प्राकृतिक रचना व जलप्रणाली
इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-३- महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न_१. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा.
(अ) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ......
(i) उच्चभूमीचा आहे.
(ii) मैदानी आहे.
(iii) पर्वतीय आहे.
(iv) विखंडित टेकड्यांचा आहे.
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे.
(आ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा ......
(i) उंच पर्वत आहेत.
(ii) प्राचीन पठार आहे.
(iii) पश्चिमवाहिनी नद्या आहेत.
(iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे.
(इ) ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ......
(i) अवर्षणग्रस्त आहे.
(ii) दलदलीचे आहे.
(iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(iv) सुपीक आहे.
ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
(ई) ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत......
(i) त्रिभुज प्रदेश आहे.
(ii) त्रिभुज प्रदेश नाही .
(iii) विस्तीर्ण खाड्या आहेत.
(iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.
ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही .
(उ) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ......
(i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत.
(ii) प्रवाळबेटे आहेत.
(iii) ज्वालामुखीय बेटे आहेत.
(iv) खंडीय बेटे आहेत.
अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळबेटे आहेत.
(ऊ) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ......
(i) बुंदेलखंड पठार आहे.
(ii) मेवाड पठार आहे.
(iii) माळवा पठार आहे.
(iv) दख्खनचे पठार आहे.
अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे.
प्रश्न_२. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.
भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या प्राकृतिक रचनेत काही साम्य असूनही त्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये महत्त्वाचे भेद आढळतात.
- भारताची प्राकृतिक रचना हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टी आणि द्वीपसमूह यांमध्ये विभागलेली आहे, तर ब्राझीलमध्ये उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी भाग आणि द्वीपसमूह हे प्रमुख भाग आहेत.
- भारतामध्ये उंच पर्वत असून, हिमालयातील शिखरे ७००० मीटरपेक्षा जास्त उंचीची आहेत. दक्षिणेकडे पश्चिम आणि पूर्व घाट पर्वतरांगा आहेत. याच्या तुलनेत ब्राझीलमध्ये उंच पर्वत नाहीत; तेथील उच्चभूमीची उंची १००० ते २००० मीटर दरम्यान आहे.
- भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने व थरचे वाळवंट आढळते, परंतु ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचे विस्तीर्ण मैदाने व उष्ण वाळवंट नाही. भारताच्या किनारपट्टी भागात पश्चजल प्रदेश आढळतात, जे ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.
- ब्राझीलमध्ये अजस्र कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. याउलट, भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्र कडे आढळत नाहीत.
थोडक्यात, भारत आणि ब्राझील या देशांची भूप्राकृतिक रचना विविध प्रकारची असून त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण घटक एकमेकांपेक्षा भिन्न आहेत.
(आ) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत :
- विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे.
- कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.
- अनेक नद्यांच्या काठावरील औद्योगिक पट्ट्यांमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र तपासण्या व कारवाई करणे.
- नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे.
- नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी.
- शहरी व ग्रामीण भागातील नद्यात मिसळणारे सांडपाणी थांबवण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारणे.
(इ) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?
उत्तर : भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
- भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा देश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.
- भारताचा मैदानी प्रदेश विशेषतः उत्तर भारतातील मैदान सखल, समांतर व सपाट आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी आणि शेतीसाठी उपयुक्त आहे.
- हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या त्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.
- उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात.
- अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.
- भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास 'सुंदरबन' म्हणतात. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
- उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश 'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळी' या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.
- अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.
- पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.
(ई) पॅंटानल या अतिविस्तृत खंडातर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
पँटनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत :
- पँटनाल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात. या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते.
- पॅंटानल प्रदेश फारच सखल आणि सपाट आहे. त्यामुळे पावसाचे किंवा नदीचे पाणी वाहून जाण्याऐवजी मोठ्या क्षेत्रात साचून राहते.
- पँटनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते.
- या भागात विशेषतः वर्षा ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावसामुळे जमीन पाण्याने ओसंडून जाते व पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो.
- मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.
(उ) भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा.
- हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत.
- पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालींना विभागतो.
- विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे.
- हिमालय पर्वत हा हिमालयातील नद्या व हिमालयापलीकडील नद्या यांना विभागतो.
