वनस्पतींचे वर्गीकरण
Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6-Maharashtra Board
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
प्रश्न 1. ‘अ’ ‘ब’ व ‘क’ या स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
थॅलोफायटा | फळांच्या आत बिया तयार होतात | नेचे |
ब्रायोफायटा | बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. | सायकस |
टेरिडोफायटा | या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. | चिंच |
अनावृत्तबीजी | या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते | मॉस |
आवृत्तबीजी | पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात. | शैवाल |
‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | ‘क’ स्तंभ |
थॅलोफायटा | या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात | शैवाल |
ब्रायोफायटा | या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते | मॉस |
टेरिडोफायटा | पाणी व अन्न वहनासाठी ऊती असतात.. | नेचे |
अनावृत्तबीजी | बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते. | सायकस |
आवृत्तबीजी | फळांच्या आत बिया तयार होतात | चिंच |
प्रश्न 2. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारणमीमांसा स्पष्ट करा.
(आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, बिजाणू, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, युग्मक)
(अ) मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने...........या वनस्पतींचे असते.
मऊ व तंतूरुपी शरीर प्रामुख्याने थॅलोफायटा या वनस्पतींचे असते.
स्पष्टीकरण: थॅलोफायटा विभागातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसतात. या वनस्पती पाण्यात वाढत असल्यामुळे त्यांचे शरीर मऊ व तंतूरूपी असते.
(आ) वनस्पतीसृष्टीचे उभयचर............. गटाला म्हटले जाते.
वनस्पतीसृष्टीचे उभयचर ब्रायोफायटा गटाला म्हटले जाते.
स्पष्टीकरण: ब्रायोफायटा विभागातील वनस्पती या ओलसर मातीत वाढतात; परंतु प्रजननासाठी त्यांना पाण्याची आवश्यकता भासते. या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर' म्हटले जाते.
(इ) टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे ......... निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे ............निर्मितीद्वारे होते.
टेरीडोफायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बिजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
स्पष्टीकरण: टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींना फुले आणि फळे येत नाहीत. त्यांच्या पर्णिकिच्या मागील बाजूस काही बीजाणूधानी पुंजामध्ये बीजाणूंची निर्मिती होते. यांच्या साहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे अलैंगिक प्रजनन करतात.
ही पद्धत ज्या वेळी पाण्याची कमतरता असेल त्या वेळी वापरली जाते. परंतु सर्व परिस्थिती अनुकूल असेल, तर वनस्पती युग्मके तयार करून लैंगिक प्रजनन करतात.
(ई) नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी ........... ही वनस्पती आहे.
नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येणारी अनावृत्तबीजी ही वनस्पती आहे.
स्पष्टीकरण: केवळ अनावृत्तबीजी वनस्पर्तीच्याच विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणु-पत्रांवर येतात. त्यामुळे अनावृत्तबीजी हेच संयुक्तिक उत्तर आहे.
प्रश्न 3. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
(अ) बीजपत्री उपसृष्टीची वैशिष्ट्ये लिहा.
- बीजपत्री उपसृष्टीमधील वनस्पती प्रजननासाठी बिया निर्माण करतात. यासाठी त्यांना विशेष ऊती असतात.
- बीजपत्री वनस्पतीमध्ये सर्व शरीररचना दिसून येतात. जसे, मूळ, खोड, पाने, इत्यादी.
- ही झाडे वार्षिक, बहुवार्षिक किंवा द्विवार्षिक आहेत त्यांचा आकार मोठ्या झाडांपासून खुंटलेल्या झुडूपांपर्यंत असतो.
- यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यांमध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो.
- बिया रुजतांना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो.
- बीजपत्री उपसृष्टीत दोन विभाग आहेत - ते म्हणजे अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी.
- अनावृत्तबीजी वनस्पतीमध्ये बीज फळांमध्ये झाकलेले नसते. आवृत्तबीजी वनस्पतीमध्ये वरती फळाचे आवरण असते.
- आवृत्तबीजी वनस्पती दोन प्रकारच्या आहेत : द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती. हे उपप्रकार बीजपत्रांच्या संख्येवर अवलंबून असतात.
(आ) एकबीजपत्री व द्विबीजपत्री मधील फरक स्पष्ट करा.
एकबीजपत्री | द्विबीजपत्री |
या वनस्पतींच्या बियांमध्ये एकच बीजपत्र असते. | या वनस्पतींच्या बियांमध्ये दोन बीजपत्रे असतात. |
या वनस्पतींत तंतूमुळे असतात. | सोटमूळ . हे ठळक आणि प्राथमिक मूळ असते. |
खोड पोकळ, आभासी किंवा चकतीसारखे असते. उदा., बांबूमध्ये पोकळ, केळीमध्ये आभासी, तर कांद्यामध्ये चकतीसारखे असते. | बहुतेक वनस्पतींत खोड मजबूत आणि कठीण असते. |
पानांमध्ये समांतर शिराविन्यास असतो. | पानांवर जाळीदार शिराविन्यास दिसतो. |
फुले त्रिभागी असतात. | फुले चतुर्भागी किंवा पंचभागी असतात. |
उदा., मका, केळी, गहू, ज्वारी | उदा., सूर्यफूल, मोहरी, वाल, चवळी. |
(इ) नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा.
