पदार्थ आपल्या वापरातील
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-14-Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूंची संख्या .......आहे.
धुण्याच्या सोड्यामध्ये स्फटिकजलाच्या रेणूंची संख्या 10 आहे.
(आ) बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव.... आहे.
बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडिअम बायकार्बोनेट आहे.
(इ) हायपर थायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी ....... चा वापर करतात.
हायपर थायरॉइडिझम या रोगाच्या उपचारासाठी (I-123) चा वापर करतात.
(ई) टेफ्लॉनचे रासायनिक नाव ....... आहे.
टेफ्लॉनचे रासायनिक नाव पॉलिटेट्राफ्ल्यूरोइथिलिन आहे.
प्रश्न 2. योग्य जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1.संतृप्त मिठवणी | अ. सोडीअम धातू मुक्त |
2.सम्मीलित मीठ | ब. आम्लारिधर्मी क्षार |
3.CaOCl2 | क. मिठाचे स्फटिकीभवन |
4. NaHCO3 | ड. रंगाचे ऑक्सिडीकरण |
'अ' गट | 'ब' गट |
1.संतृप्त मिठवणी | मिठाचे स्फटिकीभवन |
2.सम्मीलित मीठ | सोडीअम धातू मुक्त |
3.CaOCl2 | रंगाचे ऑक्सिडीकरण |
4. NaHCO3 | आम्लारिधर्मी क्षार |
प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) किरणोत्सारिता म्हणजे काय?
युरेनिअम, थोरिअम, रेडिअम इत्यादी उच्च अणुअंक असणाऱ्या मूलद्रव्यांमधे अतिशय भेदक व अदृश्य असे किरण उत्स्फूर्तपणे बाहेर टाकण्याचा गुणधर्म असतो त्या गुणधर्माला किरणोत्सारिता असे म्हणतात.
(आ) अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात?
जेव्हा अणुकेंद्रकातून किरणोत्सारी प्रारणे (अल्फा, बीटा आणि गॅमा किरणे) बाहेर टाकली जातात, तेव्हा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हणतात.
(इ) कृत्रिम खाद्यरंगामुळे कोणते आजार होतात?
खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे सतत अतिसेवन केल्यास
- लहान मुलांमध्ये ADHD(Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार होऊ शकतात.
- अॅलर्जीसारखे रोग उद्भवतात.
- मज्जासंस्थेचे रोग होऊ शकतात.
- कर्करोग होतो.
(ई) औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारितेचा उपयोग कोठे करतात?
औद्योगिक क्षेत्रात किरणोत्सारिचे विविध उपयोग आहेतः
- अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वीज निर्मितीसाठी किरणोत्सारितेचा वापर केला जातो.
- जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे : हे कागद, प्लास्टिक आणि धातूच्या शीटच्या उत्पादना दरम्यान त्यांचा जाडपणा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंगमधील मालही तपासता येतो.
- दीप्तिमान रंग व किरणोत्सारिदीप्ति रंगः हे दीप्तिमान रंग व किरणोत्सारिदीप्ति रंग दर्शविणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. उदाहरणार्थ, रेडियम, प्रोमिथियम इत्यादी पदार्थांचा वापर घड्याळाच्या काट्याप्रमाणे अंधारात चमकणाऱ्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे, उच्च-तीव्रतेच्या डिस्चार्ज दिव्यांमध्ये क्रिप्टॉन-85 वापरला जातो.
- सिरॅमिक वस्तूंमध्ये उपयोग: किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर चिनीमाती, भांडी, प्लेट्स इत्यादींमध्ये चमकदार रंग वापरतात.
- रेडिओग्राफी: कोबाल्ट-60, आणि इरिडियम-192 सारख्या समस्थानिकांपासून मिळणारे गामा किरण रेडिओग्राफी कॅमेऱ्यामध्ये बिडाच्या वस्तू आणि लोखंडाचे वितळजोडमधील अंतर्गत भेगा आणि पोकळी शोधण्यासाठी वापरले जातात. धातुकामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात.
(उ) टेफ्लॉनचे गुणधर्म लिहा.
- टेफ्लॉनवर वातावरणाचा व रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नाही.
