Notes-Marathi Medium-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-18- परिसंस्था-Maharashtra Board

परिसंस्था

इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ -18- Maharashtra Board

नोट्स

अभ्यासघटक :

  • परिसंस्था
  • परिसंस्थेची रचना
  • भू-परिसंस्था
  • जलीय परिसंस्था
  • मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास

जैविक घटक : सभोवतालचे प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीवाणू आणि कवक. कवक हे विघटक म्हणून प्रत्येक परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका निभावतात.

अजैविक घटक : अजैविक घटकांत सूर्यप्रकाश, हवा, वायू, जल, जमीन असे सर्व निर्जीव घटक येतात.

  • प्रत्येक जैविक व अजैविक घटकाशी आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध येत असतो.

परिसंस्था (Ecosystem) :

सजीव म्हणजेच जैविक (Biotic) आणि निर्जीव (Abiotic) म्हणजेच अजैविक यांच्या परस्पर आंतरक्रियांमुळे परिसंस्था निर्माण होते.

  • सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांच्यात असणाऱ्या अन्योन्य संबंधातूनच जो वैशिष्टयपूर्ण आकृतिबंध तयार होतो, त्याला परिसंस्था असे म्हणतात.

विघटक : मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांतील सेंद्रिय पदार्थांचे पुन्हा असेंद्रिय पोषक द्रव्यांमध्ये रूपांतर करणाऱ्या सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात.

  • प्रथिने, कर्बोदके, स्निग्धपदार्थ असे सेंद्रिय पदार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, कॅल्शिअम, लोह, सोडिअम, पोटॅशिअम अशा असेंद्रिय पदार्थांत पुन्हा रूपांतरित होतात.

परिसंस्थेची रचना (Structure of Ecosystem) :

  • सजीवांना जगण्यासाठी निरनिराळ्या अजैविक घटकांची गरज असते तसेच त्यांची निर्जिव घटकांशी जुळवून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.
  • परिसंस्थेतील प्रत्येक अजैविक घटक उदाहरणार्थ, हवा, पाणी, माती, सूर्य प्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादींचा त्यातील सजीवांवर किंवा जैविक घटकांवर परिणाम होत असतो.
  • एखाद्या परिसंस्थेत कोणते सजीव जगू शकतील आणि त्यांची संख्या किती असावी हे त्या परिसंस्थेतील अजैविक घटकांवर ठरते.
  • सजीव परिसंस्थेतील हे अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकांमुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी-जास्त होत असते.

निश (Niche) : निश म्हणजे प्रत्येक सजीव त्याच्या त्याच्या परिसंस्थेत बजावत असलेली भूमिका.

  • सजीवांच्या इतर सजीवांसोबत असणाऱ्या आंतरक्रिया, इतर सजीवांच्या संदर्भांतील स्थान व तो बजावत असलेली भूमिका या सान्याला एकत्रितपणे 'निश' (Niche) असे म्हणतात.
  • उदा., सूर्यफुलासारखी वनस्पती ऑक्सिजन हवेत उत्सर्जित करते. कीटकांना अन्न आणि निवारा पुरवतात.

परिसंस्थेतील घटकांमधील आंतरक्रिया :

  • परिसंस्था ही जैविक आणि अजैविक घटकांच्या आंतरक्रियांनी तयार होणारी रचना आहे.
  • परिसंस्थेतील सर्व सजीव म्हणजे जैविक घटक आणि त्यांच्या सभोवतालच्या अधिवासात असणारे तापमान, ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइड, मृदा व त्यातील क्षार इत्यादी अजैविक घटक या दोन्हीमध्ये सतत आंतरक्रिया होत असतात. या अन्योन्य संबंधातूनच वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो.
  • प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक म्हणजे वनस्पती, प्राणी हे भक्षक आणि सूक्ष्मजीव हे विघटक असतात.
  • विघटक जीवाणू, कवक आणि इतर सूक्ष्मजीव मृत वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना असेंद्रिय स्वरूपात पुन्हा निसर्गात पाठवतात.
  • चांगल्या अवस्थेतील परिसंस्था अशा प्रकारे एकमेकांशी समतोल प्रमाणात राहतात.

परिसंस्थेचे प्रकार :

  • संपूर्ण पृथ्वी एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या परिसंस्था आहेत. त्यात अत्यंत गुंतागुंतीच्या आंतरक्रिया चालू असतात. उदा., जंगल, तळे, सागर, नदी इत्यादी.
  • आकार, स्थान, हवेची स्थिती, वनस्पती व प्राणी प्रकार या वैशिष्ट्यांनुसार परिसंस्थांचे प्रकार पडतात.
  • तसेच परिसंस्थेच्या वैशिष्ट्यांनुसार, त्यांच्या कार्यप्रणालीनुसार तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार देखील परिसंस्थेचे वेगवेगळे प्रकार पडतात.
  • उष्णकटिबंधीय भागात विविध जीवजातींचे संख्यात्मक व गुणात्मक वैविध्य आढळते.
  • विविध परिसंस्था एकमेकांशी बांधील असतात. छोट्या छोटया परिसंस्था पूर्णपणे एकमेकांपासून वेगळ्या न होता एकत्रित कार्य करीत असतात.

