मानवी शरीर व इंद्रिय संस्था
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -11- Maharashtra Board
नोट्स
अभ्यासघटक :
|
इंद्रिय संस्था : इंद्रिये ऊतींपासून बनलेली असतात. इंद्रिय संस्था समान काम करणाऱ्या अवयवांपासून बनलेली असतात. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात.
जीवनप्रक्रिया : सजीवांतील लक्षणे प्रकषन दिसून येतात आणि ज्या प्रक्रियांनी जगणे अबाधित राहते, अशा प्रक्रियांना जीवनप्रक्रिया असे म्हणतात.
- पचनसंस्था , श्वसनसंस्था , रक्ताभिसरण संस्था , चेतासंस्था , उत्सर्जन संस्था , प्रजनन संस्था , अस्थिसंस्था , स्नायूसंस्था अशा अनेक इंद्रिय संस्था आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी कार्यरत असतात.
- आपल्या शरीरात चालणाऱ्या अनेक जीवनप्रक्रिया जसे, अभिसरण, श्वसन, पचन इत्यादी आपण झोपेत असतानाही चालूच असतात.
- मानवी शरीरातील सर्व जीवनप्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ऊर्जानिर्मिती पेशींमध्ये होते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्नघटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. ही कामे श्वसनसंस्था व रक्ताभिसरण संस्था मार्फत होतात.
- श्वसन, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था यांच्यातर्फे होणाऱ्या जीवनप्रक्रिया सतत सुरू राहतात.
श्वसन प्रक्रिया :
- नाक, घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि वायुकोश यांनी श्वासनलिका बनते. श्वासपटल आणि बरगड्यांचे स्नायू यांच्या साहाय्याने श्वासोच्छ्वासाचे कार्य सुलभ होते.
- सस्तन प्राण्यांमध्ये श्वासोच्छ्वासाचे कार्य अशी इंद्रिये पार पाडतात.
- जलचर कल्ल्यांच्या साहाय्याने श्वसन करतात.
- निरनिराळ्या अपृष्ठवंशीय प्राण्यांत वेगवेगळी श्वसनेंद्रिये असतात. अतिशय अविकसित प्राणी पेशीपटलातूनच विसरणाने श्वसन करतात.
ऊर्जानिर्मितीसाठी प्रत्येक प्राणी श्वसन करीत असतो. शरीरात ऊर्जा नसेल तर जीवनप्रक्रिया सुरळीत होणार नाहीत. श्वसनाची प्रक्रिया पुढील तीन टप्प्यांत होते.
(i) बहिःश्वसन / बाह्यश्वसनः फुप्फुसांवाटे होणाऱ्या श्वास घेणे आणि उच्छ्वास सोडणे या दोन क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन म्हणतात.
- श्वास घेणे - नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसांत जाते.
- उच्छ्वास (श्वास सोडणे) - फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील CO2 फुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते.
(ii) अंतःश्वसनः शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यादरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात. यात रक्तातून पेशींमध्ये O2 जातो व पेशींतून रक्तामध्ये CO2 येतो.
(iii) पेशीश्वसनः ऑक्सिजनमुळे पेशींतील ग्लूकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंदज्वलन होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशीश्वसन असे म्हणतात.
C6H12O6 + 6O2 → 6CO2 + 6H2O + ऊर्जा (38ATP)
श्वसन संस्था (Respiratory system) : रचना व कार्य :
घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वसनी, श्वसनिका आणि फुप्फुसे या अवयवांपासून श्वसन संस्था बनते. नाकपुड्यांमार्गे तसेच तोंडावाटे हवा शरीरात येते. त्यामुळे श्वसनाचा मार्ग नाकपुड्यांपासूनच सुरू होतो.
(i) नाक (Nose) : श्वसन संस्थेची सुरुवात नाकात, सूक्ष्म केस व श्लेष्मल अस्तर.
- कार्य : हवा आत घेणे-बाहेर सोडणे. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते.
