इतिहासलेखन : भारतीय परंपरा
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-२ महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ........... हे होत.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होत.
(२) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद .......... यांनी केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्शल
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
(२) स्त्रीपुरुष तुलना - स्त्रीवादी लेखन
(३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
(४) ग्रँट डफ - वसाहतवादी इतिहास
द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली.
- इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.
- ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.
- आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.
- राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच. त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.
(२) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
- ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो.
- बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.
- थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.
- तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
प्रश्न ३. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय ?
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात; त्यात 'मार्क्सवादी इतिहासलेखन' हा एक प्रमुख प्रवाह आहे.
- मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले, त्याला 'मार्क्सवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
- मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.
- प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करणे, हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे.
- मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो.
(२) इतिहासाचार्य वि . का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.
भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
- राजवाडे यांनी 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले.
- इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला.
- केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे, असे त्यांचे मत होते.
- आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
- अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते.
- स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखनात असायला हवे, असे त्यांचे मत होते.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहासलेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.
प्रश्न ४. (अ) पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँट डफ | ------ |
----- | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | ------- |
----- | हू वेअर द शूद्राज |
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँट डफ | ए हिस्टरी ऑफ द मराठाज् |
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | हू वेअर द शूद्राज |
(ब) पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
प्रश्न ५. टीपा लिहा.
(१) प्राच्यवादी इतिहासलेखन
- अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.
- या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
- प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून 'या भाषांची जननी प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती,' अशी कल्पना मांडली.
- या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.
(२) राष्ट्रवादी इतिहासलेखन
- एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली.
- आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले, त्या लेखनास 'राष्ट्रवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
- या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला.
- भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले.
- राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
(३) वंचितांचा इतिहास
- समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात.
- मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.
- इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.
- भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो.
- लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
- वंचिताच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले.
- वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजीत गुहा यांनी केले.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-२-इतिहासलेखन : भारतीय परंपरा-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-२-इतिहासलेखन : भारतीय परंपरा-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- १ : इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - Online Solutions Next Chapter : पाठ- ३ : उपयोजित इतिहास - Online Solutions |