बायोम्स’ (Biomes) : पृथ्वी वरील काही भागांत बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये सारखेपणा आढळतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थांना ‘बायोम्स’ (Biomes) असे म्हणतात. या बायोम्समध्ये अनेक छोट्या परिसंस्थांचा समावेश असतो.

पृथ्वी वर दोन मुख्य प्रकारच्या ‘बायोम्स’ आढळतात.

  • भू-परिसंस्था (Land Biomes)
  • जलीय परिसंस्था (Aquatic Biomes)

भू-परिसंस्था :

ज्या परिसंस्था फक्त भू-भागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भू-परिसंस्था असे म्हणतात.

  • अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत.
  • उदा. गवताळ प्रदेशातील परिसंस्था , सदाहरित जंगलातील परिसंस्था , उष्ण वाळवंटातील परिसंस्था , बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था , तैगा प्रदेशातील परिसंस्था , विषुववृत्तीय वर्षा वनांची परिसंस्था .

() गवताळ प्रदेशातील परिसंस्था (Grassland Ecosystem) :

  • या प्रकारच्या परिसंस्था मध्ये पावसाचे प्रमाण मोठमोठी झाडे वाढविण्यासाठी पुरेसे नसते, गवताची मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यांमुळे खुरट्या वनस्पतींची वाढ होते.
  • शेळी, मंढी, जिराफ, झेब्रा, हत्ती , हरिण, चितळ, वाघ, सिंह इत्यादी प्राणी या प्रदेशात आढळतात. त्याचप्रमाणे विविध पक्षी, कीटक व सूक्ष्मजीवसुद्धा असतात.

 

माहीतीसाठी :

‘दुधवा’ हे जंगल दीड शतकापूर्वी एकशिंगी गेंड्याचे मोठे वसतिस्थान होते पण अनिर्बंध शिकारीमुळे विसाव्या शतकात हा प्राणी येथून नामशेष झाला. 1 एप्रिल 1984 रोजी या गेंड्यांचे येथे पुनर्वसन करण्यात आले. पिंजऱ्यात त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात (अधिवासात) सोडले गेले. सर्वप्रथम सत्ता वीस चौरस कि मी., गवताळ प्रदेश व वने ज्यात बारमाही जलस्रोत आहेत, असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला.

() जंगलातील परिसंस्था (Forest Ecosystem) :

ही निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष, एकाच ठिकाणी असतात.

  • अजैविक घटकांमध्ये जमिनीत व हवेत असणारे सेंद्रिय , असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणात आढळतात.

 

माहीतीसाठी :

  • भारतात सुमारे 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते.
  • पांढरा बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्यांचे रक्षण करणारे सर्वांत मोठे अभयारण्य दि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आहे.
  • काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (आसाम) येथे हत्ती , गवा, रानडुक्कर, रानम्हैस, हरिण, वाघ, बिबटे यांसह अनेक प्राण्यांचे जतन करण्यात आले आहे. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी दोन तृतीयांश गेंडे येथे आढळतात.
  • भरतपूर येथे अभयारण्य पाणपक्ष्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.
  • रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्धआहे.
  • गुजरातमधील गीरचे जंगल म्हणजे दिमाखदार अशा आशियाई सिंहाचे जगातील एकमेव आश्रयस्थान आहे.

 

जलीय परिसंस्था (Aquatic Biomes) :

पृथ्वीच्या 71% भूभागावर पाणी आहे. केवळ 29% भागावर जमीन आहे. अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक असलेली नैसर्गिक परिसंस्था म्हणजे जलपरिसंस्था.

जलपरिसंस्थेचे उपप्रकार पुढीलप्रमाणे

() गोड्या पाण्यातील परिसंस्था : नदी, तळे, सरोवर या परिसंस्था.

  • या परिसंस्थेत नदीद्वारे व पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते.
  • गोड्या पाण्यातील परिसंस्था आणि सागरी परिसंस्था जवळपास सारख्याच असतात. मात्र सागरी जलात क्षारता असते आणि गोड्या पाण्यात क्षार नसतात.
  • जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. ते वनस्पती व प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्याचे अजैविक घटकांत रूपांतर करतात.

() खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था (Marine Ecosystem) : सागरी जल असलेली परिसंस्था.

  • पाण्यात शैवाल हे उत्पादक असतात. अशा वनस्पती खाणारे छोटे मासे, त्यावर अवलंबून असणारे मोठे मासे अशा प्रकारची अन्नसाखळी पाण्यात आढळून येते. छोटे मासे हे प्राथमिक भक्षक आणि मोठे मासे हे द्वितीयक भक्षक असतात.
  • जलाशयाच्या तळाला विघटक जीवाणू असतात. मृत वनस्पती, प्राणी व टाकाऊ पदार्थ पाण्याच्या तळाशी साचतात. त्याचे विघटन सूक्ष्म जीवाणू करतात.

मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ऱ्हास :

प्रत्येक परिसंस्थेची मानवाच्या कृतींमुळे हानी होते. परिसंस्थांच्या कार्यावर घातक परिणाम होऊन परिसंस्थांचा ऱ्हास होतो. उदा., खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड, प्रदूषण अशांमुळे एखादी परिसंस्था पूर्ण नष्टही होते. काही सजीव नामशेष होतात.

परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती :

  • लोकसंख्यावाढ संसाधनांचा वाढलेला वापर : मानव हा परिसंस्थेतील 'भक्षक' असतो. त्याने आपली लोकसंख्या अफाट प्रमाणात वाढवली. लोकसंख्यावाढीमुळे नैसर्गिक संसाधने अपुरी पडतात. त्यामुळे मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी अधिकाधिक नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडतो आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि उपभोगवादी वृत्तीमुळे गरजेच्या गोष्टींपेक्षाही जास्त प्रमाणात साधनसंपदा वापरली जाते. त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढून प्रदूषण, जास्त प्रमाणात घनकचरा निर्मिती अशा समस्या वाढल्या आहेत.
  • शहरीकरण : वाढत्या लोकसंख्येमुळे अधिकाधिक घरांची गरज लागते. त्यामुळे शहरीकरण वाढत जाते. या प्रक्रियेमुळे घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेश या सर्वांचा जास्त वापर होतो. त्यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. अशा रितीने परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थांची हानी होते.
  • औद्योगिकीकरण आणि वाहतूक : वाढत्या औद्योगिकीकरणासाठी अधिकाधिक कच्चा माल वापरावा लागतो. हा माल नैसर्गिक जंगले तोडून मिळवला जातो. यामुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. जंगले उद्ध्वस्त होतात, वाहतुकीत वाढ झाल्याने नवे रस्ते, रेल्वे मार्ग, पूल इत्यादी बनवतांना नैसर्गिक अधिवासाची अजूनच हानी होते.
  • पर्यटन : एखाद्या ठिकाणी पर्यटकांची जास्त वर्दळ असेल तर तेथील पायाभूत सुविधांवर ताण येतो. अधिक बदल करताना स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊन तिची मोठ्या प्रमाणावर हानी होते.
  • मोठी धरणे : महाकाय धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते. त्यामुळे त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशांचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते. धरणांमुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या
  • पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. शिवाय अनेक लोक विस्थापित होतात. ते वेगळ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात.
  • युद्धे : कोणत्याही कारणावरून दोन देशांत कधी मोठ्या प्रमाणात युद्ध होऊ शकते. बाँब वर्षाव-सुरुंगस्फोट केले जातात. युद्धामुळे जीवितहानी आणि पर्यावरणाची हानी होते. शिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. युद्धामुळे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात किंवा त्या नष्ट सुद्धा होतात.

नैसर्गिक आपत्तीमुळे (उदा., भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ) आणि काही मानवनिर्मित कृतींमुळे नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्याच स्वरूपात रूपांतर होते, काही परिसंस्थांचा व्हास होतो, तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात.

नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते.

Rs 8

-Kitabcd Academy Offer-

To Buy Notes(Rs.5)+ Solution(Rs.5) PDF of this chapter
Price : Rs.10 / Rs.8

Click on below button to buy PDF in offer (20% discount)

Click on link to get PDF from store

PDFMSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-18- परिसंस्था - नोट्स

PDF : MSBSHSE-इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान-पाठ-18- परिसंस्था - स्वाध्याय प्रश्नोत्तरे

Useful links :


Main Page : - Maharashtra Board इयत्ता-आठवी – सामान्य विज्ञान   - All chapters notes, solutions, videos, test, pdf.

Previous Chapter : पाठ - 17 : मानवनिर्मित पदार्थ  -  Online Notes

Next Chapter : पाठ - 19 : ताऱ्यांची जीवनयात्रा. -  Online Notes

 

Leave a Reply

Leave you Replay.... Your email address will not be published. Required fields are marked *