- टेफ्लॉनकोटेड वस्तूंना पाणी व तेल हे दोन्ही पदार्थ चिकटत नाहीत.
- टेफ्लॉनवर उच्च तापमानाचा परिणाम होत नाही; कारण टेफ्लॉनचा द्रवणांक 327°C आहे.
- टेफ्लॉनकोटेड वस्तू सहजतेने स्वच्छ करता येतात.
- टेफ्लॉन एक गैर-विषारी पदार्थ आहे, जो अन्न शिजवण्यासाठी केलेल्या तव्यात वापरला जातो.
टेफ्लॉनच्या या गुणांमुळे तो औद्योगिक, घरगुती आणि वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय आहे.
(ऊ) पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे रंग वापराल? का?
- पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यासाठी आपण नैसर्गिक रंगांचा वापर केला पाहिजे.
- हे नैसर्गिक रंग बीटरूट, जंगलातील पळसाची फुले, पालक, गुलमोहर इत्यादी नैसर्गिक घटकांपासून बनवले जाऊ शकतात.
- या नैसर्गिक रंगामुळे आंधळेपणा, त्वचेचे रोग, अस्थमा यांसारखे अपायकारक रोग होणार नाहीत.
(ए) टेफ्लॉन विलेपन सारख्या पद्धतींचा वापर खूप वाढलेला का आहे ?
टेफ्लॉन हा एक असा पदार्थ आहे जो रसायनांसाठी जड असतो, उच्च तापमानात स्थिर असतो, स्वच्छ करण्यास सोपा आणि न चिकटणारा असतो. हे सर्व गुणधर्म विलेपनसाठी एक आदर्श बनतात. स्वयंपाकाची भांडी आणि औद्योगिक उपकरणात चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी टेफ्लॉन कोटिंगचा वापर अधिक सामान्य झाला आहे.
प्रश्न 4. स्पष्टी करणासह लिहा.
(अ) विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो.
- क्लोरीन हा विरंजक चूर्णातील मुख्य घटक आहे.
- हवेतील कार्बन डायऑक्साइडमुळे विरंजक चूर्णाचे संथपणे विघटन होऊन क्लोरीन वायू मुक्त होतो. म्हणून विरंजक चूर्णाला क्लोरीनचा वास येतो.
(आ) विहीरीचे दुष्फेन पाणी धुण्याच्या सोड्यामुळे सुफेन होते.
कॅल्शिअम व मॅग्नेशिअम क्लोराइडस् व सल्फेटस्च्या अस्तित्वामुळे विहिरीचे पाणी दुष्फेन होते. हे पाणी सुफेन व वापरण्यायोग्य बनवण्यासाठी धुण्याचा सोडा वापरतात. धुण्याच्या सोड्याबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशिअम व कॅल्शिअमचे अविद्राव्य कार्बोनेट क्षार तयार होतात.
MgCl2(aq) + Na2CO3(s) -> MgCO3(g) + 2NaCl(ag)
(इ) दुष्फेन पाण्यात साबणाचा साका तयार होतो.
साबण दुष्फेन पाण्यात मिसळल्यास सोडिअमचे विस्थापन होऊन तेलाम्लांचे कॅल्शिअम व मॅग्नेशिअम क्षार तयार होतात. हे क्षार पाण्यात अविद्राव्य असल्याने त्यांचा साका तयार होतो. त्यामुळे दुष्फेन पाण्यामध्ये साबणाला फेस येत नाही.
(ई) पावडर कोटिंग करताना फवारा उडवताना पावडरच्या कणांना विद्युत प्रभार देतात.
- लोखंडी वस्तू गंजू नयेत, म्हणून त्यांवर टणक थर देण्याची पद्धत म्हणजे पावडर कोटिंग.
- यात पॉलिमर रेझीन रंग व इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात.
- इलेक्ट्रिक स्प्रे डिपॉझिशन (ESD) करताना धातूच्या घासलेल्या भागावर त्या पावडरचा फवारा उडवतात. यात पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो. त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो.
- यानंतर या थरासह वस्तू भट्टीत तापवतात. तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे तयार होते.
(उ) अॅनोडायझींगमध्ये अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात.