- "नेचे" म्हणजे "फर्न्स". बागेतील सुंदर वनस्पतींमध्ये ही वनस्पती महत्त्वाची आहे.
- नेचे ही मुळे, खोड, पाने इ. यांसारख्या सुव्यवस्थित अवयवांसह वनस्पती आहेत, ज्यांना पाणी आणि अन्न वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र हालचालीसाठी स्वतंत्र अवयव असतात.
- बागांमध्ये नेचेचा वापर करत असले तरी तिला फुले व फळे येत नाहीत, म्हणून त्यांना अपुष्प वनस्पती असेही म्हणतात.
- पर्णिकेच्या मागील बाजूस असलेल्या बीजाणूधानी पुंज्यांत तयार होणाऱ्या बीजाणूंमार्फत अलैंगिक प्रजनन घडून येते, तसेच लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
- उदा. नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया (जलीय नेचे), इक्किसेटम (शुष्कभागात वाढणारे नेचे), लायकोपोडियम (दुसऱ्या वनस्पतीवर आधारासाठी अवलंबून असणारे नेचे), एडीअँटम (चालणारे नेचे).
(ई) स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्ये लिहून आकृती काढा.
- अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा वनस्पती स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे.
- या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. या केवळ पाण्यातच जगू शकतात.
- त्यांचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते.
- हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश-संश्लेषण करतात. म्हणून त्या स्वयंपोषी आहेत.
- या बहुपेशीय तंतुमय शरीरात सर्पिल भासणारा हरितलवक असतो. याच्या मधोमध पायरेनॉईड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या असतात.
- त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. खंडीभवन प्रक्रियेने स्पायरोगायरा वाढतात.
(उ) ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा.
- ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे 'उभयचर' म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात. परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते.
- या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय व स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते.
- ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनीसारखी लांब असते.
- या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव मुलाभ असतात.
- पावसाळ्यात जुन्या ओलसर चिंतीवर, विटांवर आणि खडकांवर पाणी उपलब्ध असल्याने ही झाडे जोमाने वाढतात आणि हिरवा गालिचा तयार करतात.
- पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदा. मॉस (फ्युनारिआ), मर्केंशिया, अॅन्थॉसिरॉस, रिक्सिया, इत्यादी.
प्रश्न 4. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्या विषयी स्पष्टीकरण लिहा.
(i) मर्केंशिया,
मर्केंशिया :
- या वनस्पतीचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो.
- या वनस्पती ओलसर जमीन, तसेच जुन्या भिंतींवर वाढतात आणि मुख्यत्वे पावसाळ्यात हिरव्या रंगाच्या गालिच्याप्रमाणे दिसतात.
- वनस्पतींच्या खालील पृष्ठभागावर अनेक मुलाभ दिसून येतात. तसेच, वरील पृष्ठभागावर वृंत असून त्याच्या टोकाशी बीजाणूधारी संपुटिका दिसून येते.
- संपुटिका परिपक्क झाल्यावर त्यातून बीजाणू मुक्त होतात व त्यांद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते.
(ii) फ्युनारिया,
- फ्युनारिया ही अबीजपत्री या उपसृष्टीतील ब्रायोफायटा या विभागातील वनस्पती आहे.
- फ्युनारियाला मॉस असेही म्हटले जाते. परंतु मॉस ही संज्ञा जवळपास 200 निरनिराळ्या प्रजातींना वापरली जाते.
- ही वनस्पती उभयचर आहे, कारण ती ओलसर मातीत वाढते. परंतु प्रजननासाठी मात्र तिला पाण्याची गरज भासते.
(iii) नेचे,
- नेचे ही मुळे, खोड, पाने इ. यांसारख्या सुव्यवस्थित अवयवांसह वनस्पती आहेत, ज्यांना पाणी आणि अन्न वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र हालचालीसाठी स्वतंत्र अवयव असतात.
- बागांमध्ये नेचेचा वापर करत असले तरी तिला फुले व फळे येत नाहीत, म्हणून त्यांना अपुष्प वनस्पती असेही म्हणतात.
- पर्णिकेच्या मागील बाजूस असलेल्या बीजाणूधानी पुंज्यांत तयार होणाऱ्या बीजाणूंमार्फत अलैंगिक प्रजनन घडून येते, तसेच लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते.
- उदा. नेफ्रोलेपीस (नेचे), मार्सेलिया (जलीय नेचे), इक्किसेटम (शुष्कभागात वाढणारे नेचे), लायकोपोडियम (दुसऱ्या वनस्पतीवर आधारासाठी अवलंबून असणारे नेचे), एडीअँटम (चालणारे नेचे).
(iv) स्पायरोगायरा.
- अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमधील थॅलोफायटा वनस्पती स्पायरोगायरा ही हरित शैवाल आहे.
- या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात. या केवळ पाण्यातच जगू शकतात.
