Notes-Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-15-सजीवांमधील जीवनप्रक्रिया-Maharashtra Board

सजीवांमधील जीवनप्रक्रिया

Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-15-Maharashtra Board

Notes

अभ्यासघटक :

  • वनस्पतीतील परिवहन
  • उत्सर्जन : वनस्पती, प्राणी व मानव
  • समन्वय : वनस्पती व मानव

पचन संस्था : पचन संस्था अन्नाच्या जटिल पदार्थांचे सहज शोषता येतील अशा विद्राव्य पदार्थांत रूपांतर करते. हे सर्व कार्य विकरांच्या साहाय्याने होते. विद्राव्य पोषक द्रव्ये रक्तावाटे प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.

श्वसन संस्था : श्वसन संस्थेच्या फुप्फुसांत ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो. ऑक्सिजन देखील प्रत्येक पेशीपर्यंत रक्ताभिसरणाने पोहोचवला जातो.

  • या दोन्ही संस्थांचे कार्य मेंदूच्या नियंत्रणाखाली असते आणि त्यांच्या कार्यांत समन्वय असतो.

परिवहन (Transportation) :

परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहचवला जातो.

वनस्पतींमधील परिवहन (Transportation in Plants) : वनस्पती स्थिर असतात. त्यामुळे त्यांना जास्त ऊर्जेची गरज नसते. त्यांना अकार्बनी पदार्थांची आवश्यकता असते. उदा., नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, मँगनीज, सोडिअम. जमीन हा या पदार्थांचा सर्वात जवळचा आणि समृद्ध असा स्रोत आहे.

  • वनस्पतींची मुळे जमिनीतील हे पदार्थ शोषून घेतात आणि त्यांचे परिवहन करतात.
  • वनस्पतींचे सर्व भाग-जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या संवहनी ऊतींशी जोडलेले असतात.
  • पाणी वाहून नेण्याचे काम जलवाहिन्या करतात, तर अन्न वाहन नेण्याचे काम रसवाहिन्या करतात.
वनस्पतींमधील पाण्याचे वहन :

वनस्पतींमधील पाण्याचे वहन :

मूलदाब (Root Pressure) :

  • मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात. या पेशी जमिनीतील पाणी व खनिजे यांच्या संपर्कात असतात.
  • त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी व खनिजे यांच्या संहतीत फरक असतो. यामुळे पाणी व खनिजे जमिनीतून मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात.
  • पेशी त्यामुळे ताठर बनतात आणि त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात.
  • मूलदाबामुळे पाणी व खनिजे मुळांतील जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात.
  • या हालचालींमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होऊन सातत्याने तो पुढे ढकलला जातो.
  • अशा दाबामुळे झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते.

बाष्पोच्छ्वास (Transpiration Pull) :

  • वनस्पतीच्या पानांवर पर्णरंध्रे असतात. त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते. यालाच बाष्पोत्सर्जन असे म्हणतात.
  • या पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात. त्यांना बाह्य आवरण असते. रक्षक पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात.
  • तसेच पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते.
  • ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते.
  • बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते.
  • मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.

[collapse]

वनस्पतींमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन :

  • पदार्थांचे स्थानांतरण (Translocation) म्हणजे पानांमध्ये तयार झालेले अन्न वनस्पतींच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवणे, जास्तीचे अन्न मूळ, फळे आणि बियांमध्ये साठवणे, (अपवाद-अमिनो आम्ले).
  • वनस्पतींतील रसवाहिन्या हे कार्य दोन्ही दिशांत करतात.
  • पदार्थांच्या स्थलांतराला ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा ATP पासून मिळते.
  • सुक्रोजसारख्या अन्नद्रव्याचे रसवाहिनीमार्फत ATP च्या मदतीने वहन केले जाते. अशा वेळी त्या भागातील पाण्याची संहती कमी होते व परासरण क्रियेने पाणी पेशीच्या आत शिरते.
  • पेशीतील घटकांमध्ये वाढ झाल्यामुळे पेशीच्या भित्तिकेवरील दाब वाढतो.
  • या दाबामुळे अन्नद्रव्य लगतच्या कमी दाबाच्या पेशींमध्ये ढकलले जाते.
  • वनस्पतीच्या गरजेनुसार द्रव्याचे वहन करण्यास ही क्रिया रसवाहिनीस मदत करते. उदा., कळीचे फूल होताना मुळांमध्ये किंवा खोडांमध्ये साठवलेली शर्करा कळ्यांमध्ये पाठवली जाते.

