सजीवांमधील जीवनप्रक्रिया
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-15-Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. योग्य जोड्या जुळवून त्या बाबत स्पष्टीकरण लिहा.
‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल |
2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल |
3. मूळ संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल |
4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | d. वृद्धी असंलग्न हालचाल |
e. जलानुवर्ती हालचाल. |
(1) बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ- रसायन-अनुवर्ती हालचाल.
- रसायन-अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतीच्या ठरावीक भागांनी दिलेला प्रतिसाद. वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते. उदा., बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ.
(2) प्ररोह संस्थेची होणारी वाढ - प्रकाशानुवर्ती हालचाल.
- वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते. यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशानुवर्ती हालचाल दर्शवते.
(3) मूळ संस्थेची होणारी वाढ -गुरुत्वानुवर्ती हालचाल.
- वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात. म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे.
(4) पाण्याच्या दिशेने होणारी वाढ - जलानुवर्ती हालचाल.
- जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दाखवतात. वनस्पतींची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात.
प्रश्न 2. परिच्छेद पूर्ण करा.
शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती ....... पेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील ...... च्या वैशिष्ट्य पूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती ....... कडे व तेथून .......... च्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अति सूक्ष्म पोकळीतून म्हणजेच ...... मधून जातात. अशा प्रकारे....... चे शरीरात वहन होते आणि आवेग...... कडून .......... कडे पोहोचवले जाऊन ...........क्रिया पूर्ण होते.
(चेतापेशी, स्नायूपेशी, आवेग, वृक्षिका, अक्षतंतू, संपर्कस्थान, प्रतिक्षिप्त, पेशीकाया)
शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पाहण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती चेतापेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील वृक्षिकाच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती पेशीकायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानामधून जातात. अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशी कडून स्नायूपेशी कडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते.
प्रश्न 3. टीपा लिहा
(i) मूलदाब,
- मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात. या पेशी जमिनीतील पाणी व खनिजे यांच्या संपर्कात असतात.
- त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी व खनिजे यांच्या संहतीत फरक असतो. यामुळे पाणी व खनिजे जमिनीतून मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात.
- पेशी त्यामुळे ताठर बनतात आणि त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या मूलदाब निर्माण करतात.
- मूलदाबामुळे पाणी व खनिजे मुळांतील जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात.
- या हालचालींमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होऊन सातत्याने तो पुढे ढकलला जातो.
- अशा दाबामुळे झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते.
(ii) बाष्पोच्छ्वास,
- वनस्पतीच्या पानांवर पर्णरंध्रे असतात. त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते. यालाच बाष्पोत्सर्जन असे म्हणतात.
- या पर्णरंध्राभोवती दोन रक्षक पेशी असतात. त्यांना बाह्य आवरण असते. रक्षक पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात.
- तसेच पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते.
- ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते.
- बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते.
- मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.
(iii) चेतापेशी,
- शरीरात एका ठि काणापासून दुसऱ्या ठि काणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात.
- मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजे चेतापेशी होत.
- शरीरातील सर्व पेशींपैकी ही पेशी आकाराने सर्वांत मोठी असते. लांबी काही मीटरपर्यंत असते.
- विद्युत-रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता चेतापेशींत असते.
- चेतापेशीचे प्रमुख भाग, वृक्षिका, अक्षतंतू आणि पेशिकाय हे असतात.
- वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांद्वारे पर्यावरणातल्या माहितीचे ग्रहण केले जाते. तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होतात. या आवेगांचे वहन वृक्षिकेकडून पेशीकायेकडे आणि पेशीकायेकडून अक्षतंतूकडे होते.
- अक्षतंतूंच्या टोकांनी हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात.
- चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध याच्या साहाय्याने चेता बनतात.
(iv) मानवी मेंदू,
- मानवी मेंदू अत्यंत विकसित आहे. मेंदू चेतासंस्थेचे नियंत्रण करतो. कर्परेमध्ये तो संरक्षित असतो. मेंदू आणि त्यावरील कर्परा यांच्या दरम्यानच्या पोकळीत संरक्षक मस्तिष्क आवरणे असतात.
- मेंदूच्या विविध भागांतील पोकळ्यांना मस्तिष्क निलये म्हणतात. मस्तिष्क निलयांत व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यांत संरक्षक प्रमस्तिष्क-मेरुद्रव असतो.
- प्रौढ मानवी मेंदू सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम वजनाचा असतो. त्यात सुमारे 100 अब्ज चेतापेशी असतात.