प्रश्न_३. टिपा लिहा.
(अ) ॲमेझॉन नदीचे खोरे
- अॅमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा मैदानी प्रदेश आहे. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.
- अॅमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद, म्हणजेच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात, तेथे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४० किमी होते.
- जसजशी अॅमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते, तसतशी अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याची (गैदानाची) रुंदी वाढत जाते.
- अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.
(आ) हिमालय
भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे.
वैशिष्ट्ये : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वतप्रणाली आहे.
हिमालय पर्वतश्रेणीतील रांगा : हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो.
- शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.
- दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.
- हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असेही भाग केले जातात.
- भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० मीटर ते ८००० मीटर आहे.
(इ) ब्राझीलची किनारपट्टी
- ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची विस्तीर्ण किनारपट्टी लाभलेली असून ती उत्तर किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी अशा दोन मुख्य भागांत विभागली जाते.
- उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्ते- पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.
- ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट अॅमेझॉन व टोकँटिस या नद्यांच्यादरम्यान तयार झाले आहे.
- ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर, सावो फ्रान्सिस्को नदी अटलांटिक महासागरात मिळते. येथे पुळणी, तटीय वालुकागिरी, प्रवाळकट्टे, आणि प्रवाळबेटे आढळतात, जे किनाऱ्याचे नैसर्गिक रक्षण करतात. या दोन्ही किनारपट्ट्यांमुळे ब्राझीलची जैवविविधता व जलव्यवस्था समृद्ध झाली आहे.
(ई) भारताचा दवीपकल्पीय विभाग
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो. भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत.
पर्वत :
- भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.
- भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट व पूर्व सीमेलगत पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.
- विभागाच्या मध्य भागात विंध्य-सातपुडा पर्वत आहेत.
पठारे :
- भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे.
- पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक-तेलंगणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत.
(उ) अजस्र कडा
- क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वांत लहान प्राकृतिक विभाग आहे.
- सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो.
- ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते.
- अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.
- अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो.
- अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग 'अवर्षण चतुष्कोन' म्हणून ओळखला जातो.
प्रश्न_४. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
- ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात.
- ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.
- या नद्या अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
(आ) भारताच्या पश्चिमव पूर्व किनारपट्ट्यां मध्ये विषमता आढळते.
- पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे.
- भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.
- भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
(इ) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
- भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात.
- भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.
- गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
(ई) ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
- अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
- या भागात उदयोगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी, अॅमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते.
- गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
प्रश्न_५. अचूक गट ओळखा.
(अ) ब्राझीलच्या वायव्येकडून अग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम.
(i) पॅराना नदी खोरे-गियाना उच्चभूमी-ब्राझील उच्चभूमी
(ii) गियाना उच्चभूमी-ॲमेझॉन खोरे -ब्राझील उच्चभूमी
(iii) किनारपट्टीचा प्रदेश-ॲमेझॉन खोरे-ब्राझील उच्चभूमी
(ii) गियाना उच्चभूमी-ॲमेझॉन खोरे -ब्राझील उच्चभूमी
(आ) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.
(i) जुरुका-झिंगू-अरागुआ
(ii) निग्रो-ब्रांका-पारु
(iii) जापुरा-जारुआ-पुरुस
(i) जुरुका-झिंगू-अरागुआ
(इ) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.
(i) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड
(ii) छोटा नागपूर-माळवा-मारवाड
(iii) तेलंगणा-महाराष्ट्र-मारवाड
(i) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-३-प्राकृतिक रचना व जलप्रणाली-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-भूगोल-पाठ-३-प्राकृतिक रचना व जलप्रणाली-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स (9 PDF)-Rs.45
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची स्वाध्याय प्रश्नोत्तरे (9 PDF)-Rs.43
PDF : इयत्ता-१० वी- भूगोल- सर्व ९ धड्यांची नोट्स + स्वाध्याय प्रश्नोत्तरे (18 PDF)-Rs.71
Useful links :
| Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता-१० वी-भूगोल- - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ- २ : स्थान-विस्तार- Online Notes Next Chapter : पाठ- ४ : हवामान - Online Notes |