(ii) घसा (Pharynx) : घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका पुढे, अन्ननलिका मागे, वरच्या बाजूस अधिकंठ (Epiglottis)
- कार्य : अधिकंठामुळे अन्नकण श्वसनमार्गात जात नाहीत. घशाच्या मार्गातून हवा आत सरकते.
(iii) श्वासनलिका (Trachea) : श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो.
- कार्य : हवा फुप्फुसांच्या आत नेणे. तसेच उच्छ्वासाची हवा बाहेर आणणे. अन्न आणि हवा या दोन्हींसाठी समान मार्ग. अन्ननलिका आणि श्वासनलिका हे दोन्ही मार्ग घशानंतर सुरू होतात.
(iv) फुप्फुसे (Lungs) : छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एकेक फुफ्फुस असते.
प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण असते. त्यास फुप्फुसावरण (Pleura) म्हणतात.
- कार्य : फुप्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. वायूची देवघेव होण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे.
(v) वायुकोश : फुप्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना वायुकोश म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझि त असते. तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते.
- कार्य : रक्तातून ऑक्सिजन शोषून घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे ही वायूंची प्रत्यक्ष देवघेव करणे. फुप्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो.
श्वसन क्रियेतील वायूंची देवघेव
(vi) श्वासपटल (Diaphragm) : बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी (उरोपोकळी) यांच्या दरम्यान असते.
- कार्य : सतत आकुंचन प्रसरण करून श्वासोच्छ्वासासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली करते.
श्वासपटलाची हालचाल :
- श्वास : बरगड्या किंचित वर उचलणे. श्वासपटल खाली जाणे. या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते.
- उच्छ्वास : बरगड्या पूर्ववत होणे. श्वासपटल वर जाणे. फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते.
रक्ताभिसरण संस्था (Blood circulatory system) :
रक्ताभिसरण : शरीरात रक्ताच्या साहाय्याने एका भागात संश्लेषित केलेले किंवा शोषून घेतलेले पदार्थ किंवा वायू दुसऱ्या भागाकडे पोहोचवणे म्हणजेच रक्ताभिसरण क्रिया होय.
- हृदय, धमन्या, शिरा, रक्तकेशिका, रक्त पेशी अशांचा रक्ताभिसरण संस्थेत समावेश होतो. यांपैकी हृदय व रक्तवाहिन्या ही इंद्रिये आहेत.
- शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन रक्ताभिसरण संस्था करते.
हृदयः रचना व कार्येः
हृदयः संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण करणारा स्नायुमय पंप.
- मानवी हृदय हे स्नायूंचे बनलेले असून, त्याला चार कप्पे असतात.
- मानवी हृदयाचा आकार त्याच्याच मुठीएवढा असतो. हृदयाचे वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते.
- संरक्षणासाठी हृदयाभोवती दुपदरी पेरिकार्डियम आवरण असते.
- हृदयाची भिंत विशिष्ट स्नायूंनी बनलेली असते. हे स्नायू अनैच्छिक प्रकारचे असतात. या स्नायूंमध्ये सतत आकुंचन व शिथिलीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हृदयाचे नियमित स्पंदन चालते.
- वरचे दोन कप्पे उजवे आणि डावे अलिंद आणि खालचे दोन कप्पे उजवे आणि डावे निलय असे असतात.
कार्येः
- उजव्या अलिंद आणि उजव्या निलयाच्या मध्ये त्रिदली झडप असते; तर डाव्या अलिंद आणि डाव्या निलयाच्या मध्ये द्विदली झडप असते. या दोन्ही झडपा रक्तप्रवाह उलट्या दिशेने जाऊ देत नाहीत.
- हृदयाच्या उजव्या बाजूकडे ऑक्सिजनविरहित रक्त असते. हृदयाच्या डाव्या बाजूकडे ऑक्सिजनयुक्त रक्त असते.
- ऊर्ध्वमहाशीर आणि अधोमहाशीर या दोन महानीला संपूर्ण शरीरातून ऑक्सिजनविरहित रक्त उजव्या अलिंदात आणून पोहोचवतात.
