मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
इयत्ता १० वी-इतिहास-पाठ-६- महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ........... यांना मानतात.
(अ) संत ज्ञानेश्वर
(ब) संत तुकाराम
(क) संत नामदेव
(ड) संत एकनाथ
महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार संत नामदेव यांना मानतात.
(२) बाबुराव पेंटर यांनी ......... हा चित्रपट काढला.
(अ) पुंडलिक
(ब) राजा हरिश्चंद्र
(क) सैरंध्री
(ड) बाजीराव-मस्तानी
बाबुराव पेंटर यांनी सैरंध्री हा चित्रपट काढला.
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(२) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(३) साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(४) एकच प्याला - अण्णा साहेब किर्लोस्कर
चुकीची जोडी - एकच प्याला - अण्णा साहेब किर्लोस्कर
प्रश्न २. पुढील तक्ता पूर्ण करा.
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये | ||||
उदाहरणे |
भजन | कीर्तन | लळित | भारुड | |
गुणवैशिष्ट्ये | (१) टाळ व मृदंग यांच्या साथीने ईश्वराचे गुणगान
(२) अभंग व भक्ति-कवनांतून ईश्वरस्तुती. |
(१) नमन, अभंग व निरूपण हा पूर्वरंग.
(२) आख्यान हा उत्तररंग. |
(१) उत्सवप्रसंगी देवतेकडे 'मागणे' मागितले जाते.
(२) नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्णाच्या कथा सादर करणे. |
(१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण
(२) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. |
उदाहरणे | (१) संत तुलसीदास.
(२) संत नामदेव यांची भजने. |
(१) नारदीय कीर्तने.
(२) महात्मा फुले यांची सत्यशोधकी कीर्तने. |
गोवा, कोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित. | (१) ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे.
(२) संत एकनाथांची भारुडे सर्वांत लोकप्रिय आहेत. |
प्रश्न ३. टीपा लिहा.
(१) मनोरंजनाची आवश्यकता
- मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते.
- चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते.
- मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते. मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
- मनोरंजनामुळे मनाला विरंगुळा मिळतो व मनावरील ताण हलके होतात.
म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते.
(२) मराठी रंगभूमी
- व्यक्तीने किंवा समुदायाने ललितकला सादर करण्याचे स्थान म्हणजे 'रंगभूमी' होय.
- एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला.
- सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे.
- 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली.
- एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.
- मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले.
- वि. वा. शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.
(३) रंगभूमी व चित्रपट क्षेत्रांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
रंगभूमी आणि चित्रपट यांच्याशी संबंधित पुढील अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत-
- रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व साहाय्यक यांची गरज असते. लेखक, त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यांतील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते.
- चित्रपटासाठीही या सर्वांची आवश्यकता असते; त्याचबरोबर कॅमेरामन, संवादलेखक, कथालेखक, नृत्य दिग्दर्शक, गीतकार अशा तज्ज्ञांची आवश्यकता असते. ही सर्व व्यावसायिक क्षेत्रे रंगभूमी व चित्रपट या क्षेत्रांशी संबंधित अशी आहेत.
प्रश्न ४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
- ऐतिहासिक घटनांवर आणि व्यक्तींवर चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.
- ऐतिहासिक कथाविषय असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरणाची निर्मिती करावी लागते.
- पात्रांच्या तोंडची भाषा, चालण्या-बोलण्याच्या पद्धती याही माहीत असाव्या लागतात.
- त्या वेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करावे लागते.
एकूण, चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे आहेत.
(२) संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली.
संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या हेतूने अनेक भारुडे लिहिली.
- या भारुडांच्या विषयांत विविधता आणि नाट्यात्मकता होती.
- विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला.
- ही भारुडे चालींवर गायली जात असत. त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत.
- व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणांतून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे म्हणूनच लोकप्रिय झाली.
प्रश्न ५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे ?
- भारतात चलच्चित्रपटाचा प्रारंभ महादेव गोपाळ पटवर्धन कुटुंबीयांनी १८८५ मध्ये केला.
- १८९९ मध्ये हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी भारतातील पहिला लघुपट तयार करून तो मुंबईत आझाद मैदानावर दाखवला.
- दादासाहेब तोरणे, करंदीकर, पाटणकर व दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांची मदत घेऊन 'पुंडलिक' हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला.
- दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये संपूर्ण भारतीय तंत्रज्ञान वापरून स्वतः दिग्दर्शित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा पहिला भारतीय चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला.
- अशा रितीने भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करून प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो; म्हणून 'भारतीय चित्रपटसृष्टीची जननी' अशी महाराष्ट्राची ख्याती आहे.
(२) पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा.
- घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीररसयुक्त रचना म्हणजे 'पोवाडा' होय.
- तो पूर्वी राजदरबारात वा लोकसमूहासमोर आवेशपूर्णरीत्या डफाच्या तालावर सादर केला जात असे.
- पोवाडा हा गद्य-पद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे.
- अज्ञानदासाचा 'अफझलखान वधा'चा पोवाडा, तुळशीदासाने रचलेला 'सिंहगडच्या लढाईचा पोवाडा' हे पोवाडे प्रसिद्ध आहेत. उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावरील पोवाडे प्रसिद्ध आहेत.
- अमरशेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर आदी शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात पोवाड्यांच्या माध्यमातून लोकजागृती केली.
- पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे, सामाजिक रितीरिवाजांचे वर्णन केलेले असते.
- पोवाड्यांत दरबारी प्रथा, युद्धांच्या पद्धती, शस्त्रांची नावे यांचे उल्लेख असतात, म्हणून पोवाडा हा इतिहासलेखनाचे उपयुक्त साधनही आहे.
Click on below link to Download PDF from store
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-६-मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास-नोट्स
PDF : इयत्ता-१० वी-इतिहास-पाठ-६-मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Next Chapter : पाठ- ५ : प्रसारमाध्यमे आणि इतिहास - Online Solutions Next Chapter : पाठ- ७ : खेळ आणि इतिहास - Online Solutions |