प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) लिओनार्दोद विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ........... या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर्ज
(२) कोलकाता येथील ........... हे भारतातील पहिले संग्रहालय होय.
(अ) गव्हर्न्मेंट म्युझियम
(ब) राष्ट्रीय वस्तु संग्रहालय
(क) छत्रपती शि वाजी महाराज वस्तु संग्रहालय
(ड) भारतीय संग्रहालय
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली
(२) बनारस हिंदू विद्यापीठ - वाराणसी
(३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगढ
(४) जिवाजी विद्यापीठ - ग्वालियर
उत्तर :
(१) महाराज सयाजीराव विद्यापीठ - दिल्ली
प्रश्न २. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.
उत्तर :
ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन व संशोधन करतात, तर प्रदर्शित न केलेले दस्तऐवज अभिलेखागारांमध्ये संरक्षित केले जातात. ऐतिहासिक सत्य शोधून तो ऐतिहासिक ठेवा लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असते. त्यामुळे अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि प्रकाशने प्रसिद्ध करून इतिहासाच्या शास्त्रशुद्ध माहितीचा प्रसार करतात.
(२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
उत्तर :
- इतिहास संशोधनात साधने मिळवणे, त्यांची नोंद करणे आणि सूची तयार करणे आवश्यक असते.
- जुने ग्रंथ, हस्तलिखिते आणि पुरावस्तूंचे जतन व प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडावी लागते.
- ही कामे कौशल्यपूर्ण आणि काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असते.
- त्यासाठी योग्य कौशल्ये आत्मसात करणे आणि प्रशिक्षण घेणे महत्त्वाचे ठरते.
प्रश्न ३. टीपा लिहा.
(१) स्थलकोश
उत्तर :
- भूप्रदेशाच्या आधारावरच इतिहास घडत असल्यामुळे इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा ठरतो. ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारे स्थल कोश या संदर्भात उपयोगी ठरतात.
- महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी यांनी भेट दिलेल्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी रचलेल्या 'प्राचीन भारतीय स्थलकोशा' मध्ये वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, तसेच चिनी, फारसी आणि ग्रीक साहित्यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.
- स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे आणि त्यांचा इतिहास समजतो. त्यामुळे ते इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन मानले जातात.
(२) विश्वकोश
उत्तर :
विश्वकोश हा असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये विश्वातील सर्व ज्ञान विषयानुसार संकलित आणि संक्षिप्त स्वरूपात मांडलेले असते. तो ज्ञानसंग्रह व ज्ञानप्रसाराचे एक महत्त्वाचे साधन मानला जातो.
विश्वकोशातील माहिती संशोधन व अभ्यासपूर्ण असल्याने ती विश्वासार्ह असते. याचे दोन प्रमुख प्रकार आहेत—
- सर्वसंग्राहक विश्वकोश – विविध विषयांवरील व्यापक माहिती देणारे, उदा. एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, मराठी विश्वकोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोश.
- विशिष्ट विषयपर विश्वकोश – एखाद्या ठराविक विषयावर आधारित, उदा. भारतीय संस्कृती कोश, व्यायाम कोश.
मराठी विश्वकोश :
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा ची स्थापना केली. यामागचा प्रमुख उद्देश मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा होता.
- या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून नेमणूक केली. आजपर्यंत या विश्वकोशाचे २० खंड प्रकाशित झाले आहेत.
- मराठी विश्वकोश हा सर्वसंग्राहक विश्वकोश असून त्यामध्ये जगभरातील विविध ज्ञानशाखांचे संकलन केले आहे. त्यात इतर विषयांसोबतच इतिहासासंदर्भातील महत्त्वाच्या नोंदी देखील समाविष्ट आहेत.
(३) संज्ञाकोश
उत्तर :
- इतिहासातील संज्ञा-संकल्पना वेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश म्हणजे 'संज्ञा कोश' होय.
- अभ्यास करताना काही संज्ञांचे अर्थ समजण्यात गोंधळ उडतो, जसे की वसाहतवाद व साम्राज्यवाद किंवा साम्यवाद व समाजवाद. वाचक आणि अभ्यासकांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी संज्ञा कोश तयार केले जातात.
- या कोशांमध्ये महत्त्वाच्या संज्ञांचे अर्थ, त्यांचा उगम आणि उपयोग समजावून सांगितले जातात. त्यामुळे अभ्यासकांना मदत होते आणि सामान्य वाचकांचेही ज्ञान वाढते व त्याचे मनोरंजनही होते.
(४) सरस्वती महाल ग्रंथालय :
उत्तर :
- तामिळनाडूमधील तंजावर येथे सोळाव्या-सतराव्या शतकात 'सरस्वती महाल ग्रंथालय' बांधले गेले.
- व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ मध्ये तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी या ग्रंथालयाला समृद्ध केले.
- येथे ४९००० प्राचीन ग्रंथ आहेत. यात मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज आणि तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे संग्रहित आहेत.
- या ग्रंथालयाच्या समृद्धीमध्ये सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ साली त्यांचे नाव या ग्रंथालयाला देण्यात आले.
प्रश्न ४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे ?
उत्तर :
- ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथसंग्रह नव्हे, तर त्यांचे योग्य व्यवस्थापनही महत्त्वाचे असते. पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके सहज मिळतात आणि शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही.
- उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धन होते, तसेच उत्तम दर्जाची पुस्तके संकलित केली जातात. विविध प्रकारच्या पुस्तकांना स्थान मिळते आणि संगणकीय प्रणाली व आधुनिक सुविधा उपलब्ध होतात.
- कल्पक व्यवस्थापक ग्रंथप्रदर्शन व जाहिरातींमधून वाचकसंख्या वाढवतात, त्यामुळे ग्रंथालयाचा अधिक विस्तार होतो.
- यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.
(२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?
उत्तर :
अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात -
- महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यांत कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे.
- कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे.
- जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे. राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.
- अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अमलात आणणे. संगणकीय प्रणालीचा वापर करणे.
- विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे.
- अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे. कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे. महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.
प्रश्न ५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
