पेशी व पेशीअंगके
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -10- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. मला ओळखा
(अ) ATP तयार करण्याचा कारखाना आहे.
तंतुकणिका
(आ) एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो.
रिक्तिका
(इ) पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे.
आंतर्द्रव्य-जालिका
(ई) पेशींचा जणू रसायन कारखाना.
वनस्पती पेशीत हरितलवक हे कारखाना म्हणता येईल. रायबोझोम हा प्रथिन-संश्लेषणाचा कारखाना आहे. तंतुकणिका यालाही रसायन कारखाना म्हणता येईल परंतु त्याला ऊर्जानिर्मिती केंद्र हे वर्णन जास्त समर्पक आहे. गॉल्गी काय हे स्रावी अंगक असल्याने त्यालाही रसायन
कारखाना म्हणता येईल.
(उ) माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी.
हरितलवक.
प्रश्न 2. तर काय झाले असते?
(अ) लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या.
तंतुकणिका या पेशीमध्ये ऑक्सिडीकरण करून ऊर्जानिर्मिती करीत असतात. त्यासाठी ऑक्सिजनचा वापर करून ऊर्जासमृद्ध ATP संयुग निर्माण केले जाते, पेशीतील कर्बोदके, मेद आणि प्रथिने यांचा वापर या ऊर्जानिर्मितीत केला जातो. जर लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर ऑक्सिजन वाहून नेण्याच्या ऐवजी तो वापरला गेला असता. पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता.
(आ) तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.
तंतुकणिका पेशीमध्ये ऊर्जानिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, लवके, मुख्यतः प्रकाश-संश्लेषण मध्ये सहभागी होतात आणि प्रकाश ऊर्जेला रासायनिक ऊर्जेत परिवर्तित करतात. जर या दोन्ही पेशींमध्ये फरक नसता तर हे दोन्ही प्रक्रिया एकत्र झाल्या असत्या आणि ऊर्जानिर्मितीचे स्वरूप बदलले असते. दोन्ही पेशींत त्यांच्या त्यांच्या कार्याप्रमाणे भिन्न विकरे असतात. तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता तर त्यांची नेमकी कार्ये पार पडली नसती.
(इ) गुणसूत्रांवर जनुके नसती.
- जनुके प्रजननाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. जनुके हे आनुवंशिक माहितीचे वाहक असतात. जर जनुके नसती तर जीवांना त्यांच्या गुणधर्मांची वारसा देणे शक्य नसते आणि त्यांच्या संततीत विविधता निर्माण होण्याची प्रक्रिया थांबली असती.
- जनुकांमुळे प्रथिन-संश्लेषण प्रक्रिया देखील नियमित चालू असते. त्याही प्रक्रियेत अडथळा येईल.
(ई) पारपटल निवडक्षम नसते.
- पारपटल निवडक्षम असल्यामुळे पेशीमधून विशिष्ट पदार्थांचा वापर आणि वाहतूक नियंत्रित होते. जर पारपटल निवडक्षम नसती तर कोणत्याही पदार्थाची वाहतूक नियंत्रणात न राहता, सर्व पदार्थांची वाहतूक अव्यवस्थित झाली असती.
- निवडक्षम पारपटल पोषक तत्त्वे पेशीमध्ये प्रवेश करायला आणि कचरा बाहेर जाण्यास मदत करते. यामुळे पोषण तत्त्वांचा अभाव आणि कचऱ्याची वाढ होऊन पेशींवर प्रभाव पडला असता.
(उ) वनस्पतीत ॲन्थो सायानिन नसते.
वनस्पतीत अॅन्थोसायनिन नसते, तर कोणत्याच वनस्पतीच्या भागात जांभळा किंवा निळा रंग दिसला नसता. परागीभवन आणि बीजप्रसार होण्यासाठी असा रंग कीटकांना आकर्षित करतो. त्यामुळे अॅन्थोसायनिनच्या अभावाने या प्रक्रिया झाल्या नसत्या. अॅन्थोसायनिन काही प्रमाणात वनस्पर्तीचे संरक्षण करते, तेही होणार नाही.
प्रश्न 3. आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण द्या.