उत्सर्जन (Excretion) :

  • उत्सर्जन म्हणजे नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याची प्रक्रिया होय. सजीवांच्या चयापचय क्रियांमध्ये अनेक अनावश्यक आणि घातक पदार्थ तयार होतात. उदा., युरिया, युरिक आम्ल, अमोनिआ.
  • घातक पदार्थ शरीरातून वेळेवर बाहेर टाकणे आवश्यक असते. त्यासाठी उत्सर्जन संस्था असते.
  • उत्सर्जनासाठी वेगवेगळ्या सजीवांमध्ये निरनिराळ्या पद्धती असतात.
  • एकपेशीय सजीवांमध्ये टाकाऊ पदार्थ पेशींच्या पृष्ठभागापासून बाहेर उत्सर्जित होतात.
  • बहुपेशीय सजीवांमध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते.

वनस्पतींमधील उत्सर्जन (Excretion in Plants) :

  • वनस्पतींमधील उत्सर्जन सोप्या पद्धतीने केले जाते.
  • वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा संस्था नसते. विसरणद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात.
  • मुळांच्या वाटे आसपासच्या जमिनीत काही अनावश्यक पदार्थ सोडले जातात.
  • बरेचसे टाकाऊ पदार्थ वनस्पतींच्या पानांतील रिक्तिका, फुले, फळे आणि खोडावरील सालींत साठवले जातात. काही काळानंतर हे अवयव गळून पडतात.
  • इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यांत साठवले जातात.
  • सुईच्या आकाराचे रफाइड्स सुरण किंवा अळूची पाने यांत असल्यामुळे ते त्वचेवर टोचतात व खाज सुटते. रफाइड्स हे कॅल्शिअम ऑक्झलेटचे स्फटिक असतात.
  • वनस्पतींमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहेत. उदा. रबराचा चिक, डिंक, राळ इत्यादी.

मानवामधील उत्सर्जन (Excretion in human beings) :

उत्सर्जन संस्था (Excretory system) ही चयापचयाच्या क्रियांतून तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर टाकते.

  • आपल्या शरीरात चयापचय क्रियेतून अमोनिया, युरिया, युरिक आम्ल, क्रिएटीन असे टाकाऊ पदार्थ तयार होतात.
  • आहारातून पोटात गेलेली आणि आपल्या शरीराला आवश्यक नसलेली अशी अतिरिक्त जीवनसत्त्वे, क्षार असेही पदार्थ मूत्रावाटे बाहेर टाकले जातात.
  • वृक्कांमधून रक्त गाळले जाते. फुप्फुसामधून कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातो आणि ऑक्सिजन आत घेतला जातो.
  • त्वचेवरील घर्मग्रंथीतून काही प्रमाणात उत्सर्जित पदार्थ घामावाटे बाहेर टाकले जातात. गुदद्वारातून बहिःक्षेपण क्रियेने न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकले जाते.

अशा त-हेने शरीरातून नको असलेले पदार्थ बाहेर टाकले जातात. परंतु यातील खरी उत्सर्जन क्रिया म्हणजे वृक्कांच्या साहाय्याने रक्ताचे गाळणे आणि अनावश्यक व विषारी पदार्थांपासून मूत्र तयार करणे हे होय.

मानवी उत्सर्जन संस्थेतील अवयव :

मानवी उत्सर्जन संस्थेत पुढील अवयव असतात :

  • वृक्कांची जोडी (Pair of Kidneys)
  • मूत्रवाहिनींची जोडी (Pair of Ureters)
  • मूत्राशय (Urinary Bladder) आणि
  • मूत्रोत्सर्जक नलिका (Urethra).

वृक्के : पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक आणि उदराच्या पाठीमागील बाजूस, घेवड्याच्या बियांच्या आकाराची दोन वृक्के असतात. उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडे

खालच्या बाजूला असते. वृक्क रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार करते.

