प्रकाशाचे परावर्तन
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -16- Maharashtra Board
नोट्स
अभ्यासघटक :
|
वस्तूंपासून येणारा प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तेव्हा वस्तू आपणांस दिसू लागतात. अंधाऱ्या खोलीत कोणत्याही वस्तूवर प्रकाश पडत नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये प्रकाश शिरत नाही. परिणामी अंधाऱ्या खोलीत दृष्टीची संवेदना होत नाही,
प्रकाशाचे परावर्तन (Reflection of light) :
एखाद्या पृष्ठभागावर प्रकाशकिरणे पडली, तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात.
- आपाती किरण (Incident ray) : पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशकिरणास आपाती किरण म्हणतात.
- आपतन बिंदू (परावर्तन बिंदू) : आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतो, त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात.
- स्तंभिका : आपतन बिंदूच्या पृष्ठभागाशी 90° चा कोन करणाऱ्या रेपेस स्तंभिका म्हणतात.
- परावर्तित किरण (Reflected ray): पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात.
- आपतन कोन : आपाती किरण व स्तंभिकेमधील कोनास आपतन कोन म्हणतात.
- परावर्तन कोन : परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोनास परावर्तन कोन म्हणतात.
परावर्तनाचे नियम :
प्रकाश परावर्तनाचे तीन नियम खालीलप्रमाणे आहेत.
- आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात.
- आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
- आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरूद्ध बाजूस असतात.
प्रकाश परावर्तनाचे प्रकार :
(i) प्रकाशाचे नियमित परावर्तन (Regular reflection) : सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास ‘नियमित परावर्तन’ म्हणतात.
- यात समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात.
- जर आपाती किरणांचे आपाती कोन i1, i2, i3 .... असतील व त्यांचे परावर्तन कोन क्रमशः r1, r2, r3.... असतील, तर i1 = i2= i3-----, r1= r2= r3=-------
(ii) प्रकाशाचे अनियमित परार्तन (Irregular reflection) : खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास ‘अनियमित परावर्तन’ म्हणतात.
- अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाहीत,
- म्हणजे i1 ≠ i2 ≠ i3 --, r1 ≠ r2 ≠ r3 ≠--. परिणामी परावर्तित किरण समांतर नसतात, तर ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात.
लक्षात ठेवा :
- नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनांमध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात.
- अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले नसते, तर ते परावर्तित पृष्ठभाग अनियमित (खडबडीत) असल्याने मिळालेले असते.
- अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो. परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचेच असतात, म्हणजे i1 = r1, i2 = r2,...
परावर्तित प्रकाशाचे परावर्तन (Reflection of reflected light) :
परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते. कॅलिडोस्कोप (शोभादर्शी/चारुदर्शी) व परिदर्शी यांचे कार्य परावर्तित प्रकाशाचे परावर्तन यावर आधारलेले आहे.
(i) कॅलिडोस्कोप हा परावर्तित प्रकाशाचे परावर्तन यावर आधारीत एक उपकरण आहे, ज्याचा उपयोग रंगीबेरंगी आणि सममितीपूर्ण रचना (patterns) पाहण्यासाठी केला जातो.
- यामध्ये तीन किंवा अधिक आरसे ठराविक कोनात लावलेले असतात. या आरसांमुळे कॅलिडोस्कोपमध्ये विविध वस्तूंच्या प्रतिमा अनेक वेळा परावृत्त होतात व त्या परावृत्त प्रतिमांमुळे अद्वितीय रचना दिसतात.
- जेव्हा आपण त्याच्या एका टोकाला डोळा लावतो आणि दुसऱ्या टोकाला असलेल्या रंगीत काचांचे किंवा मण्यांचे मिश्रण हलवतो, तेव्हा आरशांमध्ये परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे सुंदर आणि सतत बदलणारे नक्षीदार आकृतींचे प्रतिबिंब दिसते.
कॅलिडोस्कोपचा उपयोग
- मनोरंजनासाठी – मुलांसाठी आकर्षक खेळण्यासारखा उपयोग केला जातो.
- डिझाइन आणि कला क्षेत्रात – वस्त्रडिझाइन, इंटीरियर डिझाइन आणि कलात्मक प्रेरणेसाठी.
- शैक्षणिक उद्देशाने – प्रकाशाचे परावर्तन आणि सममिती समजून घेण्यासाठी विज्ञान प्रकल्पांमध्ये वापरला जातो.
(ii) परिदर्शी (Periscope) : हे एक उपकरण आहे, जे प्रकाशाच्या परावर्तनाच्या सिद्धांतावर कार्य करते
पेरिस्कोपची रचना आणि कार्यप्रणाली:
- पेरिस्कोपमध्ये 450 चा कोन करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे दोन आरसे ठेवलेले असतात.
- वरच्या आरशावर पडणारा प्रकाश खालच्या आरशावर परावर्तित होतो, ज्यामुळे आपण अडथळ्यांच्या पलीकडील दृश्य पाहू शकतो.
पेरिस्कोपचा उपयोग:
- नौदल (Navy) – पाणबुडीतील खलाशी पाण्याच्या पृष्ठभागावरील दृश्य पाहण्यासाठी.
- लष्करी बंकर आणि टँक – सुरक्षितपणे बाहेर न पाहता शत्रूची हालचाल जाणून घेण्यासाठी.
- वैज्ञानिक आणि शैक्षणिक उद्देशासाठी – प्रकाशाच्या परावर्तन आणि प्रतिध्वनीच्या संकल्पना शिकण्यासाठी.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-16- प्रकाशाचे परावर्तन - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-16- प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 15 : ध्वनी - Online Notes Next Chapter : पाठ - 17 : मानवनिर्मित पदार्थ - Online Notes |