- त्यांचे शरीर लांब तंतूप्रमाणे असते.
- हरितद्रव्य असल्याने त्या प्रकाश-संश्लेषण करतात. म्हणून त्या स्वयंपोषी आहेत.
- या बहुपेशीय तंतुमय शरीरात सर्पिल भासणारा हरितलवक असतो. याच्या मधोमध पायरेनॉईड या पिष्टमय पदार्थाच्या गुठळ्या असतात.
- त्यांचे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होते. खंडीभवन प्रक्रियेने स्पायरोगायरा वाढतात.
प्रश्न 5. परिसरात उपलब्ध असणारी एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मूळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा.
(1) कांदा : (एकबीजपत्री वनस्पती)
शास्त्रीय नाव : Allium cepa
कांद्याचे रोप छोटे असून त्याचा कंद भूमिगत असतो.
- मूळ : तंतुमय मुळे.
- खोड : भूमिगत, कंदाच्या स्वरूपात.
- पाने : पोकळ नलिकेसमान, पात्यासारखी.
- फुले : पूर्ण व द्विलिंगी, निदलपुंज व दल् पुंज दोन्ही एकाच
- परिदलपुंज या स्वरूपात. प्रत्येकी 3 याप्रमाणे दोन थरांत त्यांची रचना.
- पुमंग/पुंकेसर : परिदलपुंजांवर चिकटलेले 6 पुंकेसर.
- जायांग/स्त्रीकेसर : त्रिभागी, अंडाशय वरच्या पातळीवर.
(2) जास्वंद (द्विबीजपत्री वनस्पती)
- मूळ: ठळक, प्राथमिक मूळ - सोटमूळ या प्रकारातील मुळे.
- पाने: साधी, जाळीदार शिराविन्यास असलेली पाने.
- फुले: देठ असलेली, पूर्ण, द्विलिंगी, पंचभागी.
- निदलपुंज: पाच हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज.
- दलपुंज: पाच लाल रंगाच्या सुट्या पाकळ्यांचा दलपुंज
- पुमंग/पुंकेसर: पुंकेसर, परागकोश आणि वृंत यांचा बनलेला आहे. अनेक पुंकेसर एकत्र येऊन परागनलिका तयार होते. परागकोशाची रचना
- द्विपाळी असून वृक्काच्या आकाराचे परागकोश वुंताच्या टोकावर दिसतात.
- जायांग/स्त्रीकेसर: कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशवापासून स्त्रीकेसर बनलेला असतो. 5 स्त्रीकेसर दिसून येतात.
प्रश्न 6. वनस्पतींचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो? ते सकारण लिहा.
वनस्पतींचे वर्गीकरण करताना पुढील वैशिष्ट्ये लक्षात घेतली जातात :
- वनस्पतींच्या दोन उपसृष्टी आहेत. जर वनस्पतीला फुले, फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती असते. जर फुले, फळे व बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती होते.
- वनस्पतीना अवयव आहेत की नाहीत, हे विचारात घेतले जाते. अवयव नसल्यास ती थॅलोफायटा विभागात येते.
- पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊतीसंस्था आहेत किंवा नाहीत हे पाहिले जाते. जर स्वतंत्र वहन ऊती नसतील; पण मूलाभ आणि पानांसारखे अवयव असतील तर त्या वनस्पतीचा समावेश ब्रायोफायटा विभागात केला जातो. जर त्या वनस्पतीत वहन ऊती असतील तर ती वनस्पती टेरिडोफायटा विभागात समाविष्ट केली जाते. तसेच इतर सर्व बीजपत्री वनस्पतींनाही वहन ऊती असतात.
- जर वनस्पतींमध्ये बी धारण करण्याची क्षमता नसेल तर तिचा टेरिडोफायटा विभागात समावेश केला जातो; पण बी येत असेल तर ती बीजपत्री ठरते.
- जर बीवर फळाचे आवरण नसेल तर ती अनावृत्तबीजी वनस्पती ठरते. मात्र बीवर फळाचे आवरण असेल तर ती आवृत्तबीजी वनस्पती होते.
- बीजपत्रांच्या संख्येवरून आवृत्तबीजी वनस्पतींचे दोन गट वेगळे केले जातात. बीजांमध्ये जर एकच बीजपत्र असेल तर ती एकबीजपत्री आणि दोन बीजपत्रे असतील तर ती द्विबीजपत्री ठरते.
Click on link to get PDF from store :
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6- वनस्पतींचे वर्गीकरण-Notes
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6- वनस्पतींचे वर्गीकरण-Solutions
PDF : Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान-पाठ-6- वनस्पतींचे वर्गीकरण-Text Book
PDF : महाराष्ट्र बोर्ड- कक्षा- 9 विज्ञान व तंत्रज्ञान-मराठी माध्यम सर्व 18 धड्यांची नोट्स (18 PDF)
Useful links :
Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञान- All chapters notes, solutions, videos, test, pdf.
Previous Chapter : पाठ-5-आम्ल, आम्लारी व क्षार - online solutions Next Chapter : पाठ-7- परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह- online solutions |