कार्य :
- मध्यवर्ती चेतासंस्थेस पोषकद्रव्ये पुरवणे, आघातां-पासून संरक्षणही करणे.
- आपल्या मेंदूची डावी बाजू शरीराच्या उजव्या बाजूस, तर मेंदूची उजवी बाजू शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते.
- याव्यतिरिक्त मेंदूची डावी बाजू आपले संभाषण, लिखाण व तर्कसंगत विचार नियंत्रित करते तर उजवी बाजू आपल्या कलाक्षमता नियंत्रित करते.
मेंदूचे तीन महत्त्वाचे भाग आहेत. ते पुढीलप्रमाणे : प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ.
(1) प्रमस्तिष्क : प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वांत मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धांचा बनलेला असतो. हे दोन्ही गोलार्ध टणक तंतू आणि चेतामार्ग यांनी एकमेकांना जोडलेले असतात. प्रमस्तिष्काच्या बाहेरील पृष्ठभागावर संवलन असतात, म्हणजेच अनियमित वळ्या व खाचा असतात. संवलनांमुळे प्रमस्तिष्काच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आणि चेतापेशींची संख्या वाढते.
- प्रमस्तिष्काची कार्ये : ऐच्छिक हालचालींचे नियंत्रण, ज्ञानेंद्रियांतून येणाऱ्या माहितीचे पृथःक्करण, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, एकाग्रता, नियोजन इत्यादी.
(2) अनुमस्तिष्क : मेंदूचा छोटा भाग अनुमस्तिष्क, कर्परगुहेच्या मागील बाजूस आणि प्रमस्तिष्काच्या खालच्या बाजूस असतो. याच्या पृष्ठभागावर उंचवटे व खळगे असतात.
- अनुमस्तिष्काची कार्ये : ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणि शरीराचा तोल सांभाळणे.
(3) मस्तिष्कपुच्छ : हा मेंदूच्या पुच्छबाजूचा भाग असतो. याच्या वरील बाजूस दोन त्रिकोणाकृती उंचवट्यासारख्या पिरॅमिड या संरचना असतात. याच्या पश्चभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते.
- मस्तिष्कपुच्छाची कार्ये : अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण जसे हृदयाचे कार्य, श्वासोच्छ्वास, अन्ननलिकेच्या हालचाली इत्यादी.
(v) प्रतिक्षिप्त क्रिया.
- पर्यावरणातील एखाद्या उद्दीपनाला अनैच्छिकरीत्या, क्षणार्धात, तत्काळ दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय.
- अशा क्रियांवर आपण विचार न करता आणि आपले नियंत्रण नसताना प्रतिक्रिया देतो.
- अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण आणि समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. मेंदूवरील क्रियांचा भार कमी केला जातो. प्रतिक्षिप्त क्रियांमुळे जीविताचा धोका टळतो.
- प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग पुढीलप्रमाणे असतो : ज्ञानेंद्रिय-> संवेदी चेतापेशी -> मेरुरज्जूकडे -> सहयोगी चेतापेशी -> प्रेरक चेता-> पेशी -> स्नायुपेशी किंवा ग्रंथी.
प्रश्न 4. खालील नमूद ग्रंथींची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
(i) पियुषिका,
पीयूषिका (Pituitary) (स्थान : मेंदूच्या तळाशी) : पीयूषिका ही महत्त्वाची अंतःस्त्रावी ग्रंथी आहे. त्या ग्रंथीतून स्रवणारी संप्रेरके पुढीलप्रमाणे आहेत :
- वृद्धी संप्रेरक : या संप्रेरकामुळे हाडांची वाढ होते. लहान मूल ते मोठी प्रौढ व्यक्ती हा बदल या संप्रेरकामुळे होतो.
- अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक : अधिवृक्क ग्रंथीचे स्राव तयार होण्यासाठी हे पीयूषिकेचे स्राव मदत करतात.
- अवटु ग्रंथी संप्रेरक : अवटु ग्रंथीच्या संप्रेरक निर्मितीस चालना देणे.
- प्रोलॅक्टीन : मातेच्या दुग्धनिर्मितीसंबंधीची सर्व कार्ये नियंत्रित करणे.
- पुटिका ग्रंथी संप्रेरक : जननग्रंथींची वाढ नियंत्रित करणे.
- ल्युटिनायझिंग हार्मोन : स्त्रियांच्या अंडाशयातून परिपक्व अंडे बाहेर टाकण्याचे कार्य म्हणजेच अंडमोचन करण्याचे कार्य हे संप्रेरक करते. मासिक पाळीचे नियंत्रण देखील हेच संप्रेरक करते.
