Solutions-Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Maharashtra Board

पर्यावरणीय व्यवस्थापन

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4-Maharashtra Board

Solutions

प्रश्न 1. खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे. त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा.

नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक

उत्तर :

(i) योग्य अन्नसाखळी : भातशेती -> नाकतोडा -> बेडूक -> साप -> गरुड.

(ii) वरील अन्नसाखळी भू-परिसंस्थेतील आहे.

(iii) भू-परिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात. जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी.

(iv) उदाहरणात भातशेती म्हटले आहे याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी. भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते. त्यामुळे तेथे बेडूक वास्तव्य करतात.

(v) वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे. दूवितीय भक्षक बेडूक, तृतीयक भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषणपातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपांतून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषणपातळीत हस्तांतरित होते.

प्रश्न 2. ‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :
  • हे विधान आपल्याला पर्यावरणाची जबाबदारी आणि त्याचे संरक्षण करण्याचे महत्व समजावून देते.
  • याचा अर्थ असा आहे की, आपल्या पूर्वजांनी ज्या पृथ्वीचा आनंद घेतला आणि ज्याची त्यांनी काळजी घेतली, ती पृथ्वी आपल्याला वारसा म्हणून मिळालेली नाही.उलट, आपण ती पृथ्वी आपल्या पुढच्या पिढीला उसनवारीने देत आहोत, म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीसाठी ती जतन करून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे
  • जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात, तसतशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात. आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पात घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत.
  • मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे.
  • औद्योगिकीकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी खंडित झाली आहेत.
  • मानवाच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही.
  • परिणामी, जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत. हा विकास शाश्वत नाही.
  • यामुळे आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे आणि त्याचे नैसर्गिक संसाधने जपून वापरणे गरजेचे आहे.शाश्वत विकासाच्या दृष्टीने काम करणे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना देखील या संसाधनांचा लाभ घेता येईल, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे1. याचा अर्थ असा की, आपण आपल्या कृतींचे परिणाम विचारात घेऊन काम करावे आणि पुढच्या पिढीसाठी एक चांगली पृथ्वी सोडून जावे

प्रश्न 3. टिपा लिहा

() पर्यावरण संवर्धन

उत्तर :
  • पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो. हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे.
  • यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतिशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हॉयर्नमेंट प्रोग्रॅम (UNEP) ची स्थापना करण्यात आली आहे.
  • पर्यावरण संवर्धनामध्ये लोक-सहभाग खूप आवश्यक आहे. यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरणस्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे.

() बिश्नोई चिपको आंदोलन

उत्तर :
  • राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी किंवा खेजडली हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथेच प्रथम बिश्नोई समाजाचे आंदोलन झाले होते.
  • खेजडली या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन इ.स. 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी हिच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केलेले होते. या गावात खेजडी (Prosopis cineraria) या वनस्पतीची बरीच झाडे होती. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. अमृतादेवी म्हणाली, “ झाड वाचवण्यासाठी एक-एक मुंडके उडाले तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल!'' अमृतादेवीला व तिच्या असू, रत्ना ब भागुबाई या तिन्ही मुलींना राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच मारून टाकले. ही बलिदानाची बातमी एकूण 83 गावांतले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान केले.
  • अबोल वृक्षांसाठी लोकांनी हौतात्म्य पत्करले. राजाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. बिश्नोई समाजाच्या सन्मानार्थ जोधपूरच्या महाराजा अभय सिंग यांनी माफी मागितली आणि वृक्ष व अन्य जीवन संरक्षित ठेवण्याचे कबूल केले. विसाव्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले.

() जैवविविधता

उत्तर :
  • निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते.
  • ही जैवविविधता तीन पातळ्यांवर असते : आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता. यांचा अर्थ अनुक्रम एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील विविधता आणि प्रत्येक प्रदेशातील परिसंस्थांतील विविधता असा असतो.
  • मानवाच्या विकासाच्या अनेक कृतींनी जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील.
  • जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारणे, राखीव जैवविभाग घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

() देवराई

उत्तर :
  • देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे ‘देवराई’.
  • हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वनखात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले ‘अभयारण्य’ आहेत.
  • देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते.
  • भारताच्या केवळ पश्चिम घाटातच नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात.
  • भारतात अशा 13000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत.

() आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन

उत्तर :

(आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा विषय या पाठात नाही. उत्तरासाठी पाठ 10 पाहावा.)

प्रश्न 4 प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा.

उत्तर :
  • प्रदूषण या मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते.
  • प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो. सजीवांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते. जर प्रदूषणावर मात केली तर हेच सजीव जगू आणि टिकू शकतील.

प्रदूषण नियंत्रणाच्या उपायांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो, जसे की:

  • ऊर्जा संसाधनांचा समतोल वापर: अतिवापर टाळून ऊर्जा संसाधनांची बचत करणे.
  • कचरा व्यवस्थापन: पुनर्चक्रण, कम्पोस्टिंग आणि कचरा कमी करण्याचे उपाय.
  • जलसंधारण: जलप्रदूषण टाळण्यासाठी जलस्रोतांचे संरक्षण आणि त्यांचा योग्य वापर.
  • वायू प्रदूषण नियंत्रण: वाहने आणि उद्योगांमधून निघणाऱ्या प्रदूषकांवर नियंत्रण.

या सर्व उपायांच्या माध्यमातून पर्यावरणीय व्यवस्थापनाचे ध्येय साध्य होते, ज्यामुळे सजीवांचे आरोग्य आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते. त्यामुळे, प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे

प्रश्न 5. पर्यावरण संवर्धना संदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?