नेफ्रॉन : वृक्कातील ग़ाळण्याची मूलभूत क्रिया करणारा घटक म्हणजे नेफ्रॉन. प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे दहा लाख नेफ्रॉन्स असतात.

बोमन्स संपुट : नेफ्रॉनमध्ये कपाच्या आकाराचा, पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो.

ग्लोमेरुलस : बोमन्स संपुटातील रक्तकेशिकांची जाळी. यकृतात तयार झालेला युरिया रक्तात येतो. जेव्हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुलसमध्ये येते, त्या वेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते आणि युरिया व तत्सम पदार्थ वेगळे केले जातात.

वृक्क रोज साधारणपणे 190 लीटर रक्त गाळतात; ज्यामधून 1 ते 1.9 लीटर मूत्र तयार होते. उरलेला द्रव पदार्थ पुन्हा शोषून घेतला जातो.

[collapse]

मूत्रनिर्मिती :

  • बोमन्स संपुटाला सच्छिद्र निवडक्षम पारपटल असते. त्यातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रांतून बाहेर पडू शकतात.
  • बोमन्स संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेमध्ये जातो. समीप संवलित नलिका, हेन्ले लूप, दूरस्थ संवलित नलिका आणि संचयी नलिका अशा चार विभागांची मिळून नेफ्रॉन नलिका बनलेली असते.
  • नेफ्रॉन नलिकेत पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते. उरलेला टाकाऊ पदार्थ संचयी नलिकेतून पुढे सरकतो. या द्रवापासून मूत्र तयार होते.
  • वृक्कांत तयार झालेले मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात साठवले जाते.
  • मूत्राशय स्नायूमय असून त्याच्यावर ऐच्छिक चेतांचे नियंत्रण असते. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावर नियंत्रण ठेवू शकतो.
  • मूत्राशयातून मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे मूत्र बाहेर टाकले जाते.
  • मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव असला तरी त्वचा आणि फुप्फुससुद्धा उत्सर्जनाच्या क्रियेत मदत करतात.
रक्तव्याश्लेषण (Dialysis) :

रक्तव्याश्लेषण (Dialysis) :

  • कोणत्याही कारणांनी जसे दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यास वृक्कांची कार्यक्षमता कमी होते. असे झाल्यास शरीरात चयापचय क्रियेत तयार होणारी विषारी द्रव्ये व घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिया शरीरातच साचून राहतात. या संचयामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो.
  • त्यामुळे असे दूषित रक्त गाळून घेण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. एरव्ही जे काम वृक्क करते ते काम कृत्रिम उपकरण करते.
  • एका वेळी या उपकरणातून 500 मिली रक्त गाळण्यासाठी पाठवले जाते. उपकरणाने शुद्धीकरण केलेले रक्त नंतर पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडले जाते.

[collapse]

समन्वय (Co-ordination) :

  • शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय.
  • बहुपेशीय सजीवांत विविध अवयव संस्था कार्यरत असतात. या निरनिराळ्या संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील वेगवेगळी उद्दीपने यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो. या समन्वयामुळेच सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो.
  • उदा., हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाची गती यात कायम समन्वय असतो.

समस्थिती :

  • इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते; अशा स्थितीला 'समस्थिती' असे म्हणतात.
  • कोणतीही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या निरनिराळ्या संस्था आणि अवयव यांच्यातील सुयोग्य समन्वय टिकवणे आवश्यक असते. समन्वयाच्या अभावी किंवा इतर काही घटकांमुळे कोणत्याही टप्प्यावर गोंधळ निर्माण झाल्यास ती अपेक्षित प्रक्रिया अपूर्ण राहू शकते.
  • उदा., सजीवांत शरीराचे तापमान, जलपातळी, विकरपातळी इत्यादींमुळे व बाह्य पर्यावरणातील उद्दीपनांमुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियांमध्ये सुयोग्य समन्वय राहतो. रक्तातील ग्लुकोज शर्करेची पातळी निरोगी माणसात नेहमी समस्थितीत राहते.

