ताऱ्यांची जीवनयात्रा
इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -19- Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. शोधा म्हणजे सापडेल.
(अ) आपल्या दीर्घिकेचे नाव .......... हे आहे.
आपल्या दीर्घिकेचे नाव मंदाकिनी(आकाशगंगा) आहे.
(आ) प्रचंड अंतरे मोजण्यासाठी .......... हे एकक वापरतात.
प्रचंड अंतरे मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे एकक वापरतात.
(इ) प्रकाशाचा वेग .......... km/s एवढा आहे.
प्रकाशाचा वेग 300000 km/s एवढा आहे.
(ई) आपल्या आकाशगंगेत सुमारे .......... तारे आहेत.
आपल्या आकाशगंगेत सुमारे 100 अब्ज (1011) तारे आहेत.
(उ) सूर्याची अंतिम अवस्था .......... असेल.
सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू असेल.
(ऊ) ताऱ्यांचा जन्म .......... मेघांपासून होतो.
ताऱ्यांचा जन्म आंतरतारकीय मेघांपासून होतो.
(ए) आकाशगंगा ही एक .......... दीर्घिका आहे.
आकाशगंगा ही एक चक्राकार दीर्घिका आहे.
(ऐ) तारे हे .......... वायूचे गोल असतात.
तारे हे तप्त वायूंचे गोल असतात.
(ओ) ताऱ्यांचे वस्तुमान .......... वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.
ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते.
(औ) सूर्यापासून पृथ्वी पर्यंत प्रकाश येण्यास .......... एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वी पर्यंत प्रकाश येण्यास .......... एवढा वेळ लागतो.
सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास सुमारे 8 मिनिटे एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास सुमारे 1 सेकंद एवढा वेळ लागतो.
(अं) ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची .......... जलद गतीने होते.
ताऱ्याचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची उत्क्रांती जलद गतीने होते.
(अः). ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या .......... अवलंबून असते.
ताऱ्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
प्रश्न 2. कोण खरे बोलतय?
(अ) प्रकाशवर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात.
चूक. (प्रकाशवर्ष हे एकक अंतर मोजण्यासाठी वापरतात.)
(आ) ताऱ्याची अंतिम अवस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते.
बरोबर.
(इ) ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो.
चूक. (ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील न्यूट्रॉन्सच्या बलाशी समतोल झाल्यास तारा 'न्यूट्रॉन तारा' होतो.)
(ई) कृष्ण विवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो.
चूक. (कृष्ण विवरातून अगदी प्रकाशही बाहेर पडू शकत नाही.)
(उ) सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल.
चूक. (सूर्याच्या उत्क्रांतीदरम्यान सूर्य 'तांबडा राक्षसी तारा' या अवस्थेतून जाईल.)
(ऊ) सूर्याची अंतिम अवस्था श्वेत बटू ही असेल.
बरोबर.
प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) ताऱ्यांची निर्मिती कशी होते?
- दीर्घिकेतील तान्यांच्यामध्ये रिक्त जागांत ठिकठिकाणी वायू व धुळीचे प्रचंड मेघ असतात, त्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात. या मेघांचा आकार काही प्रकाशवर्षे असतो.
- विक्षोभामुळे हे मेघ आकुंचित होऊ लागतात, तेव्हा त्यांची घनता आणि तापमान वाढते व या मेघांमधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो.
- वाढत्या घनतेमुळे आणि तापमानामुळे तेथे अणुकेंद्रकांच्या युतीने ऊर्जानिर्मिती सुरू होते. या ऊर्जेस अणुऊर्जा, तसेच केंद्रकीय ऊर्जा म्हणतात.
- या ऊर्जानिर्मितीमुळे वायूंचा हा गोल स्वयंप्रकाशित होतो, थोडक्यात ताऱ्याचा जन्म होतो, तारा निर्माण होतो.
- एका विशाल आंतरतारकीय मेघाच्या आकुंचनातून एकाच वेळेस अनेक/हजारो तारेही निर्माण होऊ शकतात.
(आ) ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते?
- ताऱ्याची उत्क्रांती म्हणजे काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मांत बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थांत रूपांतर होण्याची प्रक्रिया.
- ता्ऱ्याचे तापमान स्थिर राहिल्यास तारा स्थिर राहतो. त्यासाठी ताऱ्यांत सतत ऊर्जानिर्मिती होत राहणे आवश्यक असते. ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळत राहिल्याने ही ऊर्जानिर्मिती होत राहते.
- ताऱ्याच्या केंद्रातील इंधन जळणे व त्याचे परिणाम कमी होणे हेच ताऱ्याच्या उत्क्रांतीचे कारण आहे.
(इ) ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था कोणत्या?
प्रत्येक ताऱ्याची त्याच्या मूळ वस्तुमानानुसार पुढील तीन अवस्थांपैकी एक अंतिम अवस्था होते :
- सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटींहून कमी मूळ वस्तुमान असलेले तारे अंतिमतः 'श्वेत बटू' या अवस्थेत येतात.
- सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पट ते 25 पट वस्तुमान असलेले तारे अंतिमतः न्यूट्रॉन तारे बनतात.
- सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटींहून अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचे अंतिमतः कृष्ण विवर बनते.