- अॅनोडायझिंग प्रक्रियेत विद्युत अपघटनी घटात विरल आम्ल घेऊन त्यात अॅल्युमिनिअमची वस्तू धनाग्र म्हणून बुडवतात.
- विद्युतप्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन, तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो.
- ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन अॅल्युमिनिअम वस्तुरूपी धनाग्रावर हायड्रेटेड अॅल्युमिनिअम ऑक्साइडचा थर जमा होतो.
अशा प्रकारे अॅनोडायझिंग केलेले तवे, कुकर अशी स्वयंपाकाची भांडी तयार करता येतात.
(ऊ) काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात.
- एखाद्या विशिष्ट किरणोत्सारी पदार्थातून उत्सर्जित होणारे प्रारण विद्युत क्षेत्रातून जाते तेव्हा त्यांच्या मार्गात ठेवलेल्या फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी स्पष्ट खुणा दिसूत येतात. यावरून विद्युतक्षेत्राच्या प्रभावामुळे किरणोत्सारी प्रारणांचे तीन भाग पडतात.
- एक प्रारण ऋणप्रभारित पट्टीकडे थोडे विचलित झाले, या प्रारणास अल्फा किरणे तर दुसरे प्रारण धनप्रभारित पट्टीकडे जास्त प्रमाणात विचलित झाले, या प्रारणास बीटा किरणे व तिसऱ्या प्रारणांचे विद्युतक्षेत्रात विचलन झाले नाही, या प्रारणास गॅमा किरणे म्हणतात.
(ए) स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावतात.
- स्पेस शटलच्या बाहेरील थरावर लागणाऱ्या विशिष्ट सिरॅमिक टाइल्स या अॅल्युमिना (Al2O3), झिर्कोनिया (ZrO2), सिलिका (SiO2) अशी काही ऑक्साइडस् व (SiC) सिलिकॉन कार्बाइड, बोरॉन कार्बाइड (B4C) सारखी काही संयुगे यांचा उपयोग करतात.
- हे सिरॅमिक भाजण्यासाठी 1600 ते 1800 0C असे तापमान व ऑक्सिजनविरहित वातावरण लागते. यापासून बनलेल्या टाइल्स सर्व वायू, पाणी, आम्लरोधक व टिकाऊ असतात.
- या टाइल्स हलक्या असतात. याचा वापर अतिसंवाहक म्हणून केला जातो.
प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) कृत्रिम खाद्यरंग व त्यात वापरले जाणारे पदार्थ सांगून त्यांचे दुष्परिणाम लिहा.
मिठाई, शीतपेये, केक, आइस्क्रीम, मांस, मसाले इ. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये खाद्य रंग अनेकदा मिसळले जातात. हे खाद्य रंग पावडर, जेल आणि पेस्टच्या स्वरूपात असतात. ते घरगुती तसेच व्यावसायिक उत्पादनांमध्ये वापरले जातात. हे खाद्य रंग नैसर्गिक आणि कृत्रिम असू शकतात.
- चहा पावडरमध्ये कॉपर अर्सेनाइट टाकले जाते. ते अतिप्रमाणात टाकले गेल्यास शरीरासाठी घातक ठरते.
- लोणची, जॅम आणि सॉस यांमध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा यांचे थोडे प्रमाण असते. सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात.
- खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार होऊ शकतात.
- हेक्झेन, टेट्राझीन, सनसेट यलो, अमिटोन असे खाद्यरंग कृत्रिम असतात. यांचे अतिसेवन घातक ठरू शकते.
(आ) स्फटिकजल म्हणजे काय ते सांगून स्फटिकजल असणारे क्षार व त्याचे उपयोग लिहा.
स्फटिकरचनेत पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते. यालाच स्फटिकजल म्हणतात.
स्फटिकजल असणारे क्षार व त्याचे उपयोग :
(१) तुरटी (Potash Alum- K2SO4.Al2(SO4)3.24H2O) :
- तुरटी व तुरटीची लाही औषधात वापरतात. कागद उदघोगात कागदाला चकाकी देण्यासाठी तुरटी वापरतात. जखमेतून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत केला जातो.