- डाव्या अलिंदात फुप्फुसांतून ऑक्सिजनयुक्त रक्त फुप्फुस नीलेमार्फत येते.
- ऑक्सिजनविरहित रक्त फुप्फुसांकडे शुद्धीकरणासाठी फुप्फुस-रोहिणीद्वारा उजव्या निलयातून जाते.
- ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या निलयातून महाधमनीद्वारे संपूर्ण शरीराला पुरवण्यासाठी पाठवले जाते.
रक्तवाहिन्या - रचना व कार्येः हृदयाच्या सतत स्पंदनामुळे रक्तवाहिन्यांत सतत रक्त फिरत राहते. रक्त वाहिन्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत.
- (i) रोहिणी/धमन्याः हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात. फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते. त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात.
- (ii) नीला (शीरा) : शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. फुप्फुसशिरां व्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती (कार्बनडायऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेले जाते. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. यांची भित्तिका पातळ असते. तसेच, यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.
केशवाहिन्या :
- धमनीच्या शाखा, त्यांच्या उपशाखा असे विभाजन होत होत शेवटी केशवाहिनी किंवा केशिका बनते.
- केशिका पुन्हा जोडल्या जात जात त्यापासून शिरा बनतात.
- केशिका - केसाप्रमाणे, भित्तिका पातळ, एकसरी व पातळ, प्रत्येक अवयवात केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.
- ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके, जीवनसत्त्वे इत्यादींचा पुरवठा पेशींना केशिकेच्या भित्तिकेतून केला जातो.
- पेशीतील चयापचयाने तयार झालेले टाकाऊ पदार्थ केशिकेच्या भित्तिकेतूनच पेशीबाहेर येतात व रक्तात शिरतात.
हृदयातील रक्ताभिसरण / हृदयाचे कार्य :
- शरीरातील प्रत्येक पेशीला रक्त पोहोचवणे आणि तेथून ते परत आणणे या क्रियेस रक्ताभिसरण म्हणतात. हे कार्य हृदयाच्या स्पंदनाने साध्य होते.
- एक आकुंचन व त्यानंतरचे एक शिथिलीकरण म्हणजे हृदयाचा एक ठोका.
- ज्या वेळी रक्त धमनीतून वाहते. त्या वेळी या धमन्या प्रसरण पावतात. वाहणाऱ्या रक्तप्रवाहामुळे हे ठोके शरीराच्या सर्व भागांत अनुभवले जातात.
- सर्वसाधारणपणे एका मिनिटात हृदयाचे 72 ठोके होतात.
- हृदयाच्या ठोक्यांची संख्या पुढील बाबींवर अवलंबून असते : (1) व्यायाम (2) काम (3) मानसिक कारणे (4) भावना (5) निद्रा (6) वय (7) लिंग.
- प्रत्येक ठोक्याला 75 मिलिलीटर रक्त हृदयातून बाहेर पडते.
- हृदयाच्या झडपा बंद होण्यामुळे 'लब्ब' आणि 'डब्ब' असे आवाज हृदयाच्या स्पंदनात ऐकू येतात.
रक्त (Blood) : रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते तसेच सामू (pH) 7.4 असतो. रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते.
(i) रक्तद्रव (Plasma) : रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने (अल्ब्युमिन, ग्लोब्युलीन्स, फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन), 1 ते 2 % असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात.
- अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी वि भागण्याचे काम करते.
- ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.
- फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.
- असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण
- ठेवतात.
(ii) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells) :
(a) लोहित रक्तपेशी (RBC) :
- अकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.
- रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.
(b) श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) :
- आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात.
- या पेशींचे 5 प्रकार आहेत - बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील, मोनोसाईट्स लिम्फो साईट्स - पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.
- कार्य - पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.
