आपत्ती व्यवस्थापन
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -9- Maharashtra Board
नोट्स
अभ्यासघटक :
|
आपत्ती : आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारे संकट.
- यात राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते.
- आपत्तीचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन मुख्य प्रकार आहेत.
भूकंप (Earthquake) :
भूकंप : भूकवचामध्ये अचानक कंपने होणे किंवा भूकवचाचे अचानक काही क्षण हादरणे म्हणजे भूकंप होय.
- भूपृष्ठाचा काही भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होऊन त्यामुळे भूपृष्ठ हादरते.
- भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठावर असलेल्या पृष्ठभागावर भूकंप नाभीच्या अगदी वर असलेल्या बिंदूस भूकंप बिंदू असे म्हणतात.
- तीव्र स्वरूपाच्या लाटा/हादरे सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वांत जास्त असते.
भूकंपाचे हादरे : भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात.
- सौम्य : संख्या खूपच जास्त, विनाश कमी
- तीव्र : संख्या बरीच कमी, विनाश मोठा.
- दर वर्षाला पृथ्वीवर सुमारे 12,400-14,000 भूकंप होतात. दररोज पृथ्वीवर कोठेतरी भूकंप होत असतो.
- भूकंपाची सर्व निरीक्षणे व नोंद National Earthquakes information centre करते.
'सेस्मोग्राफ' अथवा 'सेस्मोमीटर' (Seismograph Or Seismometer) : भूकंपाची नोंद घेणारे यंत्र.
रिश्टर स्केल' : भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ या गणिती एककाचा वापर केला जातो.
भूकंपाची पूर्वसूचना देणारी आधुनिक साधने : भूकंपाची पूर्वसूचना मिळावी यासाठी लेसर रेंजिग , व्हेरी लाँग, बेसलाईन, गायगर कौंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाइड गेज, टिल्ट मीटर, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गेज यांसारखी आधुनिक साधने वापरली जातात.
भूकपाची कारणे :
- नैसर्गिक कारणे : ज्वालामुखी उद्रेक, भूपृष्ठातून बाहेर येण्याचा प्रयत्न करणारी पाण्याची वाफ.
- मानवनिर्मित कारणे : भूगर्भातील अणुचाचण्या, खाणकाम, महाकाय धरणांचा दाब.
भूकंपाचे परिणाम :
- जैविक परिणाम : मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी. जैवविविधतेचे नुकसान होऊन परिसंस्था धोक्यात येते.
- आर्थिक परिणाम : वित्तहानी, पायाभूत सुविधा नष्ट (विजेचे खांब, पाईप लाईन्स, घरे, इमारती, रस्ते, लोहमार्ग इत्यादींचे अतोनात नुकसान), शहरी भागात आगीचा धोका.
- भौगोलिक परिणाम : नद्या, नाले यांच्या प्रवाहांत बदल, त्सुनामी लाटांची निर्मिती, किनारपट्टीच्या भागांचे नुकसान, भूमिगत जलपातळीत वाढ किंवा घट.
भूकंपात घ्यायची दक्षता :
घरामध्ये असाल, तर :
हे करावे :
- शांतपणे उभे राहावे.
- जमिनीवर बसावे, एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकावे.
- जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबावे. अन्यथा घराच्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यांभोवती ठेवून चेहऱ्याचे व डोक्याचे संरक्षण करावे.
हे करू नये :
- घाबरू नये.
- इमारतीमधील लिफ्टचा वापर करू नये.
- अवघडलेल्या स्थितीत जास्त वेळ बसू नये.
- शरीराची हालचाल थांबवू नये.
- विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आगी लागतात, त्यामुळे घरातील मेन स्विच चालू ठेवू नये.
- प्रसंगी मेणबत्त्या, कंदील, काड्यापेटी यांचा वापर करू नये.
चालत्या वाहनात असाल, किंवा घराबाहेर असाल, तर :
हे करावे :
- सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवून आतच बसावे
- बॅटरी/टॉर्चचा वापर करावा.
हे करू नये :
- इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नये.
भूकंपरोधक इमारती : जमिनीची ठराविक मर्यादेपर्यत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा रितीने बांधकाम केलेल्या इमारती म्हणजे भूकंपरोधक इमारती.