(२) बोरॅक्स (Borax-Na2B4O7.10H2O) :
- सौंदर्य-प्रसाधन उदघोगात लोशन्स, शाम्पू, कोल्ड क्रीम बनवण्यासाठी बोरॅक्सचा वापर करतात. लॉन्ड्रीमध्ये कपड्यांवरील डाग काढण्यासाठी याचा वापर होतो. प्रयोग-शाळेत बोरॅक्स बीड टेस्टच्या साहाय्याने रंगीत क्षारामधील मूलद्रव्ये शोधण्याकरिता याचा वापर करतात.
(३) ईप्सम सॉल्ट (Magnesium Sulphate -MgSO4.7H2O) :
- याचा उपयोग खते तयार करण्यासाठी तसेच झाडे व भाज्या यांचा हिरवा रंग वाढवण्यासाठी करतात. रेचक औषधे बनवण्याकरिता याचा उपयोग करतात. याचा उपयोग बॉडीस्क्रब म्हणून शरीर घासण्यासाठी करतात. स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी हे आंघोळीच्या पाण्यात (Salt bath) मिसळले जाते.
(४) बेरिअम क्लोराइड (Barium Chloride - BaCl2.2H2O) :
- याचा उपयोग ब्राइनच्या (NaCl चे द्रावण) शुद्धीकरण करण्यासाठी करतात. वाया जाणाऱ्या सांडपाण्यावर इलाज करण्यासाठी, कागद उद्घोगात, डाय इंडस्ट्रीमध्ये, सिरॅमक्स तेल शुद्धीकरण, कीटकनाशक औषधांमध्ये याचा उपयोग करतात.
(५) सोडिअम सल्फेट (Sodium Sulphate- Glauber's Salt Na2SO4.10H2O) :
- याचा उपयोग अपमार्जके तयार करण्यासाठी करतात. याचा वापर कागद उद्योगात कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो आणि डाय इंडस्ट्रीमध्ये देखील वापरला जातो. सौम्य रेचक औषधे बनवण्याकरिता याचा उपयोग करतात.
(६) मोरचूद (Copper Sulphate-CuSO4.5H2O) :
- अॅनिमियाचे निदान करण्यासाठी रक्त चाचणीमध्ये मोरचूदचा वापर केला जातो. फळांवर बुरशीनाशक म्हणून वापरल्या जाणाऱ्या बोर्डो मिश्रणात मोरचुदाबरोबर चुना वापरतात.
(इ) सोडीअम क्लोराइडचे विद्युत अपघटन करण्याच्या तीन पध्द्ती कोणत्या?
- अतिशय कमी सोडिअम क्लोराइड (मीठ) घेऊन जास्त पाणी मिसळून द्रावण तयार केले आणि त्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते व ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू व धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो.
- सोडिअम क्लोराइडच्या संतृप्त जलीय (ब्राइन-10% NaCl) द्रावणामध्ये विद्युत प्रवाह दिला जातो. या पद्धतीमध्ये द्रावणाच्या तापमानात वाढ केल्याने सोडियम व क्लोरीनचे आयन अलग होतात आणि विद्युत प्रवाह दिल्याने सोडियम धातू व क्लोरीन वायू मुक्त होतो.
- सम्मिलित सोडिअम क्लोराइडचे (fused NaCl) विद्युत अपघटन केले असता धनाग्राजवळ क्लोरीन वायू व ऋणाग्राजवळ द्रवरूप सोडिअम धातू मुक्त होतो.
प्रश्न 6. उपयोग लिहा.
(अ) अॅनोडायझींग
- अॅनोडायझींग हे लोखंडी पृष्ठभागासाठी वापरले जाते जेणेकरून लोखंडाचे गंजण्यापासून संरक्षण करता येईल.
- अॅनोडायझींग हे तवे आणि कुकर सारख्या अनोडायज्ड भांडयांच्या निर्मितीमध्ये वापरले जाते.
(आ) पावडर कोटिंग
- घरगुती उपकरणे, खिडक्या यांना पावडर कोटिंग करतात. हे टिकाऊ व दिसायला सुंदर असते.
- धातूवर पावडर कोटिंग करून त्यांना गंज, रासायनिक प्रतिक्रिया आणि इतर हानीकारक घटकांपासून संरक्षण दिले जाते. याचा उपयोग ड्रम हार्डवेअरमध्ये, ऑटोमोबाइल तसेच सायकलच्या भागांमध्ये करतात.
