आम्ल, आम्लारी ओळख
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -12- Maharashtra Board
नोट्स
अभ्यासघटक :
|
आम्ल (Acid) :
विशिष्ट प्रकारच्या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात.
- आम्ले पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात.
- प्राणी आणि वनस्पर्तीमध्ये सुद्धा आम्ले असतात.
- खाद्यपदार्थामध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बनिक आम्ल असेही म्हणतात. ही आम्ले क्षीण प्रकृतीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ल (Weak acid) म्हणतात.
- काही आम्ले तीव्र प्रकृतीची असतात. ती दाहक असतात. उदा., सल्फ्युरिक आम्ल (H2SO4). हायड्रोक्लोरिक आम्ल (HCI) आणि नायट्रिक आम्ल (HNO3). या आम्लांना 'खनिज आम्ल' असेही म्हणतात.
- त्यांची संहत द्रावणे त्वचेवर पडल्यास त्वचा भाजते तसेच त्यांची धुरी श्वसनाद्वारे किंवा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास ही हानिकारक ठरते.
- संहत आम्ले हळू हळू पाण्यात घालून त्यांचे विरल आम्लात रूपांतर करता येते.
आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन (H+) उपलब्ध करून देते/निर्माण करते. उदा. पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक (HCl)(aq) चे विघटन होते.
HCl (aq) → H+ + Cl –
(हायड्रोक्लोरिक आम्ल) (हायड्रोजन आयन) (क्लोराइड आयन)
नैसर्गिक आम्ले : काही नैसर्गिक (सेंद्रिय) आम्ले सौम्य प्रकृतीची असल्याने खनिज आम्लाप्रमाणे हानिकारक/अपायकारक नसतात.
काही नैसर्गिक आम्ले :
पदार्थ /स्रोत | आम्ले (नैसर्गिक/सेंद्रीय) |
व्हिनेगर | ॲसिटिक आम्ल |
संत्रे | ॲस्कॉर्बिक आम्ल |
चिंच | टार्टारिक आम्ल |
टोमॅटो | ऑक्सॅलिक आम्ल |
दही | लॅक्टिक आम्ल |
लिंबू | सायट्रिक आम्ल |
आम्लाचे गुणधर्म :
- आम्लाची चव आंबट असते.
- आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन (H+) हा मुख्य घटक असतो.
- आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते.
- आम्लाची कार्बो नेटशी अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो.
- आम्लामुळे निळा लिटमस कागद तांबडा होतो.
आम्लाचे उपयोग :
- रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात.
- तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, औषधी द्रव्ये, रंग (dyes/paints), स्फोटक द्रव्ये यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा वापर होतो.
- भिन्न-भिन्न क्लोराइड क्षार बनविण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात.
- विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी (विद्युत घट) मध्येही वापरतात.
- पाणी जंतुविरहि त करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो.
- लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनविण्याकरिता आम्लाचा वापर होतो.
माहितीसाठी :
- खनिज आम्ले शरीराला हानिकारक असतात. पण अनेक सेंद्रिय आम्ले आपल्या शरीरात आणि वनस्पतींमध्येही असतात आणि ती हितकारक असतात.
- आपल्या शरीरातील DNA (डिऑक्सिरायबो न्यूक्लिइक ॲसिड) हे आम्ल असते, जे आपले आनुवंशिक गुण ठरवते.
- प्रोटिन शरीरातील पेशींचा भाग असतात, ते ॲमिनो ॲसिडने बनलेले असतात.
- शरीरातील मेद (Fat) हा मेदाम्लापासून (Fatty Acid) बनलेला असतो.
आम्लारी (Base) :
आम्लारी : जे पदार्थ तुरट/कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात; त्यांना आम्लारी म्हणतात.
- उदा., चुन्याची निवळी [Ca(OH)2]. खाण्याचा सोडा (NaHCO3), कॉस्टिक सोडा (NaOH) व साबण.
- आम्लारी हे रासायनिक दृष्ट्या आम्लाच्या विरुद्ध गुणधर्मांचे असतात.