भारतीय मानक संस्थेने इमारतींच्या बांधकामांसाठी बनवलेले काही कोड :
- आय एस. 456 : प्रमाणे इमारतीचे बांधकाम केले जाते.
- आय एस 1893 : भूकंपरोधक बांधकामांसाठी आरेखनांच्या संरचनांचे मानदंड.
- आयएस 13920 : भूकंप प्रभावाच्या संदर्भात सशक्त काँक्रीट संरचनाचा ताणीय विस्तार.
आग (Fire) :
आग ही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते.
उदा., उष्णतेने लागणारे वणवे, झाडांच्या घर्षणामुळे आपोआप जंगलात लागणारी आग ही नैसर्गिक आग आहे. अनवधानाने चुकून लागलेल्या आगी किंवा मुद्दामहून जाळपोळ करीत लावलेल्या आगी अशा दोन प्रकारच्या मानवनिर्मित आगी आहेत.
आगीचे प्रकार (Types of Fire) :
‘अ’ वर्गीय आग (घनरूपपदार्थ ) : सर्वसाधारण ज्वालाग्राही घनपदार्थांपासूनची आग (जसे, लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी.)
- थंडावा निर्माण करून विझवली जाते.
‘ब’ वर्गीय आग (द्रवरूप पदार्थ ) : ज्वालाग्राही द्रव पदार्था पासून लागलेली आग उदा. पेट्रोल, तेल, वार्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग इत्यादी.
- हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते.
‘क’ वर्गीय आग (वायुरूपपदार्थ ) : ॲसिटीलीन घरगुती गॅस (एल.पी.जी. गॅस) इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग.
- ओले कापड टाकून आगीची कोंडी करून विझवली जाते.
‘ड’ वर्गीय आग (रासायनिक पदार्थ ) : ज्वलनशील धातूपासून लागलेली आग यामध्ये पोटॅशिअम, सोडियम व कॅल्शिअम आहेत, हे सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात, तसेच मॅग्नेशिअम, ॲल्युमिनिअम व झिंक जे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात, तेव्हा भडका उडतो.
- रसायनांवर अवलंबून योग्य पदार्थ वापरून आग प्रतिबंध करून विझवली जाते.
‘इ’ वर्गीय आग (इलेक्ट्री कल) : यामध्ये इलेक्ट्रीकल सामान, फिटिंग इत्यादीं साधनांमुळे लागलेली
- कार्बन डायऑक्साइडसारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते.
आग विझवण्याच्या पद्धती : आग विझवणे आणि ती पसरू नये याचा प्रयत्न करणे या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत.
आग विझवण्याच्या तीन प्रमुख पद्धती :
- थंड करणे : पाणी वापरून. गारवा निर्माण करून आगीवर नियंत्रण आणणे. पाणी सहज आणि सर्वत्र उपलब्ध असते.
- आगीची कोंडी करणे : फेसासारखा पदार्थ, वाळू किंवा मातीचा वापर. ही आग विझविण्याची पद्धत तेलामुळे व विजेमुळे लागलेल्या आगीवर परिणामकारक ठरते.
- ज्वलनशील पदार्थ हलवणे : स्ट्रिरप पंपातून आगीवर सर्व बाजूंनी पाण्याचा मारा. पेटणाऱ्या वस्तू हलवणे.
काळजी व सुरक्षात्मक उपाय :
- गॅसचा रेग्युलेटर वापरात नसेल त्या वेळी, रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवा.
- आग लागलेली असताना ‘आग-आग’ असे जोराने ओरडून इतरांना सावध करा व मदतीसाठी बोलवा.
- अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलावून घ्या.
- अग्नीशमन टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती घ्या.
- प्रथमोपचार : रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपवून ठेवा व आगीत भाजलेल्यांना प्रथमोपचार देऊन तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या.
दरड कोसळणे / भूस्खलन (Land-slide) :
मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग किंवा खडक फोडून एखादा कडा पूर्णपणे कोसळणे याला दरड कोसळणे असे म्हणतात.
