मानवी शरीर व इंद्रिय संस्था
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -11- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. माझा जोडीदार शोधा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. हृदयाचे ठोके | अ. 350 मिली |
2. RBC | आ. 7.4 |
3. WBC | इ. 37 0C |
4. रक्तदान | ई. 72 |
5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान | उ. 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली |
6. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू | ऊ. 5000 ते 10000 प्रति घ. मिली |
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. हृदयाचे ठोके | 72 |
2. RBC | 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली |
3. WBC | 5000 ते 10000 प्रति घ. मिली |
4. रक्तदान | 350 मिली. |
5. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान | 37 0C |
6. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू |
7.4 |
प्रश्न 2. खालील तक्ता पूर्ण करा.
इंद्रिय संस्था | इंद्रिये | कार्ये |
1. श्वसनसंस्था | ||
2. रक्ताभिसरण संस्था |
इंद्रिय संस्था | इंद्रिये | कार्ये |
1. श्वसनसंस्था | नाक | हवा आत घेणे-बाहेर सोडणे. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. |
घसा | अधिकंठामुळे अन्नकण श्वसनमार्गात जात नाहीत. घशाच्या मार्गातून हवा आत सरकते. | |
श्वासनलिका | हवा फुप्फुसांच्या आत नेणे. तसेच उच्छ्वासाची हवा बाहेर आणणे. अन्न आणि हवा या दोन्हींसाठी समान मार्ग. | |
फुप्फुसे | फुप्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. वायूची देवघेव होण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे. | |
वायुकोश | रक्तातून ऑक्सिजन शोषून घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे. | |
श्वासपटल | सतत आकुंचन प्रसरण करून श्वासोच्छ्वासासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली करते. | |
2. रक्ताभिसरण संस्था | हृदय | संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण करणारा स्नायुमय पंप. |
रोहिणी / धमनी | हृदयापासून शरीराच्या निरनिराळया भागांकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या. फुप्फुस-रोहिणीचा अपवाद सोडता, इतर सर्व रक्तवाहिन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. प्रत्येक पेशीला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. | |
नीला | शरीराच्या सर्व भागांतून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या. फुप्फुस-नीलेचा अपवाद सोडता, इतर सर्व नीलांतून ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडे आणले जाते. | |
रक्तकेशिका | प्रत्येक महत्त्वाच्या अवयवांत रक्तकेशिकांचे जाळे असते. या ठिकाणी आवश्यक पोषणद्रव्ये, ऑक्सिजन, संप्रेरके, जीवनसत्त्वे इत्यादींचा पुरवठा रक्तकेशिकांच्या भित्तिकेतून होत असतो. तसेच टाकाऊ पदार्थ याच केशिकांच्या भित्तिकेतून पेशीच्या बाहेर पडत असतात. | |
रक्तपेशी | निरनिराळ्या रक्तपेशी शरीरातील विविध कार्ये करीत असतात.
लोहित रक्तपेशी : ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड यांचे वहन. श्वेत रक्तकणिका : शरीरातील सैनिक. या पेशी प्रतिपिंड तयार करून रोगजंतू नष्ट करतात. रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे रक्षण करतात. |
|
रक्तद्रव | यात असणारी प्रथिने आणि असेंद्रिय आयने निरनिराळी कार्ये घडवून आणतात. रक्तद्रवामुळे रक्त वाहू शकते. |
प्रश्न 3. नामनिर्देशित सुबक आकृत्या काढा.
(अ) श्वसनसंस्था ,
(आ) हृदयाची आंतररचना
प्रश्न 4. सकारण स्पष्ट करा.
(अ) मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.
मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. हे मुख्यत्वे हेमोग्लोबिन नावाच्या प्रथिनामुळे होते, ज्यामध्ये लोह असते. लोह ऑक्सिजनशी संयोग करून रक्ताला तांबडा रंग देतो.
(आ) श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.
- श्वासपटल हे श्वासोच्छ्वासात महत्वाचे कार्य करते. श्वासपटलाच्या नियमित आणि सतत होत असलेल्या आकुंचन, प्रसरण या क्रियांमुळे श्वासोच्छ्वास होत असतो.
- बरगड्यांना जोडणारे स्नायूदेखील या प्रक्रियेत मदत करतात. ज्या वेळी बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वासपटल खाली जातो, त्या वेळी फुप्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरून हवा आत शिरते. यामुळे श्वास घेतला जातो व हवा फुप्फुसांच्या आत शिरते.