आम्लारी : हा एक असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साइड आयन (OH-) उपलब्ध करून देतात/निर्माण करतात.
उदा. NaOH (aq) → Na+(aq) + OH-(aq)
(सोडिअम हायड्रॉक्साइड) (सोडिअम आयन) (हायड्राक्साइड आयन)
आम्लारी, सूत्रे व उपयोग :
आम्लारीचे नाव | सूत्र | उपयोग |
सोडिअम हायड्रॉक्साइड / कॉस्टिक सोडा | NaOH | कपडे धुण्याच्या साबणामध्ये |
पोटॅशिअम हायड्रॉक्साइड / पोटॅश | KOH | अंघोळीचे साबण, शॅम्पू |
कॅल्शिअम हायडॉक्साइड / चुन्याची निळी | Ca(OH)2 | चुना/रंग सफेदीकरिता |
मॅग्नेशिअम हायड्रॉक्साइड / मिल्क ऑफ मॅग्नेशिआ | Mg(OH)2 | आम्लविरोधक औषध |
अमोनिअम हायड्रॉक्साइड | NH4OH | खते तयार करण्यासाठी |
आम्लारीचे गुणधर्म :
- आम्लारीची चव कडवट असते.
- त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो.
- आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH-)हा मुख्य घटक असतो.
- सामान्यतः धातूंची ऑक्साइड आम्लारीधर्मी असतात.
उदासीन : जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात, ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात.
उदासिनीकरण : आम्लाची आम्लारीबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात, याला उदासिनीकरण म्हणतात.
आम्लामध्ये हायड्रोजन आयन (H+) आणि आम्लारीमध्ये हायड्रॉक्साइड आयन (OH-) असतात.
उदा. आम्ल + आम्लारी → क्षार + पाणी
HCl + NaOH → NaCl + H2O
(हायड्रोक्लोरिक आम्ल) (सोडिअम हायड्रॉक्सा इड) (सोडिअम क्लोराइड) (पाणी)
उपयोग : टूथपेस्टमध्ये फ्ल्युराइडस् व आम्लारी पदार्थ असतात. यामुळे दात घासताना असलेल्या आम्लधर्मी लाळेचे उदासिनीकरण होते व अतिरिक्त आम्ल निघून जाते व दात स्वच्छ होतात. म्हणून दात घासताना टूथपेस्ट वापरतात. यामुळे दातांची झीज व कीड थांबते.
माहितीसाठी :
- आपल्या जठरात हायड्रोक्लारिक आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते. मात्र हे आम्ल गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. यावर उपाय म्हणून सामान्यतः आम्लारीधर्मी औषधे दिली जातात. त्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिआ (Mg(OH)2) चा समावेश असतो.
- असे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासिनीकरण घडवून आणतात.
- रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीतील आम्लाचे प्रमाण वाढते. जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आम्लारीधर्मी चुनखडी किंवा चुन्याची निवळीसारखी रसायने शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिसळतात. असे आम्लारी जमिनीतील आम्लांचे उदासिनीकरण करतात.
दर्शक (Indicator) : जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात त्यांना ‘दर्शक’ असे म्हणतात.
- आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक म्हणून विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो.
दर्शक आणि त्यांचे आम्ल व आम्लारी द्रावणातील रंग :
दर्शक पदार्थाचे नाव | दर्शकाचे मूळ रंग | आम्लातील रंग | आम्लारीतील रंग |
लिटमस कागद | निळा | तांबडा | निळा (तसाच राहतो) |
लिटमस कागद | तांबडा | तांबडा (तसाच राहतो) | निळा |
मिथिल ऑरेंज | नारंगी | गुलाबी | पिवळा |
फिनॉल्फ्थॅलिन | रंगहीन | रंगहीन | गुलाबी |
मिथिल रेड | तांबडा | तांबडा | पिवळा |
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-12-आम्ल, आम्लारी ओळख - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-12-आम्ल, आम्लारी ओळख - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 11 : मानवी शरीर व इंद्रिय संस्था - Online Notes Next Chapter : पाठ - 13 : रासायनिक बदल व रासायनिक बंध - Online Notes |