याने रेखाटलेले 'मोनालिसा' चे चित्रही या संग्रहालयात आहे.
- नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान अन्य राष्ट्रांतून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूंचा संग्रह वाढला आहे.
- सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील सुमारे ३ लाख ८० हजारांहून अधिक कलावस्तू आहेत.
ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड :
- अठराव्या शतकात लंडन येथे ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना करण्यात आली.
- निसर्गशास्त्रज्ञ सर हॅन्स स्लोअन यांनी राजा दुसरा जॉर्ज याला दिलेल्या ७१ हजार वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या, ज्यामध्ये ग्रंथ, चित्रे आणि वनस्पतींचे नमुने होते.
- इंग्रजांनी आपल्या वसाहतींमधून आणलेल्या प्राचीन कलावस्तूंमुळे संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत गेली आणि आज ती सुमारे ८० लाखांपर्यंत पोहोचली आहे.
- भारतातील कोहिनूर हिऱ्यासारख्या अनेक मौल्यवान पुरावस्तूंनाही येथे स्थान मिळाले आहे.
नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका :
- इ.स. १८४६ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी ची स्थापना झाली.
- हे संग्रहालय स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत असून, नैसर्गिक इतिहासाशी संबंधित आहे.
- येथे प्राणी, वनस्पती, कीटक यांचे हजारो अवशेष आणि जीवाश्म जतन केलेले आहेत. तसेच, मानव प्रजातींचे अश्मीभूत अवशेष, खनिजे, दगड, शंख-शिंपले आणि विविध पुरावस्तूंचे बारा कोटींपेक्षा अधिक नमुने संग्रहित आहेत.
- हजारो पुरातत्त्व संशोधक येथे संशोधन व अभ्यास करतात.
भारतातीय संग्रहालये :
- एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये कोलकाता येथे 'भारतीय संग्रहालय' हे भारतातील पहिले संग्रहालय स्थापन झाले.
- १८५१ मध्ये चेन्नईत 'गव्हर्नमेंट म्युझियम', तर १९४९ मध्ये दिल्लीत 'राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय' सुरू झाले.
- मुंबईतील 'प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय' १९२२ मध्ये पूर्ण झाले आणि १९९८ मध्ये त्याचे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय' असे झाले.
- भारतात नंतर अनेक संग्रहालये स्थापन झाली, त्यातील काही विद्यापीठांशी संलग्न आहेत.
- या संग्रहालयांमध्ये प्राचीन वस्तू, शस्त्रे, शिल्पे, हस्तकलावस्तू आणि चित्रांचा मोठा संग्रह पहायला मिळतो.
भारतातील प्रसिद्ध संग्रहालये :
- इंडियन म्युझियम, कोलकाता;
- नॅशनल म्युझियम, दिल्ली;
- छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, मुंबई;
- सालारजंग म्युझियम, हैदराबाद;
- द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाइल्स, अहमदाबाद
संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे :
- राष्ट्रीय वस्तु संग्रहालय, दिल्ली
- महाराज सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा
- कोलकाता विद्यापीठ, कोलकाता
- बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
- अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, अलिगढ
- जिवाजी विद्यापीठ, ग्वालियर
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय :
- मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींनी इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीच्या स्मृत्यर्थ १९०४ साली प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- १९०५ मध्ये त्याची पायाभरणी झाली आणि १९२२ साली संग्रहालयाची इमारत पूर्ण झाली. १९९८ मध्ये या संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ठेवण्यात आले.
- इंडो-गॉथिक शैलीत बांधलेल्या या इमारतीला पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
- हे संग्रहालय कला, पुरातत्त्व आणि निसर्गाचा इतिहास या तीन विभागांत विभागले आहे.
- येथे बौद्ध, जैन आणि हिंदू देवतांच्या शिल्पांसह, नेपाळ-तिबेटमधील धातू व दगडी मूर्ती, भांडी, शस्त्रे आणि विविध प्राचीन वस्तू संग्रहित आहेत.
- एकूण सुमारे ५०,००० पुरावस्तू येथे जतन केल्या आहेत.
ग्रंथालये आणि अभिलेखागार :
ग्रंथालयाची कामे :
- ग्रंथालये ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात.
- पुरावस्तूंचे संकलन संग्रहालयांत होते, ग्रंथांचे संकलन ग्रंथालयांत होते; तर प्राचीन दस्तऐवज जे प्रदर्शित केले जात नाहीत, त्यांचे जतन अभिलेखागारांत केले जाते.
- ग्रंथांचे संकलन, संयोजन, जतन व संवर्धन ग्रंथालयात केले जाते.
- ग्रंथांची सूची करणे, माहितीच्या स्रोतांचे प्रसारण करणे.
- वाचकांना आवश्यकतेनुसार ग्रंथ उपलब्ध करून देणे.
ग्रंथालय व्यवस्थापनाचे महत्त्व :
- ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथसंग्रह नव्हे, तर त्यांचे योग्य व्यवस्थापनही महत्त्वाचे असते. पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके सहज मिळतात आणि शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही.
- उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धन होते, तसेच उत्तम दर्जाची पुस्तके संकलित केली जातात. विविध प्रकारच्या पुस्तकांना स्थान मिळते आणि संगणकीय प्रणाली व आधुनिक सुविधा उपलब्ध होतात.
- कल्पक व्यवस्थापक ग्रंथप्रदर्शन व जाहिरातींमधून वाचकसंख्या वाढवतात, त्यामुळे ग्रंथालयाचा अधिक विस्तार होतो.
- यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.
सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये :
- इ.स.पू. सुमारे पाचवे शतक ते इ.स. पाचवे शतक या काळातील तक्षशिला विद्यापीठातील ग्रंथालये.
- इसवी सन पूर्व सातव्या शतकातील मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय.
- इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय.
सरस्वती महाल ग्रंथालय :
- तामिळनाडूमधील तंजावर येथे सोळाव्या-सतराव्या शतकात 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले.
- व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ मध्ये तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी या ग्रंथालयाला समृद्ध केले.
- येथे ४९००० प्राचीन ग्रंथ आहेत. यात मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज आणि तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे संग्रहित आहेत.
- या ग्रंथालयाच्या समृद्धीमध्ये सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ साली त्यांचे नाव या ग्रंथालयाला देण्यात आले.
भारतातील ग्रंथालये :
- कोलकाता येथील ‘नॅशनल लायब्ररी’,
- दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अॅन्ड लायब्ररी’,
- हैदराबाद येथील ‘स्टेट सेंट्रल लायब्ररी’,
- मुंबई येथील ‘लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी’ आणि ‘डेव्हिड ससून लायब्ररी’
अभिलेखागारे :
- प्राचीन दस्तऐवज, कागदपत्रे, अभिलेखागारांमध्ये ठेवण्यात येतात.
- महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे जतन करणे, कागदपत्रांची सूची तयार करणे, नागरिकांना हवी तेव्हा कागदपत्रे उपलब्ध करून देणे, संपूर्ण व्यवस्थापन संगणकीय प्रणालीशी जोडणे हे अभिलेखागारांचे काम असते.
- अभिलेखागारांमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नाही.
- अभिलेखागारांत ठेवलेल्या कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात.
भारतातील पहिले अभिलेखागार :
- १८९१ मध्ये कोलकाता येथे 'इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट' हे पहिले सरकारी अभिलेखागार स्थापन झाले.
- १९११ मध्ये ते दिल्ली येथे हलवण्यात आले.
- १९९८ साली तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी ते 'राष्ट्रीय अभिलेखागार' म्हणून जनतेसाठी खुले केले.
- भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत हे अभिलेखागार येते.
- या अभिलेखागारात इसवी सन १७४८ पासूनची सर्व भाषांतील कागदपत्रे ठेवलेली आहेत.
- सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खासगी कागदपत्रे अशा चार प्रकारांत कागदपत्रांच्या नोंदींचे वर्गीकरण केलेले आहे.
अन्य अभिलेखागारे :
- प्रत्येक राज्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अभिलेखागार असते.
- मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथे महाराष्ट्र शासनाची अभिलेखागारे आहेत.
- पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित मोडी लिपीतील सुमारे पाच कोटी कागदपत्रे आहेत, त्याला 'पेशवे दप्तर' असे म्हणतात.
कोशवाङ्मय :
कोश : शब्दांचा अर्थसंग्रह म्हणजे 'कोश' होय. शब्दांचा, विविध माहितींचा वा ज्ञानाचा केलेला पद्घतशीर संग्रह म्हणजे 'कोश' होय.
- कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानाचे संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली असते.