(c) रक्तपट्टीका (Platelets)
- या अतिशय लहान आणि तबकडीच्या अकारासारख्या असतात
- रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 5 लक्ष ते 4 लक्ष असतात.
- कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.
रक्ताची कार्ये
- वायूंचे परिवहनः फुप्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुप्फु सांमध्ये CO2 आणला जातो.
- पोषणतत्त्वांचे वहन (पेशींना खाद्य पुरविणे) : अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले , मेदाम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषणत्त्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.
- टाकाऊ पदार्थांचे वहनः युरिया, अमोनिया, क्रिएटिनीन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात.
- शरीररक्षणः रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात.
- विकर व संप्रेरक परिवहनः विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यां ची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात.
- तापमान नियमनः योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यांमुळे शरीराचे तापमान 37 0C इतके कायम राखले जाते.
- शरीरातील सोडिअम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे.
- रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात.
मानवी रक्तगट (Human blood groups) :
- रक्तातील प्रतिजन (तांबड्या रक्तपेशीवर स्थित) आणि प्रतिपिंडे (रक्त द्रवावर स्थित) या दोन प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.
- मानवी रक्ताचे A, B, AB आणि O असे चार प्रमुख गट असून आरएच (पॉझिटिव्ह) आणि आरएच (निगेटिव्ह) हे त्यातील उपप्रकार.
- म्हणून मानवी रक्तगटाचे एकूण आठ प्रकार : [ARh+, ARh-, BRh+, BRh-, ABRh+, ABRh-, ORh+, ORh-]
- रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात.
रक्तदान : रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. ते दानच करावे लागते.
- रक्त पराधान : शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला ‘रक्त पराधान’ म्हणतात.
- रक्तपेढी : येथे निरोगी व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून ते रेफ्रिजरेटेड परिस्थितीत ठेवले जाते.
- रक्तदाता - रक्त देणारी व्यक्ती.
- रक्तग्राही - रक्त घेणारा रुग्ण.
- सर्वयोग्य दाता (Universal donor) : O रक्तगटाच्या व्यक्ती. O गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते.
- सर्वयोग्य ग्राही (Universal recipient): AB रक्तगटाच्या व्यक्ती. AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते
- रक्त कोणाला द्यावे लागते : शस्त्रक्रियेच्या वेळी, अपघातग्रस्त, अॅनेमिया, थॅलॅसेमिया, कँसरग्रस्त, प्रसवकाळ इत्यादी परिस्थितीत.
- रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
- रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. रक्त पराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो.
रक्तदाब (Blood pressure) : हृदयाच्या आकुंचनप्रसरणामुळे धमन्यांतील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते. आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास ‘रक्तदाब’ असे म्हणतात.
- शरीराच्या सर्व भागांत रक्त पोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो.
- हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास ‘सिस्टॉलिक दाब’(अकुंचक दाब) असे म्हणतात.
- प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास ‘डायस्टोलिक दाब’ (प्रकुंचनीय दाब) असे म्हणतात.
- निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120/80 मिमी ते 139/89 मिमी मर्क्युरीच्या (पाऱ्याच्या) स्तंभाएवढा असतो.
- रक्तदाब मोजण्यासाठी ‘स्पिग्मो मॅनोमीटर’ नावाचे यंत्र वापरतात.
उच्च रक्तदाब : माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब होय. यात दोन्ही सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दाब वाढलेले असतात.
- उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते.
रक्तशास्त्र (हिमॅटॉलॉजी) : रक्त, रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा. रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे व त्यांवर उपचार करणे याविषयीचे संशोधनही या शाखेत केले जाते
लक्षात ठेवा :
|
माहिती साठी :
|
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-11-मानवी शरीर व इंद्रिय संस्था - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-11-मानवी शरीर व इंद्रिय संस्था - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 10 : पेेशी व पेशीअंगके - Online Notes Next Chapter : पाठ - 12 : आम्ल, आम्लारी ओळख - Online Notes |
its best for study and made simple for understanding and essy to use them