वनस्पतींमधील समन्वय (Co-ordination in Plants ) :

वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतात. बाह्यउद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते. काही वेळा वाढ होते. अशा दोन प्रकारच्या हालचाली म्हणजे वृद्धी-संलग्न आणि वृद्धी-असंलग्न हालचाली. या वनस्पतीत समन्वय घडवून आणतात. यांनाच 'अनुवर्तन' किंवा 'अनुवर्ती हालचाल' म्हणतात.

वृद्धी-संलग्न हालचाली (अनुवर्तन) :

  • प्रकाशानुवर्ती हालचाल : वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते. याला प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात.
  • गुरुत्वानुवर्ती हालचाल : वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल करते. याला गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणतात.
  • जलानुवर्ती हालचाल : वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते. याला जलानुवर्ती हालचाल म्हणतात.
  • रसायन-अनुवर्तन : वनस्पतींचे काही भाग विशिष्ट रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात. उदा., बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन-अनुवर्तन आहे.

या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत; म्हणून त्या वृद्धी-संलग्न हालचाली ठरतात.

वृद्धी-असंलग्न हालचाली :

  • वनस्पतींतील वृद्धी-असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसतात.
  • भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात.
  • लाजाळूसारख्या वनस्पती विद्युत-रासायनिक आदेशांचा उपयोग करतात.
  • वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करतात. त्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते.

वृद्धी-असंलग्न हालचाली उदाहरणे :

  • कीटकभक्षी व्हीनस फ्लायट्रॅप ही वनस्पती फुलाप्रमाणेच दिसणाऱ्या आणि सुवासिक असणाऱ्या सापळ्याप्रमाणे असते. जेव्हा कीटक त्यावर आकर्षित होऊन बसतात तेव्हा सापळा
  • बंद होतो व त्या कीटकांचे पचन वनस्पतींद्वारे केले जाते. या हालचाली कीटक पकडण्यासाठी होतात आणि त्या वृद्धी-असंलग्न आहेत.
  • कीटकाचा स्पर्श होताच कीटकभक्षी ड्रॉसेरा वनस्पतींच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूस वळून कीटकाला चहुबाजूंनी घेरून टाकतात. कोटक त्यामुळे उडून जात नाही आणि ड्रॉसेराचे भक्ष्य होतात.
  • ठरावीक वनस्पतीची फुले ठरावीक वेळीच उघडतात. उदा., कमळाचे फूल सकाळी, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. या उमलण्याच्या हालचाली वृद्धी-असंलग्न हालचाली आहेत.
  • तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच पक्व फळ फुटून सर्व ठिकाणी त्याच्या बिया पसरतात.

वनस्पतींच्या हालचालींचे तंत्र :

  • भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतींतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात.
  • वनस्पती विद्युत-रासायनिक आदेशांचा उपयोग करून संवेदनांची माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवते.
  • वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करून आपला आकार बदलतात व वनस्पतीची हालचाल घडवून आणतात.

वनस्पतींतील संप्रेरके :

  • ऑक्झिन (Auxin) : प्ररोहाच्या अग्रभागात तयार होणारे ऑक्झिन (Auxin) नावाचे संप्रेरक पेशीविवर्धनाला (Cell Enlargement) मदत करते.
  • जिब्बरेलिन्स : खोडाच्या वाढीसाठी ही संप्रेरके मदत करतात
  • सायटोकायनिन्स : पेशी विभाजनासाठी ही संप्रेरके मदत करतात.
  • ॲबसिसिक आम्ल : हे संप्रेरक वनस्पतींची वाढ रोखणे, वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमेजणे यावर प्रभावी ठरते.

मानवातील समन्वय (Co-ordination in human being) :

मानवी शरीरात दोन यंत्रणांद्वारे परिणामकारकरीत्या समन्वय व नियंत्रण केले जाते.

  • चेतानियंत्रण (Nervous Control)
  • रासायनिक नियंत्रण (Chemical Control)

(1) चेतानियंत्रण (Nervous Control) :

पर्यावरणातील बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता मानवामध्ये चेतानियंत्रणाद्वारे प्राप्त होते.

  • आवेग : पर्यावरणातून शरीराकडे येणारे बदल शरीरात आवेग निर्माण करतात.
  • प्रतिसाद : आवेगाला योग्य असा प्रतिसाद देण्याचे कार्य चेतासंस्था करते.
  • अनेक चेतापेशी मिळून चेतासंस्था बनते.
  • आवेगांना प्रतिसाद देण्याचे कार्य हे सजीवांच्या शरीर रचनेतील क्लिष्ट तेवर अवलंबून असते
  • प्रगत आणि बहुपेशीय प्राण्यांमध्ये चेतानियंत्रण करणारी संस्था क्लिष्ट असते. मात्र एकपेशीय अमिबाला अशी चेतासंस्था नसते.

चेतापेशी (Neurons):

  • शरीरात एका ठि काणापासून दुसऱ्या ठि काणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात.
  • मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजे चेतापेशी होत.
  • शरीरातील सर्व पेशींपैकी ही पेशी आकाराने सर्वांत मोठी असते. लांबी काही मीटरपर्यंत असते.
  • विद्युत-रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता चेतापेशींत असते.
  • चेतापेशीचे प्रमुख भाग, वृक्षिका, अक्षतंतू आणि पेशिकाय हे असतात.
  • वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांद्वारे पर्यावरणातल्या माहितीचे ग्रहण केले जाते. तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात. या आवेगांचे वहन वृक्षिकेकडून पेशीकायेकडे आणि पेशीकायेकडून अक्षतंतूकडे होते.
  • अक्षतंतूंच्या टोकांनी हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात.
  • चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध याच्या साहाय्याने चेता बनतात.
चेतापेशीची रचना :

चेतापेशीची रचना :

  • चेतापेशीला तीन महत्त्वाच्या रचना आहेत : (i) पेशीकाय (ii) वृक्षिका (iii) अक्षतंतू.
  • अक्षतंतूवर मज्जावरण असते. हे सलग नसून त्यात मध्ये मध्ये रॅन्वीअरचे संकोच असतात. अक्षतंतूवर 'श्वान'ची पेशी दिसून येते.
  • वृक्षिकेला वैशिष्ट्यपूर्ण टोके असतात. या टोकांद्वारे माहिती ग्रहण केली जाते आणि ती पेशीकायेकडे पाठवली जाते,
  • पेशीकायेमध्ये मोठा केंद्रक असतो.
  • पेशीकाय अक्षतंतूद्वारे चेतावेग पुढील चेतापेशीकडे पाठवून देतो.
  • दोन चेतापेशींदरम्यान अतिसूक्ष्म पोकळी म्हणजेच संपर्कस्थान (Synapse) असते.
  • अशा रितीने चेता-आवेगाचे वहन वृक्षिके (Dendrite) कडून पेशीकायेकडे (Cell body); पेशीकायेकडून अक्षतंतू (Axon) कडे व अक्षतंतूकडून संपर्कस्थानाकडे होते.
  • हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित केले जातात. पहिल्या अक्षतंतूच्या शेवटच्या टोकाशी पोहोचलेल्या विद्युत आवेगामुळे चेतापेशी काही रसायने निर्माण करते. या रसायनामुळे आवेगांचे शरीरात वहन होते.
  • प्रतिसाद अंतिमतः स्नायुपेशी किंवा ग्रंथी देतात. त्यामुळे त्या आवेगाचा प्रतिसाद स्नायू किंवा ग्रंथीद्वारे दिला जातो.
  • विद्युत आवेगाच्या स्वरूपातील माहितीचे शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वहन करण्याची क्षमता असलेल्या चेतांच्या सुसंघटित जाळ्याने चेतासंस्था बनलेली असते.

[collapse]

चेतापेशींचे प्रकार (Types of Nerve cells/Neurons ) :

चेतापेशींच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत करतात.

  • संवेदी चेतापेशी (Sensory Neurons) : संवेदी चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जू कडे करतात.
  • प्रेरक चेतापेशी (Motor Neurons) : प्रेरक चेतापेशी आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जू कडून स्नायू किंवा ग्रंथींसारख्या प्रेरक अवयवांकडे करतात.
  • सहयोगी चेतापेशी (Association Neurons) : सहयोगी चेतापेशी चेतासंस्थे च्या एकात्मिकतेचे संकलनात्मक कार्य करीत असतात.