(इ) किरणोत्सारी पदार्थ
विविध क्षेत्रांत किरणोत्सारी समस्थानिकांचे उपयोग खालीलप्रमाणे करतात
(1) औद्योगिक क्षेत्रात
- अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून वीज निर्मितीसाठी किरणोत्सारितेचा वापर केला जातो.
- जाडी, घनता, पातळी यांचे मापन करणे : हे कागद, प्लास्टिक आणि धातूच्या शीटच्या उत्पादना दरम्यान त्यांचा जाडपणा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. या तंत्राच्या साहाय्यानेच पॅकिंगमधील मालही तपासता येतो.
- दीप्तिमान रंग व किरणोत्सारिदीप्ति रंगः हे दीप्तिमान रंग व किरणोत्सारिदीप्ति रंग दर्शविणाऱ्या वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. उदाहरणार्थ, रेडियम, प्रोमिथियम इत्यादी पदार्थांचा वापर घड्याळाच्या काट्याप्रमाणे अंधारात चमकणाऱ्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे, उच्च-तीव्रतेच्या डिस्चार्ज दिव्यांमध्ये क्रिप्टॉन-85 वापरला जातो.
- सिरॅमिक वस्तूंमध्ये उपयोग: किरणोत्सर्गी पदार्थांचा वापर चिनीमाती, भांडी, प्लेट्स इत्यादींमध्ये चमकदार रंग वापरतात.
- रेडिओग्राफी: कोबाल्ट-60, आणि इरिडियम-192 सारख्या समस्थानिकांपासून मिळणारे गामा किरण रेडिओग्राफी कॅमेऱ्यामध्ये बिडाच्या वस्तू आणि लोखंडाचे वितळजोडमधील अंतर्गत भेगा आणि पोकळी शोधण्यासाठी वापरले जातात. धातुकामातील दोष शोधण्यासाठी हे तंत्र वापरतात.
(2) कृषी क्षेत्र:
- रोपांची जलद वाढ होण्यासाठी व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी बीजाला गुणधर्म देणारी जनुकेव गुणसूत्रे यावर किरणोत्साराचा उपयोग करून त्यात मूलभूत बदल करता येतात.
- कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्नपरिरक्षणात करतात.
- कांदे, बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यांवर कोबाल्ट - 60 च्या गॅमा किरणांचा मारा करतात.
- विविध पिकांवरील संशोधनात अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शिअम-90 वापरले जाते.
(3) वैद्यकशास्त्र:
- पॉलिसायथेमिआ: या रोगामध्येतांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण वाढते. यावर उपचारासाठी फॉस्फरस-32
- हाडांचा कर्करोग: उपचार करताना स्ट्रॉन्शिअम-89, स्ट्रॉन्शिअम-90, समारिअम-153 आणि रेडिअम-223
- हायपर थायरॉइडिझम: गलग्रंथी मोठी होणे, भूक लागूनही वजन कमी होणे, झोप न येणे, हे सर्व गलग्रंथीमधून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार झाल्यामुळे होते. यालाच हायपर थायरॉइडिझम म्हणतात. याच्या उपचारासाठी आयोडिन-123
- ट्यूमर ओळखणे: मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन-10, आयोडिन-131, कोबाल्ट-60 चा वापर तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक-74 चा वापर केला जातो.
(ई) सिरॅमिक
- सिरॅमिक मडकी, माठ, भांडी, बांधकामाच्या विटा, कपबश्या, टेराकोटाच्या वस्तू इत्यादी बनवण्यासाठी वापरतात.
- डिशेस, क्रॉकरी, फ्लॉवर पॉटस्, घरांचे छप्पर सिरॅमिकमध्ये बनविली जातात.
- सिरॅमिकमध्ये विद्युतरोधक, जलरोधक असतात. म्हणून त्याचा वापर विदयुत उपकरणांमध्ये, भट्टीच्या आतील भागात लेप देण्यासाठी तसेच जेट इंजिनच्या पात्यांना विलेपन करण्यासाठी करतात.
- स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाइल्स लावलेल्या असतात. काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणून करतात.