- अचूकपणा, वस्तुनिष्ठता, अद्ययावतता आणि अकारविल्हे म्हणजे वर्णक्रमानुसार रचना हे कोशवाङ्मयाचे गुणविशेष आहेत.
- उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणे, हे कोशवाङ्मयाचे उद्दिष्ट असते.
- कोशात सत्याला व वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते.
- कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाजजीवनाचा आरसा असतात.
कोशांची आवश्यकता :
- ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचवले जाते.
- वाचकांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो.
- वाचकांच्या मुद्द्यांचा, समस्यांचा उलगडा होतो.
- अभ्यासकाला ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा कोश देतात.
- कोशवाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात.
- समाजाच्या गरजेप्रमाणे त्या त्या प्रकारचे कोश तयार होत असतात.
- म्हणून समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते.
कोशांचे स्वरूप :
- कोशांची रचना अकारविल्हे म्हणजे वर्णक्रमानुसार केलेली असते.
- प्रत्येक कोशाची निर्मिती निवडलेल्या विषयानुरूप होते; त्यामुळे कोशाचे विषयानुरूप प्रकार केले जातात.
- कोशात महत्त्वाच्या घटना, संज्ञा-संकल्पना व व्यक्ती या घटकांची माहिती दिलेली असते.
- वाचकांची सोय आणि माहिती शोधण्याची सोय व्हावी म्हणून शेवटी सूची दिलेली असते.
- कोशांचे लेखन त्या विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने होत असते.
कोशाचे प्रकार : कोशांचे सर्व साधारणपणे चार विभागांत वर्गीकरण करता येते.
(i) शब्दकोश :
- शब्दांच्या अर्थांच्या संकलनाला शब्दकोश म्हणतात. वाचकांना शब्दांचे अर्थ सहज समजावेत आणि त्यांचा शब्दसंग्रह वाढावा या उद्देशाने शब्दकोशांची निर्मिती केली जाते.
- शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह, अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, तसेच शब्दांची व्युत्पत्ती दिलेली असते. हे शब्दकोश एकभाषी, द्विभाषी आणि बहुभाषी असे तीन प्रकारचे असतात.
- शब्दकोशांचे विविध प्रकार आहेत, जसे की सर्वसंग्राहक शब्दकोश, परिभाषाकोश, विशिष्ट शब्दकोश, व्युत्पत्तिकोश, समानार्थी-विरुद्धार्थी शब्दकोश आणि म्हणी-वाक्प्रचार कोश.
(ii) विश्वकोश :
विश्वकोश हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये विश्वातील सर्व ज्ञान विषयानुसार संकलित आणि संक्षिप्त स्वरूपात मांडलेले असते. तो ज्ञानसंग्रह व ज्ञानप्रसाराचे एक महत्त्वाचे साधन मानला जातो.
विश्वकोशातील माहिती संशोधन व अभ्यासपूर्ण असल्याने ती विश्वासार्ह असते. याचे दोन प्रमुख प्रकार आहेत—
- सर्वसंग्राहक विश्वकोश – विविध विषयांवरील व्यापक माहिती देणारे, उदा. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, मराठी विश्वकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश.
- विशिष्ट विषयपर विश्वकोश – एखाद्या ठराविक विषयावर आधारित, उदा. भारतीय संस्कृती कोश, व्यायाम कोश.
(iii) कोशसदृश वाङ्मय :
- एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते.
- विविध तज्ज्ञांकडून लेखन करून घेतले जाते. इयरबुक, मनोरमा असे कोशसदृश वाङ्मय प्रकाशित होत असते.
(iv) सूची वाङ्मय :
- सूची म्हणजे यादी. ग्रंथांच्या अखेरीस ग्रंथात उल्लेख झालेल्या व्यक्ती, विषय, स्थळे, ग्रंथ यांची यादी दिलेली असते.
- सूची या अकारविल्हे असतात.
- सूचींमुळे ग्रंथाच्या वाचनास मदत होते.
कोश आणि इतिहास :
- भूतकाळातील व्यक्ती, घटना आणि प्राचीन संस्कृती यांवर आधारित कोशांची रचना इतिहासाच्या आधारावर केली जाते. कोशकारांना सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करावा लागतो.
- इतिहास आणि कोश यांचा समान धागा म्हणजे वस्तुनिष्ठता व सत्यता. विश्वसनीयतेसाठी कोशकारांना ऐतिहासिक संदर्भ तपासावे लागतात.