(अ) केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतर्द्रव्यजालिका
केंद्रकी. (इतर सर्व पेशीअंगके आहेत, केंद्रकी ही केंद्रकातील एक रचना आहे.)
(आ) डी.एन.ए, रायबोझोम्स, हरितलवके
उत्तरासाठी दोन पर्याय आहेत.
(i) हरित लवके. (हे पेशीअंगक आहे, उरलेले दोन्ही सर्व प्रकारच्या पेशीत असतात.)
(ii) डी.एन.ए. (हे केंद्रकाम्ल आहे, उरलेले दोन्ही पेशीअंगके आहेत.)
प्रश्न 4. कार्ये लिहा.
(अ) पेशीपटल
- पेशीपटल हे निवडक्षम पारपटल म्हणून कार्य करते. काही उपयुक्त पदार्थांना ते पेशीत येऊ देते, तर नको असलेल्या पदार्थांना पेशीच्या आत येण्यास मज्जाव करते.
- पेशीपटलामुळे समस्थिती राखली जाते. पेशीबाहेर काहीही झाले तरी पेशीपटलामुळे पेशीतील पर्यावरण कायम राखले जाते.
- पेशीय भक्षण आणि पेशी उत्सर्जन ही दोन्ही कार्ये पेशीपटलामुळे होतात.
- विसरण आणि परासरण या प्रक्रिया पेशीपटलामुळे चालतात.
- प्राणी पेशीमध्ये पेशीपटल हे सर्वांत बाहेरचे आवरण असल्यामुळे ते पेशीच्या अंतर्गत भागाचे संरक्षण देखील करते.
(आ) पेशीद्रव्य
- पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो. त्यात अनेक पेशीअंगके विखुरलेली असतात.
- पेशीद्रव्य हे पेशीतील रासायनिक अभिक्रिया घडण्याचे माध्यम असते.
- पेशीद्रव हा जेलीसारखा पदार्थ असून, त्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्त्वे साठवलेली असतात.
- पेशीच्या हालचालींसाठी देखील पेशीद्रव मदत करतो.
(इ) लयकारिका
- रोगप्रतिकार यंत्रणा लयकारिकेवर अवलंबून असते. जीवाणू व विषाणूंना नष्ट करते.
- जीर्ण व कमजोर पेशीअंगके, कार्बनी कचरा इत्यादी टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात, म्हणून त्यांना उद्ध्वस्त करणारे पथक असे म्हणतात.
- पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटून व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. म्हणून त्यांना आत्मघाती पिशव्या असे म्हणतात.
- पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन लयकारिका उपासमारीच्या काळात करते.
(ई) रिक्तिका
- पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे.
- चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते (ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी) साठवणे.
- प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते.
- वनस्पतीपेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात.
(उ) केंद्रक
- नियंत्रण करण्याच्या क्रिया : चयापचय क्रिया व पेशीविभाजन.
- अनुवंशिक गुणांचे संक्रमण जनुकांच्या साहाय्याने पुढील पिढीकडे करणे.
- लोहित रक्तकणिका आणि रसवाहिन्यांतील चाळणी नलिका यांत केंद्रक नसतो. लोहित रक्तकणिकांमध्ये केंद्रक नसल्याने हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होऊन त्यामुळे जास्त ऑक्सिजनचे वहन होते.
- तसेच रसवाहिन्यांतील चाळणी नलिका पोकळ असल्यामुळे अन्नपदार्थांचे वहन सोपे होते.
प्रश्न 5. माझा रंग कोणामुळे ? (अचूक पर्याय निवडा)
अ. लाल टोमॅटो | 1. क्लोरोफिल |
आ. हिरवे पान | 2. कॅरोटीन |
इ. गाजर | 3. ॲन्थो सायनिन |
ई. जांभूळ | 4. लायकोपीन |
अ. लाल टोमॅटो | लायकोपीन |
आ. हिरवे पान | क्लोरोफिल |
इ. गाजर | कॅरोटीन |
ई. जांभूळ | ॲन्थो सायनिन |
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-10-पेशी व पेशीअंगके - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-10-पेशी व पेशीअंगके - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 9 : आपत्ती व्यवस्थापन - Online Solutions Next Chapter : पाठ - 11 : आपत्ती व्यवस्थापन - Online Solutions |