- याउलट ज्या वेळी बरगड्या पुन्हा पूर्ववत स्थितीला येतात, त्या वेळी श्वासपटल वर येतो. यामुळे फुप्फुसांतील दाब वाढून हवा नाकावाटे बाहेर पडते.
- अशा रितीने श्वास आणि उच्छ्वास या दोन्ही क्रिया घडवून आणण्यासाठी श्वासपटल सतत वर आणि खाली अशा क्रिया दर्शवतो.
(इ) रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.
- रक्त कोणत्याही कृत्रिम रासायनिक पद्धतीने तयार करता येत नाही. जिवंत रक्तदात्याकडूनच केवळ रक्त काढून घेता येते.
- रक्ताची गरज कोणत्याही आणीबाणीच्या वेळेला निर्माण होऊ शकते.
- एखाद्या अपघातग्रस्त माणसाचा किंवा रुग्णाचा जीव या रक्तदानामुळे वाचू शकतो.
- जीवित हानी टाळू शकणारे दान म्हणून रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते.
(ई) ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.
- 'O' हा रक्तगट असलेल्या व्यक्तीच्या लोहित रक्तपेशींवर कोणतेही प्रतिजन नसते. त्यामुळे असे रक्त दिले तरी रक्तग्राही व्यक्तीच्या शरीरात रक्त गोठले जात नाही.
- ‘O’ रक्तगटाच्या लोकांचे रक्त कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिले जाऊ शकते.
- ‘O’ निगेटिव्ह रक्तगटाला तर सार्वत्रिक दाता म्हणतात कारण त्यांचे रक्त कोणत्याही व्यक्तीला सुरक्षितपणे दिले जाऊ शकते.
(उ) आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे.
- अधिक मिठाचे सेवन उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर), ह्रदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते.
- जितके जास्त मीठ तितके शरीरात सोडिअम आयन घेतले जातात. हे जादा सोडिअम रक्तदाब वाढवते. अशा व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.
- भारतात जास्त मिठाच्या सेवनामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी आहारात मिठाचे सेवन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.
प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.
- श्वसन, पचन व उत्सर्जन या तीन संस्था एकमेकांशी नेहमीच समन्वयात काम करीत असतात.
- पचन संस्था जटिल अन्नपदार्थांचे साध्या व विद्राव्य पोषणद्रव्यांत रूपांतर करते.
- ही विद्राव्य पोषणद्रव्ये वाहत्या रक्तप्रवाहात शोषली जातात. लहान आतड्याच्या उद्वर्धात त्यांचे शोषण होते.
- रक्ताभिसरण होत असताना ही पोषणद्रव्ये प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.
- श्वसन संस्थेच्या साहाय्याने हवेतील ऑक्सिजन रक्तात शोषला जातो.
- ही प्रक्रिया फुप्फुसांतील वायुकोशात सतत घडत असते. हिमोग्लोबिनच्या साहाय्याने हा शोषलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. त्याच वेळी चयापचयाने निर्माण झालेला कार्बन डायऑक्साइड वायूंच्या देवाणघेवाण प्रक्रियेतून शरीरातून उच्छ्वासाच्या रूपात बाहेर टाकला जातो.
- शोषून घेतलेली पोषणद्रव्ये. विशेषतः ग्लुकोजचे ऑक्सिजनच्या साहाय्याने मंद ज्वलन होऊन ऑक्सिडीकरण प्रक्रियेने ऊर्जा निर्माण होते. अशा रितीने तिन्ही संस्था एकमेकांशी सहयोग राखून समन्वयाने कार्य करतात.
(आ) मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.
(1) रक्ताची संरचना :
रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते तसेच सामू (pH) 7.4 असतो. रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते.
(i) रक्तद्रव (Plasma) : रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने (अल्ब्युमिन, ग्लोब्युलीन्स, फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन), 1 ते 2 % असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात.
- अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी वि भागण्याचे काम करते.
- ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.
- फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.
- असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण
- ठेवतात.
(ii) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells) :
(a) लोहित रक्तपेशी (RBC) :
- अकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.
- रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.
- कार्य -हिमोग्लोबिनच्या साहाय्याने श्वसन-वायूंचे वहन.
(b) श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) :
- आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात.