- त्याचप्रमाणे, इतिहास अभ्यासणाऱ्यांना देखील व्यक्ती, संज्ञा, ठिकाणे आणि घटनांची माहिती घेण्यासाठी कोशांची मदत घ्यावी लागते. कारण कोशांची निर्मिती इतिहासाच्या आधारेच होते. त्यामुळे कोणत्याही कोशाला इतिहासाची जोड आवश्यक असते.
पश्चिमेकडील कोश :
- 'नॅचरल हिस्टरी' हा इसवी सनाच्या पहिल्या शतकामधील थोरल्या प्लिनीचा कोश सर्वाधिक प्राचीन कोश मानला जातो.
- अठराव्या शतकातील डेनिस दिदेराँ याचा फ्रेंच विश्वकोश महत्त्वाचा आहे.
- 'एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका' हा १७६७-७१ या काळातील विश्वकोश त्यातील अद्ययावततेमुळे महत्त्वाचा मानला जातो.
भारतीय कोश :
- इ.स.पूर्व सातव्या शतकात लिहिलेले निघंटू (प्राचीन वैद्यकशास्त्राची माहिती), धातुपाठ हे संस्कृत कोश, महानुभाव, बौद्ध व जैन कोश हे मध्ययुगातील कोश होत.
- तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रघुनाथ पंडिताने लिहिलेला 'राज्यव्यवहारकोश' हे कोश प्रसिद्ध आहेत.
कोश - समाजाचे मानचिन्ह :
- स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कोशांवर पडतो.
- राष्ट्राचे तत्त्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव कोशांवर पडतो.
- कोशांतून राष्ट्रीय अस्मिता जागी करता येऊ शकते.
- ज्ञानार्जन व ज्ञानप्रसार ही कोशनिर्मितीची प्रेरणा असते.
- समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा आविष्कार कोशरचनेत पाहायला मिळतो; म्हणून कोश हे समाजाचे मानचिन्ह असते.
कोशांचे विषयानुरूप प्रकार व माहिती :
(i) इतिहास कोश :
- गतकालातील मानवी व्यवहारांत आलेल्या अनेक शब्दांचा संग्रह करून त्याचा नेमका अर्थ देणाऱ्या कोशास 'इतिहास कोश' असे म्हणतात.
- अशा कोशात घटना व व्यक्ती यांचे नामोल्लेख, ताम्रपट, शिलालेख अशा शब्दांचे अर्थ आणि दस्तऐवज, हस्तलिखिते, अभिलेख यांची वर्णानुक्रमे यादी दिलेली असते.
- य. न. केळकर यांचा ऐतिहासिक शब्दकोश महत्त्वाचा आहे.
(ii) चरित्र कोश :
- समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींची चरित्रे व त्यांचे योगदान यांची माहिती ज्या कोशात दिलेली असते, त्या कोशाला 'चरित्रकोश' असे म्हणतात.
- र. भा. गोडबोले यांचा 'भारतीय प्राचीन चरित्रकोश', सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन असा तीन खंडांत प्रसिद्ध झालेला 'भारतवर्षीय चरित्रकोश' हे महत्त्वाचे चरित्रकोश आहेत.
- चरित्रकोशातील माहितीमुळे अभ्यासकाला ऐतिहासिक काळातील आणि पौराणिक काळातील समाजबांधणी आणि सामाजिक संबंध कसे होते, हे कळते.
- इतिहास संशोधकालाही चरित्रकोश उपयुक्त ठरतात.
(iii) ज्ञान कोश :
श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी 'महाराष्ट्रीय ज्ञानकोशा'चे २३ खंड प्रसिद्ध केले. कोशनिर्मितीमागील त्यांची भूमिका -
- लोकांना बहुश्रुत करावे.
- त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी.
- त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे.
- जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे.
(iv) स्थळ कोश :
- भूप्रदेशाच्या आधारावरच इतिहास घडत असल्यामुळे इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा ठरतो. ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे स्थल कोश या संदर्भात उपयोगी ठरतात.
- महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी भेट दिलेल्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी रचलेल्या 'प्राचीन भारतीय स्थलकोशा' मध्ये वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, तसेच चिनी, फारसी आणि ग्रीक साहित्यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
- स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे आणि त्यांचा इतिहास समजतो. त्यामुळे ते इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन मानले जातात.
(v) मराठी विश्व कोश :
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा ची स्थापना केली. यामागचा प्रमुख उद्देश मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा होता.