- नैसर्गिकरीत्या कठीण पाषाणात भेगा व फटी असतात. त्यामुळे मोठ्या खडकांचे तुकडे होतात. अतिवृष्टी झाली तर खडकांतील भेगा-फटींमध्ये पाणी शिरते आणि खडकांची झीज होते आणि वजन वाढते. असे खडक उतारी प्रदेशात घसरतात. यालाच दरड कोसळणे म्हणतात. कोसळलेल्या दरडी खाली जाऊन स्थिरावतात.
दरड कोसळण्याची कारणे :
- मोठ्या नैसर्गिक आपत्ती, उदा., भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर अशा घटनांनंतर दरडी कोसळू शकतात.
- बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमिनीची धूप होते व त्यामुळे भूस्खलन होते.
- डोंगराळ/घाटात रस्ते बांधण्यासाठी खोदकाम केल्याने डोंगर कमकुवत होऊन त्याच्या कडेचे दगड किंवा खडक कोसळतात.
दरड कोसळण्याचे परिणाम :
- नद्यांना पूर येतात.
- नद्यांचे प्रवाह बदलल्यामुळे त्यांचे मार्ग बदलतात.
- धबधब्यांचे स्थानांतरण होते.
- कृत्रिम जलाशये निर्माण होतात.
- पायथ्यालगतचे वृक्षही उन्मळून पडतात. वनस्पती जीवन नष्ट होते
- उतारावर झालेली बांधकामे कोसळून पडतात.
- माती-दगडाखाली गावे गाडली जाऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते.
- लोहमार्गावर किंवा वाहतुकीच्या रस्त्यांवर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत होते.
उपाय : रस्त्याच्या आणि रेल्वेरुळांच्या कडेने धातूची जाळी लावून दरड कोसळली तरी नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाते. डोंगरउताराच्या कडेवर झाडे लावून जमिनीची धूप रोखावी.
पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटना : दिनांक 31 जुलै 2014 रोजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावाच्या जवळच्या डोंगरावर मुसळधार पावसाच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. त्यात 151 लोक मृत्युमुखी पडले. 44 निरनिराळ्या घरांतील अंदाजे 200 हून जास्त लोक जिवंतपणी मातीखाली गाडले गेले.
आपत्ती निवारण - नियोजन आराखडा :
आपत्ती आली असताना त्वरित मदतकार्य पोहोचावे यासाठी एक आपत्ती निवारणाचा नियोजन आराखडा तयार केला जातो. त्यात महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करतात.
- शाळा, महाविद्यालये आणि विविध कार्यालये अशा ठिकाणी आपत्तीच्या वेळी नेमके कसे मदतकार्य करायचे हे त्वरित समजावे यासाठी आपत्ती निवारण नियोजन आराखडा तयार केलेला असतो.
- उदा., शाळेसाठी तयार करण्याच्या अशा आराखड्यात शाळेची प्राथमिक माहिती, शाळा आपत्ती व्यवस्थापन समितीची रचना, शाळेच्या इमारतीची विस्तृत माहिती आणि शाळेच्या मैदानाविषयी माहिती, शाळा किती वाजता भरते, सुटते अशी शाळेची दिनचर्या, शाळेतील संभाव्य धोके, शाळेचा आपत्ती व्यवस्थापन नकाशा अशा मुद्द्यांचा समावेश असलेल्या आराखड्याला विशेष महत्त्व आहे.
आपत्तीनिवारण कार्य करणाऱ्या संस्था :
- राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था : केंद्र शासनाच्या भू-विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भूकंप व विविध आपत्तीं-संदर्भात संशोधनाचे कार्य करते.
- इंडियन माउंटनीयरिंग इन्स्टिट्यूट : भूस्खलनाच्या संभाव्य परिणामांचा सुनियोजित अंदाज.
- इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट, इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी व वर्ल्ड जिऑलॉजिकल फोरम : या आंतरराष्ट्रीय संस्था भारतीय संस्थांना मदत करतात.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-9-आपत्ती व्यवस्थापन - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-9-आपत्ती व्यवस्थापन - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 8 : प्रदूषण - Online Notes Next Chapter : पाठ - 10 : आपत्ती व्यवस्थापन - Online Notes |