प्रश्न 7. दुष्परिणाम लिहा.
(अ) कृत्रिम डाय
- कृत्रिम डाय केसांना लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचा जळणे, डोळ्यांवर विपरीत परिणाम होणे असे दुप्परिणाम होतात.
- लिपस्टिकमध्ये कॅरमाइन नावाचा रंग असतो. याचा ओठांवर परिणाम होत नाही; मात्र पोटात गेल्यास पोटाचे विकार होतात.
- नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा जास्त वापर केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो.
(आ) कृत्रिम खाद्यरंग
- चहा पावडरमध्ये कॉपर अर्सेनाइट टाकले जाते. ते अतिप्रमाणात टाकले गेल्यास शरीरासाठी घातक ठरते.
- लोणची, जॅम आणि सॉस यांमध्ये घातल्या जाणाऱ्या रंगांमध्ये शिसे, पारा यांचे थोडे प्रमाण असते. सतत ही उत्पादने खाणाऱ्या लोकांना ती घातक ठरू शकतात.
- खाद्यरंग असलेल्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास लहान मुलांमध्ये ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) सारखे आजार होऊ शकतात.
- हेक्झेन, टेट्राझीन, सनसेट यलो, अमिटोन असे खाद्यरंग कृत्रिम असतात. यांचे अतिसेवन घातक ठरू शकते.
(इ) किरणोत्सारी पदार्थ
- किरणोत्सारी प्रारणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा होते.
- शरीरातील डी.एन.ए.वर प्रारणांचा हल्ला होऊन आनुवंशिक दोष तयार होतात.
- त्वचेला भेदल्यामुळे त्वचेचे कर्करोग, ल्युकेमिया यांसारखे रोग होतात.
- स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवेवाटे शरीरात जातात, त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण असते.
- किरणोत्सारी प्रदूषके समुद्रात सोडल्यामुळे ती माशांच्या शरीरात जातात. त्यांच्यामार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात.
- घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.
- स्ट्रॉन्शिअम-90 हे किरणोत्सारी समस्थानिक वनस्पती, फळे, फुले, झाडे, धान्य, गाईचे दूध इत्यादींमधून शरीरात गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेमिया असे रोग होतात.
(ई) दुर्गंधीनाशक
- अॅल्युमिनिअम झिर्कोनिअम हे डिओ(दुर्गंधीनाशक) मधील सर्वांत घातक रसायन असल्याने डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयाचे विकार असे आजार संभवतात.
- डिओमधील अॅल्युमिनिअम क्लोरोहायड्रेटस्मुळे त्वचेचे रोग तसेच कर्करोग होण्याची शक्यता असते.
प्रश्न 8. रासायनिक सूत्र लिहा.
विरंजक चूर्ण , मीठ, बेकिंग सोडा, धुण्याचा सोडा.
विरंजक चूर्ण : CaOCl2.
मीठ : NaCl
बेकिंग सोडा : NaHCO3.
धुण्याचा सोडा: Na2CO3·10H2O.
प्रश्न 9. खालील चित्राबाबत स्पष्टीकरण लिहा.
वरील चित्रात वस्तुवर पावडर कोटिंग करतांना दाखवले आहे. लोखंडी वस्तू गंजू नये म्हणून वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक थर देण्याची पध्दत म्हणजे पावडर कोटिंग होय.
- या पध्द्ती त पॉलिमर रेझिन रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवतात. इलेक्ट्रोस्टॅटीक स्प्रे डिपॉझि शन (ESD) करताना धातूच्या घासलेल्या भागावर ह्या पावडरचा फवारा उडवतात.
- ह्या पध्द्तीत पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो.
- यानंतर ह्या थरासह वस्तू भट्टीत तापवतात. तेव्हा थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे तयार होते.
- हे पावडर कोटिंग अतिशय टिकाऊ, टणक व आकर्षक असते.
Click on link to get PDF from store :
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-14-पदार्थ आपल्या वापरातील-Notes
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-14-पदार्थ आपल्या वापरातील-Solutions
महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF) Rs. 72
Useful links :
Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान- All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ-13- कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - Online Solutions Next Chapter : पाठ-15- पदार्थ आपल्या वापरातील- Online Solutions |