राजकीय पक्ष
इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-3- महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात,
तेव्हा त्या संघटनांना ....... म्हटले जाते.
(अ) सरकार (ब) समाज (क) राजकीय पक्ष (ड) सामाजिक संस्था
राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते.
(२) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष ...... येथे आहे.
(अ) ओडिशा (ब) आसाम (क) बिहार (ड) जम्मू आणि काश्मीर
नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर येथे आहे.
(३) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर ........... या राजकीय पक्षात झाले.
(अ) आसाम गण परिषद (ब) शिवसेना
(क) द्रविड मुनेत्र कळघम (ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर द्रविड मुनेत्र कळघम या राजकीय पक्षात झाले.
प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
हे विधान बरोबर आहे;
कारण :
राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवतात, तसेच शासनाच्या योजना व धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना पाठिंबा मिळवतात. जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला कळवण्याचे कार्यही ते करतात. अशा रितीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.
(२) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.
हे विधान बरोबर आहे;
कारण :
राजकीय पक्ष हे समाजाचे अविभाज्य घटक असून, ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कार्य करतात. समाजाच्या भूमिकेनुसार आणि विचारसरणीनुसार ते समाजात कार्यरत असतात. त्यामुळे राजकीय पक्ष हे एक प्रकारचे सामाजिक संघटन मानले जातात.
(३) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.
हे विधान चूक आहे;
कारण :
- १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी सरकारे अधिकारावर आली.
- पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.
- १९७७ चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.
- म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.
(४) ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.
हे विधान चूक आहे;
कारण :
- भारतीय निवडणूक आयोग काही निकषांनुसार राजकीय पक्षांना राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देतो. यामध्ये निवडणुकीत मिळालेल्या जागा आणि मतांची टक्केवारी यांचा समावेश असतो.
- शिरोमणी अकाली दल या निकषांमध्ये बसत नसल्याने, प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखला जातो.
- तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे; तर प्रादशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.
प्रश्न ३. पुढील संकल्पना स्पष्ट करा.
(१) प्रादेशिकता
- भारत विविध भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण देश आहे.
- या विविधतेतून लोकांमध्ये आपापल्या भाषेची, संस्कृतीची आणि प्रदेशाची अस्मिता निर्माण होते.
- या अस्मितेतून लोक आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला प्राधान्य देऊ लागतात. यालाच 'प्रादेशिकता' असे म्हणतात.
(२) राष्ट्रीय पक्ष
राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना 'राष्ट्रीय पक्ष' असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवले आहेत-
- किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान ६ टक्के मते मिळणे आवश्यक.
- किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे.
- किंवा आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा निवडून येणे आवश्यक.
- किंवा किमान चार राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.
प्रश्न ४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये :
- सत्ता मिळवणे : निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे, हा राजकीय पक्षांचा मुख्य हेतू असतो.
- विचारसरणीचा आधार : प्रत्येक राजकीय पक्षाची स्वतःची अशी एक विचारसरणी असते. या विचारसरणीला जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सर्वच पक्ष करीत असतात. त्यालाच 'पक्षाचा जनाधार' असे म्हणतात.
- पक्ष कार्यक्रम : राजकीय पक्ष आपल्या विचारसरणीवर आधारित कार्यक्रम निश्चित करतात.
- सरकार स्थापन करणे : बहुमत मिळवणारा पक्ष 'सत्ताधारी पक्ष' असतो; तर बहुमत न मिळालेले पक्ष 'विरोधी पक्ष' म्हणून काम करतात.
- शासन व जनता यांच्यातील दुवा : राजकीय पक्ष शासन व जनता यांतील दुवा म्हणून काम करतात. जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत नेणे व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे काम राजकीय पक्ष करीत असतात.
(२) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे ?
- स्वातंत्र्योत्तर काळात बरीच वर्षे केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच पक्ष प्रबळ होता. म्हणजेच तेव्हा 'एक प्रबळ पक्षपद्धती' होती.
- १९७७ मध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन एक प्रबळ पक्षपद्धतीला आव्हान देऊन त्याचा प्रभाव संपवला.
- १९८९ नंतर लोकसभेत एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे स्थापन झाली.
- सुरुवातीस अस्थिर असणारी आघाडी सरकारे १९९९ नंतर स्थिरावली.
- प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.
Click on below link to Download PDF from store
इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-३-राजकीय पक्ष-नोट्स
इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-३-राजकीय पक्ष-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ- २ : निवडणूक प्रक्रिया - Online Solutions Next Chapter : पाठ- ४ : सामाजिक व राजकीय चळवळी - Online Solutions |