- या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून नेमणूक केली. आजपर्यंत या विश्वकोशाचे २० खंड प्रकाशित झाले आहेत.
- मराठी विश्वकोश हा सर्वसंग्राहक विश्वकोश असून त्यामध्ये जगभरातील विविध ज्ञानशाखांचे संकलन केले आहे. त्यात इतर विषयांसोबतच इतिहासासंदर्भातील महत्त्वाच्या नोंदी देखील समाविष्ट आहेत.
(vi) संस्कृती कोश :
- विविध संस्कृर्तीमधील धर्म, पेहेराव, उत्सव, सण, परंपरा, शिक्षण इत्यादींची माहिती ज्या कोशात दिलेली असते, त्याला 'संस्कृती कोश' असे म्हणतात.
- संस्कृती कोशामुळे विशिष्ट भागावर नांदत असलेल्या संस्कृतीवर प्रकाश पडतो.
- आपल्या संस्कृतीविषयी आपल्याला परिपूर्ण ज्ञान होते. विशिष्ट संस्कृतींमधील रूढी, परंपरा, धार्मिक-सामाजिक विचार, तत्त्वज्ञान, राहणीमान इत्यादींविषयीची माहिती होते.
- महादेवशास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली तयार झालेल्या 'भारतीय संस्कृती कोशा' चे दहा खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यात प्राचीन भारताची संस्कृती, समाजजीवन, सण-उत्सव, परंपरा यांची माहिती आढळते.
- विविध संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना संदर्भ म्हणून संस्कृती कोश उपयुक्त ठरतात.
(vii) संज्ञा कोश :
- इतिहासातील संज्ञा-संकल्पना वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे 'संज्ञा कोश' होय.
- अभ्यास करताना काही संज्ञांचे अर्थ समजण्यात गोंधळ उडतो, जसे की वसाहतवाद व साम्राज्यवाद किंवा साम्यवाद व समाजवाद. वाचक आणि अभ्यासकांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी संज्ञा कोश तयार केले जातात.
- या कोशांमध्ये महत्त्वाच्या संज्ञांचे अर्थ, त्यांचा उगम आणि उपयोग समजावून सांगितले जातात. त्यामुळे अभ्यासकांना मदत होते आणि सामान्य वाचकांचेही ज्ञान वाढते व त्याचे मनोरंजनही होते.
(viii) काही वैशिष्टयपूर्ण कोश :
- लक्ष्मण दत्तात्रय जोशी यांचा 'संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास' हा कोश.
- शं. रा. दाते यांचा 'क्रांतिकारकांचा चरित्रकोश'.
- न. र. फाटक यांचा 'स्वातंत्र्यसैनिक : चरित्रकोश'.
कोशांच्या सुधारित आवृत्त्यांची आवश्यकता :
- कोशांमध्ये गतकाळातील घटना, व्यक्तींचे कार्य, शब्दांचे अर्थ इत्यादी माहिती दिलेली असते. परंतु काळाच्या गतीबरोबर ज्ञानाचाही विस्तार होत असतो.
- नवनवीन तंत्रज्ञान अस्तित्वात येऊन नवीन शब्दांची भर पडते. नव्याने आलेली माहिती, ज्ञान, संकल्पना यांची भाषेत भर पडत जाते.
- नवीन संशोधनामुळे भूतकाळातील घटनांचे संदर्भही बदलत असतात.
- हे सर्व बदल, शब्द व माहिती कोशांमध्ये आली नाही; तर ते कालविसंगत ठरतात.
- म्हणून नव्या ज्ञानाची भर घालून कोश अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या सुधारित आवृत्त्या काढाव्या लागतात किंवा पुरवण्या काढाव्या लागतात.
कोशरचनेच्या क्षेत्रात उपलब्ध संधी :
- इतिहासाच्या अभ्यासकांसाठी कोशरचनेच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
- कोणत्याही विषयाच्या कोशाला इतिहासाची जोड आवश्यक असते, कारण प्रत्येक विषयाचा स्वतःचा इतिहास असतो.
- त्यामुळे इतिहास अभ्यासक घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश यांसारख्या विविध कोशांच्या निर्मितीत सहभाग घेऊ शकतात.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-९ : ऐतिहासिक ठेव्यांचे जतन-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-९ : ऐतिहासिक ठेव्यांचे जतन-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ- 8 : पर्यटन आणि इतिहास - Online Notes |