मानवी चेतासंस्था (The Human Nervous System) :

मानवी चेतासंस्थाचे पुढील तीन भाग आहेत :

  • मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System or CNS)
  • परिघीय चेतासंस्था (Peripheral Nervous System)
  • स्वायत्त चेतासंस्था (Autonomic Nervous System)

मध्यवर्ती चेतासंस्था (Central Nervous System or CNS) :

मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते.

मेंदू :

  • मानवी मेंदू अत्यंत विकसित आहे. मेंदू चेतासंस्थेचे नियंत्रण करतो. कर्परेमध्ये तो संरक्षित असतो. मेंदू आणि त्यावरील कर्परा यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षक मस्तिष्क आवरणे असतात.
  • मेंदूच्या विविध भागांतील पोकळ्यांना मस्तिष्क निलये म्हणतात. मस्तिष्क निलयांत व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांत संरक्षक प्रमस्तिष्क-मेरुद्रव असतो.
  • प्रौढ मानवी मेंदू सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम वजनाचा असतो. त्यात सुमारे 100 अब्ज चेतापेशी असतात.

कार्य :

  • मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषकद्रव्ये पुरवणे, आघातां-पासून संरक्षणही करणे.
  • आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते.
  • याव्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते.

मेंदूचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. ते पुढीलप्रमाणे : प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ.

(i) प्रमस्तिष्क : प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वांत मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो. हे दोन्ही गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. प्रमस्तिष्काच्या बाहेरील पृष्ठभागावर संवलन असतात, म्हणजेच अनियमित वळ्या व खाचा असतात. संवलनांमुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि चेतापेशींची संख्या वाढते.

  • प्रमस्तिष्काची कार्ये : ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, ज्ञानेंद्रियांतून येणाऱ्या माहितीचे पृथःक्करण, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, एकाग्रता, नियोजन इत्यादी.

(ii) अनुमस्तिष्क : मेंदूचा छोटा भाग अनुमस्तिष्क, कर्परगुहेच्या मागील बाजूस आणि प्रमस्तिष्काच्या खालच्या बाजूस असतो. याच्या पृष्ठभागावर उंचवटे व खळगे असतात.

  • अनुमस्तिष्काची कार्ये : ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणि शरीराचा तोल सांभाळणे.

(iii) मस्तिष्कपुच्छ : हा मेंदूच्या पुच्छबाजूचा भाग असतो. याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या पिरॅमिड या संरचना असतात. याच्या पश्चभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते.

  • मस्तिष्कपुच्छाची कार्ये : अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण जसे हृदयाचे कार्य, श्वासोच्छ्वास, अन्ननलिकेच्या हालचाली इत्यादी.

मेरुरज्जू :

  • मेरुरज्जू हा मध्यवर्ती चेतासंस्थेचा भाग आहे. तो कशेरुस्तंभामध्ये संरक्षित असतो.
  • मस्तिष्कपुच्छापासून तो तयार होतो. सुरुवातीस जाडसर असून तो पुढे निमुळता होत जातो.
  • त्याच्या शेवटच्या तंतुमय धाग्यासारख्या भागाला अंत्यतंतू असे म्हणतात.
  • मेरुरज्जूपासून बनलेल्या मेरुचेतांच्या 31 जोड्या कशेरस्तंभातून बाहेर निघतात.
  • प्रतिक्षिप्त क्रियांचे नियंत्रण मेरुरज्जू करतो.
  • परिघीय चेता संस्थेच्या कार्यात मेरुरज्जूचे महत्त्व मोठे आहे.

कार्ये :

  • त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे.
  • मेंदूपासून स्नायू व ग्रंथींकडे आवेगाचे वहन.
  • प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो.

परिधीय चेतासंस्था (Peripheral Nervous System):

मध्यवर्ती चेतासंस्थेपासून निघणाऱ्या चेतांचा समावेश परिघीय चेतासंस्थेमध्ये होतो. या चेता मध्यवर्ती चेतासंस्थेला शरीराच्या सर्व भागांशी जोडतात.