- या पेशींचे 5 प्रकार आहेत - बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील, मोनोसाईट्स लिम्फो साईट्स - पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.
- कार्य - पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.
(c) रक्तपट्टीका (Platelets)
- या अतिशय लहान आणि तबकडीच्या अकारासारख्या असतात
- रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 5 लक्ष ते 4 लक्ष असतात.
- कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.
(2) रक्ताची कार्ये
- वायूंचे परिवहनः फुप्फुसांमधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुप्फु सांमध्ये CO2 आणला जातो.
- पोषणतत्त्वांचे वहन (पेशींना खाद्य पुरविणे) : अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले , मेदाम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषणत्त्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.
- टाकाऊ पदार्थांचे वहनः युरिया, अमोनिया, क्रिएटिनीन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात.
- शरीररक्षणः रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात.
- विकर व संप्रेरक परिवहनः विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यां ची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात.
- तापमान नियमनः योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यांमुळे शरीराचे तापमान 37 0C इतके कायम राखले जाते.
- शरीरातील सोडिअम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे.
- रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात.
(इ) रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.
- रक्त कधीही कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. नैसर्गिक रक्ताला पर्याय नसतो. प्रत्येक सुदृढ माणसाच्या शरीरात सुमारे 5 लीटर रक्त असते.
- रक्तस्राव झाल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. यामुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या बाबीची तत्काळ काळजी घेतली नाही तर प्राण वाचवता येत नाहीत. अशा वेळी व्यक्तीला रक्त पराधानाची गरज असते.
- अपघातग्रस्त, प्रसवकाळात जास्त रक्तस्राव झालेल्या महिला, शस्त्रक्रिया करताना किंवा झाल्यावर अशा प्रकारची रक्त पराधाने अगदी जरुरीची असतात.
- अॅनेमिया, थॅलॅसेमिया, कॅन्सरग्रस्त रुग्ण देखील रक्त पराधानावर अवलंबून असतात.
- म्हणून रक्ताची नेहमीच गरज असते. रक्तदान केले नाही तर ही गरज पूर्ण होणार नाही आणि अनेकांचे प्राण वाचणार नाहीत.
प्रश्न 6. फरक स्पष्ट करा.
(अ) धमन्या व शिरा
धमन्या | शिरा |
हृदयापासून शरीराकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना धमन्या असे म्हणतात. | शरीरातील सर्व पेशी-ऊतींपासून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना नीला किंवा शिरा असे म्हणतात. |
धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. | बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. |
धमन्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. | नीलांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. |
धमन्यांच्या भित्तिका जाड असतात. | नीलांच्या भित्तिका पातळ असतात. |
फुप्फुस-रोहिणीचा अपवाद सोडल्यास सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. | फुप्फुस-नीलेचा अपवाद सोडल्यास सर्व नीला ऑक्सिजनविरहित रक्त वाहून नेतात. |
रोहिणी/धमनीमध्ये कमाल, जास्तीत जास्त रक्तदाब असतो. | नीलांमध्ये किमान कमीत कमी रक्तदाब असतो. |
(आ) बहिःश्वसन व अंतःश्वसन
बहिःश्वसन | अंतःश्वसन |
बाहेरून शरीरात हवा घेणे आणि शरीरातून बाहेर हवा सोडणे या प्रक्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन असे म्हणतात. | रक्त आणि ऊती किंवा पेशी यांच्यातील वायूंची देवाणघेवाण या प्रक्रियेला अंतःश्वसन असे म्हणतात. |
बहिःश्वसन हे पेशी आणि बाह्य वातावरण यांच्यामध्ये होते. | अंतःश्वसन हे केवळ शरीरातील पेशींमध्ये होते. |
बहिःश्वसनात श्वास आणि उच्छ्वास यांचा समावेश होतो. | अंतःश्वसनात ऑक्सिजनचे वहन रक्तातून पेशींत किंवा ऊतींमध्ये आणि ऊतींपासून कार्बन डायऑक्साइडचे वहन रक्तात होते. |
बहिःश्वसनात श्वासोच्छ्वास आणि वायूंची देवाणघेवाण होते. | अंतःश्वसनात श्वासोच्छ्वास किंवा वायूंची देवाणघेवाण होत नाही. |
बहिःश्वसनात ऑक्सिजनचा हिमोग्लोबिनशी संयोग होतो. | अंतःश्वसनात पेशींमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन ऊर्जानिर्मिती होते. |
प्रश्न 7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल?
- रक्तदाता आरोग्यपूर्ण असला पाहिजे.
- त्याचे/ तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले असले पाहिजे. तसेच लोहित रक्तपेशी आणि श्वेत रक्तपेशी यांचे प्रमाण देखील योग्य पातळीत असले पाहिजे.
- त्यांच्या रक्तात कोणताही परजीवी सूक्ष्मजीव, उदा., मलेरियाचा प्लाइमोडियम किंवा डेंग्यूचा विषाणू नसावा. यासाठी काटेकोर तपासणी व्हावी.
- तसेच रक्तदाता एचआयव्ही वाहक नसावा, त्याला कोणताही संसर्ग असता कामा नये.
- त्याला कोणत्याही प्रकारची व्यसने (उदा., मद्य सेवन किंवा अमली पदार्थ सेवन) असता कामा नये.
प्रश्न 8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा. (हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा , ऐच्छिक, अनैच्छिक, आम्लधर्मी)
(अ) रक्तातील तांबड्या पेशीमध्ये..... हे लोहाचे संयुग असते.
रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते.
(आ) ......... हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते.
श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते.
(इ) हृदय स्नायू............. असतात.
हृदय स्नायू अनैच्छिक असतात.
(ई) ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH ....असते.
ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH आम्लारीधर्मी असते.
(उ) RBC ची निर्मिती ....... मध्ये होते.
RBC ची निर्मिती अस्थिमज्जा मध्ये होते.
प्रश्न 9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.
(अ) A, O, K, AB, B
K. (इतर सर्व रक्तगट आहेत.)
(आ) रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका
रक्त पराधान. (इतर सर्व रक्ताचे घटक आहेत.)
(इ) श्वासनलिका, वायूकोश, श्वासपटल, केशिका
केशिका. (इतर सर्व श्वसन संस्थेचे भाग आहेत. केशिका शरीरात सर्वत्र आढळतात.)
(ई) न्यूट्रोफिल, ग्लोब्युलिन्स, ॲल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बीन
न्यूट्रोफिल. (इतर सर्व रक्तद्रवातील प्रथिने आहेत.)
प्रश्न 10. खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.
आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.
अशक्त, धाप लागते : बाळाचे हृदय नीट कार्य करीत नसावे.
निळसर नखे : ऑक्सिजनची कमतरता हे दिसून येते.
श्वास फार जलद : बाळाला श्वसन संस्थेचे देखील काही विकार असण्याचा संभव आहे.
प्रश्न 11. तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे?
उच्च रक्तदाबाची अनेक कारणे असू शकतात. यांपैकी काकांना नेमके कोणते कारण लागू पडते त्याचा तपास करणे जरुरीचे आहे. शारीरिक व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, खूप जास्त प्रमाणात फास्ट-फूड खाणे, आहारात मिठाचे जास्त प्रमाण, मानसिक तणाव अशी अनेक कारणे उच्च रक्तदाबास कारणीभूत असतात. काकांनी योग्य अशा डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे आणि आहार घेतला पाहिजे, रक्तदाब उतरवणारी औषधे नियमितपणे घेणे खूप जरुरीचे आहे.
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खालील काही उपाय उपयुक्त ठरू शकतात:
- संतुलित आहार: ताजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कमी मीठ आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश असलेला आहार घेणे.
- नियमित व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. रोज किमान 30 मिनिटे व्यायाम.
- कमी मीठाचे सेवन: मीठाचे सेवन मर्यादित ठेवणे. प्रक्रिया केलेले पदार्थ, पॅकेज्ड फूड्स आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळणे.
- योग आणि ध्यान: तणाव नियंत्रणासाठी योग आणि ध्यानाचा नियमित सराव करावा.
- दारु आणि तंबाखूचे सेवन टाळा: दारु आणि तंबाखूचे सेवन कमी करणे किंवा पूर्णपणे टाळणे.
- नियमित तपासणी: रक्तदाब नियमितपणे तपासावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेणे सुरू ठेवणे.
- पुरेशी झोप: दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घेतली पाहिजे.
या सवयींचे पालन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-11-मानवी शरीर व इंद्रिय संस्था - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-11-मानवी शरीर व इंद्रिय संस्था - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 10 : पेेशी व पेशीअंगके - Online Solutions Next Chapter : पाठ - 12 : आम्ल, आम्लारी ओळख - Online Solutions |