(ई) कृष्ण विवर हे नाव कशामुळे पडले?
सूर्याच्या वस्तुमानाच्या 25 पटींहून अधिक वस्तुमान असलेला विशाल तारा जेव्हा उत्क्रांतीच्या टप्प्यात अंतिम स्थितीत जातो, तेव्हा या ताऱ्याचे गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते. त्यामुळे या ताऱ्याजवळील सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षित होतात. या ताऱ्यातून कोणतीही वस्तू अगदी प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. तसेच अशा ताऱ्यावर पडणारा प्रकाश परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो. परिणामी हा तारा आपण पाहू शकत नाही. ताऱ्याच्या जागी फक्त अतिसूक्ष्म काळे छिद्र दिसते, म्हणून त्यास 'कृष्ण विवर' हे नाव पडले आहे.
(उ) न्युट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते?
ज्या ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 ते 25 पट असते, अशा ताऱ्यांची अंतिम स्थिती ही 'न्यूट्रॉन तारा' असते.
हे तारे 'महाराक्षसी तारा' अवस्थेतून जातात, तेव्हा त्यांचा आकार 1000 पटींपरयंत वाढतो. उत्क्रांतीच्या शेवटी होणारा महाविस्फोट खूपच शक्तिशाली असतो. त्यानंतर अशा ताऱ्याचा केंद्रातील भाग इतका आकुंचित होतो की त्यांचा आकार केवळ 10 किमीच्या आसपास येतो. या अवस्थेत हे तारे पूर्णतः न्यूट्रॉन्सचे बनलेले असतात, म्हणून त्यांना न्यूट्रॉन्स तारे म्हणतात. न्यूट्रॉन्समुळे निर्माण होणारे बल गुरुत्वीय बलास अनंतकालापर्यंत संतुलित करू शकतो.
प्रश्न 4.
(अ) तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दांत लिहा.
- मंदाकिनी दीर्घिकेत जे अब्जावधी तारे आहेत, त्यांपैकी मी 'सूर्य' एक छोटासा तारा आहे.
- माझे स्वतःचे एक कुटुंब (सूर्यमाला) असून त्यात ग्रह, ग्रहांचे उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू व उल्काभ हे घटक आहेत.
- माझ्या कुटुंबात (सूर्यमालेत) मी एकमेव तारा आहे.
- मी पृथ्वीवासीयांना सर्वांत जवळचा तारा आहे; म्हणून तो इतर ताऱ्यांपेक्षा मोठा दिसतो.
- माझ्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान, आकार व तापमान असलेले अब्जावधी तारे आकाशात आहेत. या अब्जावधी ताऱ्यांच्या तुलनेत मी हा एक सामान्य तारा आहे.
- माझ्या वस्तुमानापैकी 72 टक्के भाग हायड्रोजन, 26 टक्के भाग हेलिअम आणि 2 टक्के भाग हेलिअमपेक्षा अधिक अणुक्रमांक असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या रूपात आहे.
- माझे एकूण वस्तुमान : 2 x 1030 kg (पृथ्वीच्या वस्तुमानाच्या सुमारे 3 लक्ष पट) आहे
- माझी त्रिज्या : 695700 km (पृथ्वीच्या त्रिज्येच्या सुमारे 100 पट)
- माझे पृष्ठभागावरील तापमान : 5800 K व केंद्रातील तापमान : 5 x 107K आहे
- माझे वय : 5 अब्ज वर्षे आहे.
- गेल्या 5 अब्ज वर्षांच्या जीवनकालात माझे गुणधर्म बदलले नाहीत, असा शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला आहे.
(ब) श्वेत बटूबद्दल माहिती द्या.
- ताऱ्यांच्या मूळ वस्तुमानाप्रमाणे ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे व अंतिम स्थितीचे तीन गट पडतात. यांपैकी एका गटातील ताऱ्यांची अंतिम स्थिती ही 'श्वेत बटू' असते.
- जे तारे सूर्याच्या वस्तुमानाच्या 8 पटींहून कमी मूळ वस्तुमानाचे आहेत त्या ताऱ्यांचे उत्क्रांतीच्या दरम्यान प्रसारण होते व त्यांचा आकार 100 ते 200 पटींनी वाढतो. या अवस्थेत मोठा आकार व कमी तापमान यांमुळे हे तारे लालसर दिसतात, म्हणून त्यांना 'तांबडा राक्षसी तारा' असेही म्हणतात.
- श्वेत बटूंचा आकार पृथ्वी इतका लहान असल्याने त्यांची घनता खूप जास्त असते. त्यातील एक चमचा पदार्थाचे वजन सुमारे काही टन असते.
Click on link to get PDF from store
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-19- ताऱ्यांची जीवनयात्रा - नोट्स
PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-19- ताऱ्यांची जीवनयात्रा - स्वाध्याय प्रश्नोत्तरे
All 19 Chapters Notes -Marathi Medium-Class-8 Science-(19 PDF)-Rs.71
All 19 Chapters Exercise Solutions -Marathi Medium-Class-8 Science-(19 PDF)-Rs.69
All 19 Chapters Notes and Solutions-Marathi Medium-Class-8 Science-(38 PDF)-Rs.112
Useful links :
Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान - All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ - 18 : परिसंस्था - Online Solutions |