परिघीय चेतांचे प्रकार : या चेता दोन प्रकारच्या असतात :

  • कर्परचेता (Cranial Nerves) : या चेता मेंदूपासून निघतात. शिर, छाती व पोटातील विविध भागांशी या जोडलेल्या असतात. कर्परचेतांच्या 12 जोड्या असतात.
  • मेरुचेता (Spinal Nerves): या चेता मेरुरज्जूपासून निघतात. हात-पाय, त्वचा तसेच शरीराच्या इतर भागांशी या चेता जोडलेल्या असतात. मेरुचेतांच्या 31 जोड्या असतात.

स्वायत्त चेतासंस्था (Autonomic Nervous System) :

अनैच्छिक अवयवांचे कार्य नियंत्रित करणाऱ्या चेता संस्थेला स्वायत्त चेता संस्था असे म्हणतात. हृदय, फुप्फुस, जठर इत्यादींसारख्या अनैच्छिक अवयवांतील चेतांनी स्वायत्त चेतासंस्था तयार होते. स्वायत्त चेतासंस्थेचे नियंत्रण आपल्या इच्छेवर असत नाही.

प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action) :

  • पर्यावरणातील एखाद्या उद्दीपनाला अनैच्छिकरीत्या, क्षणार्धात, तत्काळ दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय.
  • अशा क्रियांवर आपण विचार न करता आणि आपले नियंत्रण नसताना प्रतिक्रिया देतो.
  • अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण आणि समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. मेंदूवरील क्रियांचा भार कमी केला जातो. प्रतिक्षिप्त क्रियांमुळे जीविताचा धोका टळतो.
  • प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग पुढीलप्रमाणे असतो : ज्ञानेंद्रिय → संवेदी चेतापेशी → मेरुरज्जूकडे → सहयोगी चेतापेशी → प्रेरक चेता-पेशी → स्नायुपेशी किंवा ग्रंथी.

(2) रासायनिक नियंत्रण (Chemical Control)

  • रासायनिक नियंत्रण हे संप्रेरके आणि चेतासस्थेतील काही रसायनांद्वारे होते.
  • वाहिनीविरहित ग्रंथी किंवा अंतःस्रावी ग्रंथींतून संप्रेरके स्रवतात. संप्रेरके तयार होताच ती सरळ रक्तप्रवाहात मिसळून शरीरात सर्वत्र पोहोचतात.
  • चेता आवेग हे जलद आणि अल्पावधीसाठीच असतात. संप्रेरकांकडून होणारे नियंत्रण मात्र खूप धीम्या गतीने होते. परंतु दीर्घकाल परिणामकारक असते.
  • गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकांचे स्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ याचे नियमन केले जाते. उदा. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते व या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्सुलीनची निर्मिती करतात.
अंतस्रावी ग्रंथी – स्थान, संप्रेरके व काही महत्त्वाची कार्ये :

अंतस्रावी ग्रंथीस्थान, संप्रेरके काही महत्त्वाची कार्ये :

(i) पीयूषिका (स्थान : मेंदूच्या तळाशी) : पीयूषिका ही महत्त्वाची अंतःस्त्रावी ग्रंथी आहे. त्या ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरके पुढीलप्रमाणे आहेत :

  • वृद्धी संप्रेरक : या संप्रेरकामुळे हाडांची वाढ होते. लहान मूल ते मोठी प्रौढ व्यक्ती हा बदल या संप्रेरकामुळे होतो.
  • अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक : अधिवृक्क ग्रंथीचे स्राव तयार होण्यासाठी हे पीयूषिकेचे स्राव मदत करतात.
  • अवटु ग्रंथी संप्रेरक : अवटु ग्रंथीच्या संप्रेरक निर्मितीस चालना देणे.
  • प्रोलॅक्टीन : मातेच्या दुग्धनिर्मितीसंबंधीची सर्व कार्ये नियंत्रित करणे.
  • पुटिका ग्रंथी संप्रेरक : जननग्रंथींची वाढ नियंत्रित करणे.
  • ल्युटिनायझिंग हार्मोन : स्त्रियांच्या अंडाशयातून परिपक्व अंडे बाहेर टाकण्याचे कार्य म्हणजेच अंडमोचन करण्याचे कार्य हे संप्रेरक करते. मासिक पाळीचे नियंत्रण देखील हेच संप्रेरक करते.