- प्रतिमूत्रल संप्रेरक : या संप्रेरकामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.
- ऑक्सिटोसीन : मूल जन्मताना गर्भाशय आकुंचित करणे.
(ii) अवटु,
अवटु (Thyroid) (स्थान : मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनालाच्या (Trachea) दोन्ही बाजूस ): अवटु या ग्रंथीपासून थायरॉक्झीन आणि कॅल्सिटोनीन ही संप्रेरके निर्माण होतात. यांपैको थायरॉक्झीन हे शरीराची वाढ आणि चयापचय क्रिया नियंत्रित करते.
(iii) अधिवृक्क,
अधिवृक्क (Adrenal gland) (स्थान : दोन्ही वृक्कांच्या वरती. ): अधिवृक्क ग्रंथीच्या बाहेरील भागापासून कॉर्टिकोस्टेरॉइड हे संप्रेरक निर्माण होते; तर आतील भागातून अॅड्रेनॅलिन व नॉरअॅड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके स्रवतात.
- कॉर्टिकोस्टेरॉइड Na, K चे संतुलन राखते आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देते. ग्लुकोजच्या चयापचयातसुद्धा याचा महत्त्वाचा सहभाग असतो.
- अॅड्रेनॅलिन व नॉरअॅड्रेनॅलिन ही दोन संप्रेरके आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करतात. हृदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करतात आणि चयापचय क्रियेला उत्तेजन देतात.
(iv) यौवनलोपी,
यौवनलोपी (Thymus) (स्थान : हृदयाजवळ, छातीच्या पिंजऱ्यात ): प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करणारे थायमोसीन हे संप्रेरक यौवनलोपी ग्रंथी करते.
(v) वृषणग्रंथी,
वृषणग्रंथी (Testis) (स्थान : मुष्का मध्ये (Scrotum ) ): वृषणग्रंथी या पुरुषांच्या जननग्रंथी, टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक तयार करतात. या संप्रेरकामुळे बालकाचे पुरुषात रूपांतर होते. पुरुषत्व प्राप्त झाल्यावर येणारी दुय्यम लक्षणे जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे इत्यादी बदल या संप्रेरकामुळे होतात. शुक्राणू तयार होणे या कार्यातही या संप्रेरकाचा सहभाग असतो.
(vi) अंडाशय
अंडाशय (Ovary) (स्थान : स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला.): अंडाशय या स्त्रियांच्या जननग्रंथी इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरके तयार करतात.
- इस्ट्रोजेन संप्रेरक बालिकेचे स्त्रीमध्ये रूपांतर करते. यासाठी स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास होतो. हे कार्य इस्ट्रोजेनचे आहे. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ इस्ट्रोजेनमुळे होते.
- प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक गरोदरपणात साहाय्यक आहे. गर्भाशयाच्या अंतःस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे अशी कार्ये ते करते.
प्रश्न 5. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा.
(i) मानवी अंतस्रावी ग्रंथी,
(ii) मानवी मेंदू,
(iii) नेफ्रॉन,
(iv) चेतापेशी,
(v) मानवी उत्सर्जन संस्था
प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य
विशद करा.
- संप्रेरके आणि रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण होते. अंतःस्रावी ग्रंथीतून संप्रेरके तयार होतात, तर चेतांच्या संपर्कस्थानांजवळ रासायनिक पदार्थ निर्माण होतात.
- अंतःस्रावी ग्रंथी वाहिनीविरहित असून, त्यांचे स्राव थेट रक्तात मिसळतात. या ग्रंथी, ज्या शरीराच्या ठराविक ठिकाणांवर असतात, त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात.
- अंतस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्यया दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात.
- गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकांचे स्रवणे हे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ याचे नियमन केले जाते.
- पियुषिका, अवटु, परावटु, अधिवृक्क, स्वादुपिंडातील काही पेशी, जनन ग्रंथी - अंडाशय आणि वृषणग्रंथी आणि यौवनलोपी या महत्त्वाच्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत.
- वृद्धी संप्रेरक, अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक, अवटु ग्रंथी संप्रेरक, प्रोलॅक्टीन, ऑक्सिटोसीन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रतिमूतल संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक ही पीयूषिकेची संप्रेरके आहेत. यांपैकी वृद्धी संप्रेरक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. प्रोलॅक्टीन, ऑक्सिटोसीन, ल्युटिनायझिंग हार्मोन, पुटिका ग्रंथी संप्रेरक ही संप्रेरके स्त्रियांच्या शरीरातील प्रजननासाठी विशेष महत्त्वाची आहेत.
- इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही स्त्रीच्या शरीरातील संप्रेरके अंडाशयातून निर्माण होतात, तर टेस्टेस्टेरॉन हे पुरुषाचे संप्रेरक वृषणातून निर्माण होते आणि हे लैंगिक विकासासाठी आवश्यक असते.
- ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन ही स्वादुपिंडाच्या पेशींनी निर्माण केलेली संप्रेरके रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणाखाली ठेवतात.
- अवटु ही महत्त्वाची ग्रंथी थायरॉक्झीन आणि कॅल्सिटोनीन निर्माण करते, थायरॉक्झीनमुळे आपल्या शरीराचा चयापचय व्यवस्थितपणे चालू राहतो. कॅल्सिटोनीन जे अवटुने आणि पॅराथॉर्मोन जे परावटुने निर्माण केले जाते, ही दोन संप्रेरके रक्तातील कॅल्शिअमच्या प्रमाणाचे नियंत्रण करतात.
- अॅड्रेनॅलिन, नॉरअॅड्रेनॅलिन, आणि कॉर्टिकोस्टेरॉइड ही अधिवृक्क ग्रंथीची संप्रेरके शरीरातील अनेक कार्ये पार पाडतात, जसे की आणीबाणीच्या आणि भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे, हृदय आणि त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे, चयापचय क्रियेला उत्तेजन देणे आणि Na, k चे संतुलन ठेवणे.
- अशा रितीने रासायनिक नियंत्रण ही खूप धीम्या गतीने होणारी परंतु दीर्घकाल टिकणारी प्रक्रिया शरीराची समस्थिती टिकवते व समन्वय राखते.
(आ) मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा.
मानवी उत्सर्जन |
वनस्पती उत्सर्जन |
मानवात उत्सर्जित पदार्थ विषारी ठरतात. त्यामुळे ते वेळेत शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. | वनस्पती उत्सर्जित पदार्थ झाडांच्या सालींत साठवून ठेवतात. |
मानवातील उत्सर्जन क्रिया क्लिष्ट असते. मानवांमध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थ निर्मूलनासाठी एक उत्तम विकसित उत्सर्जन प्रणाली आहे. | वनस्पतींमधील उत्सर्जन क्रिया सोपी असते. वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. |
रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर टाकले जातात. | विसरणक्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. |
मानवी उत्सर्जन प्रणालीमध्ये मूत्रपिंड, त्यांना जोडणारी रक्तवाहिन्या, मूत्रवाहिन्या, मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांचा समावेश असतो. | वनस्पती उत्सर्जनासाठी विविध पद्धतींचा वापर करतात. |
उत्सर्जन मूत्राच्या स्वरूपात होते, जे रक्तातून टाकाऊ उत्पादने, जसे की युरिया, युरिक, आम्ल, अमोनिया गाळण्यासाठी निर्मित केले जाते. | उत्सर्जन विशेष पेशींमध्ये साठवलेल्या राळ, चिक, गोंद इत्यादींद्वारे केले जाते. |
(इ) वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतात. बाह्यउद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते. काही वेळा वाढ होते. अशा दोन प्रकारच्या हालचाली म्हणजे वृद्धी-संलग्न आणि वृद्धी-असंलग्न हालचाली. या वनस्पतीत समन्वय घडवून आणतात. यांनाच 'अनुवर्तन' किंवा 'अनुवर्ती हालचाल' म्हणतात.
वृद्धी-संलग्न हालचाली (अनुवर्तन) :
- प्रकाशानुवर्ती हालचाल : वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते. प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ होते. याला प्रकाशानुवर्ती हालचाल असे म्हणतात.
- गुरुत्वानुवर्ती हालचाल : वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल करते. याला गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणतात.
- जलानुवर्ती हालचाल : वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने हालचाल करते. याला जलानुवर्ती हालचाल म्हणतात.
- रसायन-अनुवर्तन : वनस्पतींचे काही भाग विशिष्ट रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात. उदा., बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ हे रसायन-अनुवर्तन आहे.
या सर्व हालचाली वनस्पतींच्या वाढीशी संबंधित आहेत; म्हणून त्या वृद्धी-संलग्न हालचाली ठरतात.
वृद्धी-असंलग्न हालचाली :
- वनस्पतींतील वृद्धी-असंलग्न हालचाली वाढीशी संबंधित नसतात.
- भोवतालच्या परिसरातील बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीतील संप्रेरके वनस्पतींमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात.
- लाजाळूसारख्या वनस्पती विद्युत-रासायनिक आदेशांचा उपयोग करतात.
- वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी-जास्त करतात. त्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते.
प्रश्न 7. तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
(अ) समन्वय म्हणजे काय ?
- शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय.
- बहुपेशीय सजीवांत विविध अवयव संस्था कार्यरत असतात. या निरनिराळ्या संस्था किंवा अवयव आणि भोवतालच्या परिसरातील वेगवेगळी उद्दीपने यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो. या समन्वयामुळेच सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो.
- उदा., हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वासाची गती यात कायम समन्वय असतो.
(आ) मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते?
- मानवी उत्सर्जन संस्थेत दोन वृक्क, दोन मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका या अवयवांचा समावेश होतो.
- वृक्कांमार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते.
मूत्र तयार होण्याची प्रकिया :
- वृक्कांमधील नेफ्रॉनमध्ये रक्त गाळण्याची क्रिया होऊन मूत्र तयार होते.
- नेफ्रॉनच्या बोमन्स संपुटात ग्लोमेरुलस हे रक्तकेशिकांचे जाळे असते. यकृतात चयापचयाच्या कारणाने तयार झालेला युरिया रक्तात येतो. हे युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमेरुलसमध्ये येते, त्या वेळी ग्लोमेरुलसमधील रक्तकेशिकांमधून हे रक्त गाळले जाते.
- बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडतात.
- बोमन्स संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेत उतरतो. नेफ्रॉन नलिकेच्या विविध भागांत पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते.
- शरीराला आवश्यक नसलेल्या सर्व घटक द्रव्यांपासून मूत्र तयार होते.
- तयार झालेले मूत्र मूत्रवाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात काही काळापर्यंत साठवले जाते.
- मूत्र विसर्जन करण्यावर आपले ऐच्छिक नियंत्रण असते. त्यामुळे इच्छा झाल्यावर मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे ते बाहेर टाकले जाते.
(इ) वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते?
वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जिते असतात त्यांतील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात.
उदा.,
- वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड घेतात व त्याऐवजी ऑक्सिजन उत्सर्जित करतात. हा ऑक्सिजन मानवांसाठी जीवाची आवश्यक गोष्ट आहे.
- रबराचा चिक : यापासून रबर बनवले जाते. रबराचे हजारो उपयोग होतात.
- डिंक, राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो.
- वनस्पतींची पाने ठरावीक ऋतूत गळतात. हेही उत्सर्जनाचे कार्य आहे. या गळणाऱ्या पानांमुळे खतनिर्मिती होते.
(ई) वनस्पतींमधील परिवहन कसे होते?
वनस्पतींमधील परिवहन मूलदाब आणि बाष्पोच्छवास या दोन प्रक्रियांमुळे होते, आणि त्याचप्रमाणे स्थानांतरण प्रक्रियेने अन्नाचे परिवहन रसवाहिन्यांमार्फत वनस्पतीच्या गरजेनुसार होत असते. वनस्पतींच्या संवहनी संस्थेतून जल आणि अन्न वाहण्याचे कार्य चालते, यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात.
मूलदाब:
- मुळांच्या पृष्ठभागावरील पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजांच्या संपर्कात असतात आणि संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे या पेशींमध्ये शिरतात. यामुळे पेशी ताठर होतात आणि त्यांच्या लगतच्या पेशींवर दाब निर्माण करतात, यालाच मूलदाब म्हणतात.
- या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिन्यापर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ते पुढे पुढे ढकलले जातात. या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो जो सातत्याने पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती आणि लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो.
बाष्पोच्छवास :
- वनस्पती पानांवरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परुपाने पाणी बाहेर टाकतात. पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात. या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. या क्रियेला बाष्पोच्छवास असे म्हणतात.
- पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपित्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते.
- बाष्पोच्छासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते. तर मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.
Click on link to get PDF from store :
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-15- सजीवांमधील जीवनप्रक्रिया-Notes
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-15- सजीवांमधील जीवनप्रक्रिया-Solutions
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-15- सजीवांमधील जीवनप्रक्रिया-Text Book
PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF) Rs. 72
Useful links :
Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान- All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ-14- पदार्थ आपल्या वापरातील - online solutions Next Chapter : पाठ-16- आनुवंशिकता व परिवर्तन - online solutions |