उत्तर :

ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत, त्यांचा आधी अभ्यास करू. या समस्यांवर काही उपाय करून त्यांची व्याप्ती कमी करणे, हे महत्त्वाचे आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवता येतात, जसे की:

  • वृक्षारोपण: झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वांत सहज आणि सोपा उपक्रम आहे.शहरी आणि ग्रामीण भागात वृक्षारोपण करून हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे आणि ऑक्सिजनची पुरवठा वाढवणे.
  • जलसंधारण: पाण्याचा योग्य वापर आणि जलस्रोतांचे संरक्षण करणे.
  • कचरा व्यवस्थापन: घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून, शाळेतून परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद करणे. कचरा कमी करणे, पुनर्चक्रण आणि कम्पोस्टिंगचा वापर करणे.
  • ऊर्जा संवर्धन: सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या नवीन ऊर्जा स्रोतांचा वापर करणे.
  • जैव संवर्धन आजूबाजूच्या पशु-पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे इ.
  • शिक्षण आणि जनजागृती: लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची माहिती आणि जागृती वाढवणे.

या उपक्रमांचे राबवण्यासाठी विविध सामाजिक संस्था, शासकीय आणि खासगी क्षेत्रातील संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेता येऊ शकते. तसेच, व्यक्तिगत पातळीवर देखील प्रत्येक व्यक्ती या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनात योगदान देऊ शकते.

प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

() पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर :

पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात.

  • जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात.
  • मानवाच्या कृती जसे, जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात.
  • नैसर्गिक आपत्तींमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदा., भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो.

या घटकांमुळे पर्यावरणावर विविध प्रकारचे परिणाम होतात आणि त्याचे संतुलन बिघडते. 

() पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे ?

उत्तर :
  • पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व प्रस्थापित केले.
  • मानवाने आपल्या विकासाच्या प्रक्रियेत अनेक आविष्कार केले आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचा उपयोग आणि दुरुपयोग केला आहे.यामुळे पर्यावरणीय समस्या जसे की प्रदूषण, जैवविविधतेची हानी, आणि हवामान बदल यांचा सामना करावा लागत आहे.  त्यामुळे, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता जपणे हे मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे
  • मानवाव्यतिरिक्ति दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. हे सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात. त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते.

() जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.

उत्तर :

जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसते : आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, आणि परिसंस्था विविधता.

  • आनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो. थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते.
  • प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.
  • परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशांतून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय. प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंस्थांत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधांतून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशादेखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात.

() जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?

उत्तर :

पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल :

  • दुर्मीळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे.
  • राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे.
  • काही क्षेत्रे राखीव जैवविभाग ' म्हणून घोषित करणे.
  • विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.
  • प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे.
  • पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे.
  • पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे.

() जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?

उत्तर :
  • जादव मोलाई पयांग, ज्यांना ‘फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्या गोष्टीतून आपल्याला एक सामान्य माणूस किती मोठा बदल घडवून आणू शकतो हे दिसून येते
  • जादव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस. केवळ कामगार असलेल्या पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवले.
  • अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते, हे महत्त्वाचे सत्य जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते.
  • त्यांच्या उदाहरणातून आपल्याला प्रेरणा मिळते की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे

() जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.

उत्तर :
  • संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.
  • ही क्षेत्रे एके काळी पृथ्वीच्या7% एवढ्या भागावर होती.
  • आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत.
  • सध्या फक्त3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत.
  • यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत.
  • पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत.
  • भारतातील 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात.
  • पश्चिम घाटात 1500 हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात.
  • जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत.

() प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचविता यईल? .

उत्तर :
  • प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात.
  • नैसर्गिक कारणांपैकी भूकंप, हवामानबदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न-पाण्याची कमतरता, अशी काही ठळक कारणे आहेत.
  • मानवनिर्मित कारणांत शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे, या व अशा सर्व कारणांसाठी जंगलांचा नाश करणे, प्रदूषण, औद्योगिकीकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो.
  • या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ अनेक उपाय करतात. यांत अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच “संवेदनक्षम क्षेत्र' या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते.
  • निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उप-कलमांनी अन्य जीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा दिली जाते.

प्रश्न 7. खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.

उत्तर :

वरील सर्व चिन्हे “पर्यावरणस्नेही” या संकल्पनेची द्योतक आहेत.

(i) हे चिन्ह कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते.

  • नैसर्गिक साधनसंपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. या चिन्हावरून नैसर्गिक साधनसंपदांचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा हे समजते. जितके शक्य असेल तितके चंगळवाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

(ii) हे चिन्ह “पाणी वाचवा ' हा संदेश देते.

  • पाण्याची समस्या सगळ्याच गावा-शहरांत आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कृषिउत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून “पाणी वाचवा ' हा संदेश सर्वदूर पोहोचणे योग्य आहे.

(iii) सौर ऊर्जेची कास धरा” हा संदेश या चिन्हातून मिळतो.

  • सौर ऊर्जा ही नूतनकरणीयक्षम ऊर्जा असल्याने आणि आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. सौर ऊर्जेच्या वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनांचा वापर टाळू शकतो.

अशा चिन्हांतून आपल्याला पर्यावरणस्नेही वर्तणुकीचे विचार समजतात आणि त्यायोगे आपण योग्य कृती करतो.

PDF-Notes, Solution, Text Book

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store :

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Notes

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Solutions

Marathi Medium-Class 10-विज्ञान आणि तंत्रज्ञान-2-पाठ-4- पर्यावरणीय व्यवस्थापन-Text Book

Useful links :


Main Page : - Marathi Medium-Class 9-विज्ञान आणि तंत्रज्ञानAll chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ-3- सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -2 - online notes

Next Chapter : पाठ-5- हरित ऊर्जेच्या दिशेने - online notes

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *