भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने
इयत्ता १० वी-राज्यशास्त्र-पाठ-५- महाराष्ट्र बोर्ड
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
(१) लोकशाहीमध्ये ......... निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
(अ) राजकीय पक्ष
(ब) न्यायालये
(क) सामाजिक संस्था_
(ड) वरीलपैकी नाही.
लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात.
(२) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ........... .
(अ) धार्मिक संघर्ष
(ब) नक्षलवादी कारवाया
(क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
(ड) गुंडगिरीला महत्त्व
जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे
प्रश्न २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
(१) लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.
हे विधान बरोबर आहे.
कारण :
लोकशाही केवळ शासनापुरती मर्यादित न राहता ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांचे हक्क व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सतत जागरूक प्रयत्न आवश्यक असतात. भ्रष्टाचार, हिंसा आणि गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.
(२) डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे.
हे विधान चूक आहे.
कारण :
जमीनदारांनी शेतकरी व आदिवासींच्या जमिनी बळकावल्यामुळे त्यांना न्याय मिळावा म्हणून नक्षलवाद्यांनी चळवळ सुरू केली. मात्र, कालांतराने ही चळवळ हिंसक बनली आणि सरकारविरोधात हल्ले करू लागली. त्यामुळे मूळ उद्दिष्ट बाजूला राहून शेतकरी व आदिवासींच्या समस्या दुय्यम ठरल्या.
(३) निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो.
हे विधान बरोबर आहे.
कारण :
लोकशाही बळकट होण्यासाठी पारदर्शक आणि न्याय्य निवडणुका आवश्यक असतात. मात्र, निवडणुकीत भ्रष्टाचार, बनावट मतदान, पैसे किंवा वस्तूंचे वाटप, मतदार किंवा मतपेट्यांचे अपहरण यांसारखे प्रकार घडतात. त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होतो.
प्रश्न ३. संकल्पना स्पष्ट करा.
(१) डावे उग्रवादी
- भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर जमीनदारांकडून होणारा अन्याय दूर करून त्यांच्याकडील जमिनी बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली. या चळवळीवर मार्क्सवादाचा प्रभाव असल्याने त्यांना 'डाव्या विचारसरणीचे' म्हणून संबोधले जाते.
- सुरुवातीच्या उद्दिष्टांपासून भरकटत जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे.
- शेतकरी-आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे. राजकीय नेते, पोलीस, लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत.
(२) भ्रष्टाचार
- कायद्याचा भंग करून, वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारांचा गैरवापर करणे. याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात.
- भ्रष्टाचार आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो.
- अधिकारांचा गैरवापर, निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व भ्रष्टाचाराचेच प्रकार आहेत.
- भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो.
प्रश्न ४. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?
- सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे.
- गुन्हेगारांना कडक शासन देण्यासाठी न्यायालये स्वतंत्र ठेवणे.
- शासनाबरोबरच सामाजिक व वैयक्तिक पातळीवर लोकशाहीचा अवलंब करणे.
- शासनव्यवहारांच्या सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढवणे.
- समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, न्याय इत्यादी मूल्यांची वैयक्तिक जीवनातही जोपासना करणे.
(२) राजकारणाचे गुन्हे गारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ?
- राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते.
- पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात.
- निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात.
- असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले, की लोकशाही कमकुवत होते.
(३) राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?
राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात -
- निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.
- राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.
- राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.
- भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.
Click on below link to Download PDF from store
इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-५-भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने-नोट्स
इयत्ता-१० वी-राज्यशास्त्र-पाठ-५-भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने-स्वाध्याय प्रश्नोत्तरे
All Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-10-History(18 PDF)-Rs.71
Useful links :
Main Page : - महाराष्ट्र बोर्ड -इयत्ता १० वी-इतिहास व राज्यशास्त्र - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ- ४ : सामाजिक व राजकीय चळवळी - Online Solutions |