(ii) अध:चेतक (स्थान : मेंदूतील प्रमस्तिष्क पियुषि का ग्रंथीच्या वर  ): प्रतिमूत्रल व ऑक्सिटोसीन ही दोन संप्रेरके प्रत्यक्षात अध:चेतकात तयार होतात. त्यांचे स्राव पीयूषिकेत साठवले जातात आणि या वेळी आवश्यकता असेल तेव्हा ते पुढे पाठवले जातात.

  • प्रतिमूत्रल संप्रेरक : या संप्रेरकामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.
  • ऑक्सिटोसीन : मूल जन्मताना गर्भाशय आकुंचित करणे.

(iii) अवटु (Thyroid)  (स्थान : मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनालाच्या (Trachea) दोन्ही बाजूस ): अवटु या ग्रंथीपासून थायरॉक्झीन आणि कॅल्सिटोनीन ही संप्रेरके निर्माण होतात. यांपैको थायरॉक्झीन हे शरीराची वाढ आणि चयापचय क्रिया नियंत्रित करते.

(iv) परावटु (Parathyroid) (स्थान : अवटु ग्रंथींच्या मागे चार ग्रंथी ) : पॅराथॉर्मोन हे संप्रेरक निर्माण होते. कार्ये : शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयाचे नियंत्रण करणे.

(v) अधिवृक्क (स्थान : दोन्ही वृक्कांच्या वरती.  ): अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागापासून कॉर्टिकोस्टेरॉइड हे संप्रेरक निर्माण होते; तर आतील भागातून अॅड्रेनॅलिन व नॉरअॅड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके स्रवतात.

  • कॉर्टिकोस्टेरॉइड Na, K चे संतुलन राखते आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देते. ग्लुकोजच्या चयापचयातसुद्धा याचा महत्त्वाचा सहभाग असतो.
  • अॅड्रेनॅलिन व नॉरअॅड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करतात. हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करतात आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देतात.

(vi) यौवनलोपी (स्थान : हृदयाजवळ, छातीच्या पिंजऱ्यात  ): प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे थायमोसीन हे संप्रेरक यौवनलोपी ग्रंथी करते.

(vii) वृषणग्रंथी (स्थान : मुष्का मध्ये (Scrotum ) ): वृषणग्रंथी या पुरुषांच्या जननग्रंथी, टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार करतात. या संप्रेरकामुळे बालकाचे पुरुषात रूपांतर होते. पुरुषत्व प्राप्त झाल्यावर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामुळे होतात. शुक्राणू तयार होणे या कार्यातही या संप्रेरकाचा सहभाग असतो.

(viii) अंडाशय (स्थान : स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला.): अंडाशय या स्त्रियांच्या जननग्रंथी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरके तयार करतात.

  • इस्ट्रोजेन संप्रेरक बालिकेचे स्त्रीमध्ये रूपांतर करते. यासाठी स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास होतो. हे कार्य इस्ट्रोजेनचे आहे. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ इस्ट्रोजेनमुळे होते.
  • प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गरोदरपणात साहाय्यक आहे. गर्भाशयाच्या अंतःस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे अशी कार्ये ते करते.

(ix) स्वादुपिंड (Pancreas) (स्थान : जठराच्या मागे चार प्रकारच्या पेशी अल्फा पेशी (20%), बीटा पेशी (70%), डेल्टा पेशी (5%), पी. पी. पेशी किंवा F Cells (5%) ):

  • स्वादुपिंडाच्या पेशीनी निर्माण केलेली ग्लुकगॉन आणि इन्सुलिन सोमॅटोस्टॅटिन पॅन्क्रिएटिक पॉलीपेप्टाइडही संप्रेरके रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणाखाली ठेवतात. आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण यांवर नियंत्रण ठेवणे. स्वादुरसाच्या स्रवण्यावर नियंत्रण ठेवणे. अशी कार्ये ते करतात

[collapse]

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-14- पदार्थ आपल्या वापरातील - online notes

Next Chapter : पाठ-16- आनुवंशिकता व परिवर्तन - online notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *